Skip to main content
x

काशीकर, चिंतामण गणेश

        चिंतामण गणेश काशीकर यांचा जन्म सातारा येथे एका वैदिक घराण्यात झाला. साताऱ्यामधील राष्ट्रीय शाळेत शिक्षण घेतल्यानंतर ते पुण्यास आले आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठास संलग्न असलेल्या टिळक महाविद्यालयात उच्च शिक्षण घेऊन त्यांनी वाङ्मय विशारद’ (बी.) आणि वाङ्मय पारंगत’ (एम..) या पदव्या संपादन केल्या. वाङ्मय पारंगत या पदवीसाठी त्यांनी ऋग्वेदकालीन सांस्कृतिक इतिहासहा प्रबंध लिहिला. तो पुढे १९३५ साली टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने प्रसिद्ध केला. या विद्यापीठाची शाखा म्हणून स्थापन झालेल्या आणि लोकमान्य टिळकांच्या वेदविषयक संशोधनाची प्रेरणा लाभलेल्या वैदिक संशोधन मंडळामध्ये ते १९३३ साली रुजू झाले आणि १९६७ पर्यंत कार्यरत राहिले.

मॅक्सम्यूल्लर यांनी संपादित केलेल्या सायणभाष्यासह ऋग्वेद संहितेची नवी चिकित्सक आवृत्ती तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प त्या वेळी वैदिक संशोधन मंडळाने हाती घेतला होता. त्या प्रकल्पाच्या कामात ते पं.ना.श्री. सोनटक्के  यांच्यासह लक्ष घालू लागले आणि या दोन विद्वानांनी तो प्रकल्प पूर्ण केला. या कार्यामुळे डॉ.काशीकर यांना जागतिक पातळीवर मान्यता मिळाली. या प्रकल्पामध्ये डॉ.काशीकर यांनी संपादित केलेल्या ऋग्वेद खिल सूक्तांचाही समावेश आहे.

वैदिक संशोधन मंडळाने हाती घेतलेला दुसरा महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे श्रौतकोश. वैदिक यज्ञांची माहिती देणाऱ्या या ज्ञानकोशाच्या संस्कृत भागाची जबाबदारी डॉ. काशीकर यांच्यावर सोपविण्यात आली. श्रोताचार्य धुुंडिराजशास्त्री बापट यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.काशीकर यांनी काही खंडांचे संपादन केले. १९६७ साली डॉ.रा.ना. दांडेकर यांच्या आग्रहास्तव त्यांनी वैदिक संशोधन मंडळातील आपल्या पदाचा राजीनामा दिला व ते पुणे विद्यापीठामध्ये नव्यानेच स्थापन झालेल्या संस्कृत प्रगत अध्ययन केंद्रामध्ये प्रपाठक म्हणून रुजू झाले. याच सुमारास भारद्वाज श्रौतसूत्र या त्यांच्या संशोधन ग्रंथाबद्दल त्यांना पुणे विद्यापीठाची डी.लिट. ही पदवी प्राप्त झाली. संशोधनासाठी पुणे विद्यापीठाची डी.लिट पदवी प्राप्त करणारे डॉ. काशीकर हे पहिले विद्वान होत. पुणे विद्यापीठातून निवृत्त झाल्यावर १९७४ पासून १९८२ पर्यंत डॉ.काशीकर यांनी डेक्कन कॉलेजमधील संस्कृत कोश विभागात संपादक पदावर कार्य केले व त्या कार्यात मोलाची भर घातली.

वैदिक यज्ञविषयक ग्रंथांचे संपादन आणि अनुवाद करीत असतानाच डॉ.काशीकर प्रत्यक्ष यज्ञयागातही सहभागी होत असत. पुण्यात १९५६ साली झालेल्या वाजपेय यज्ञात त्यांनी ऋत्विजाचे काम केले, त्याचबरोबर त्या यज्ञाची माहिती देणारी पुस्तिकाही त्यांनी तयार केली. यज्ञीय कर्मकांडांचे प्रत्यक्ष ज्ञान त्यांच्या ग्रंथिक अध्ययनासाठी अत्यंत उपयुक्त ठरले. १९७५ साली केरळमध्ये पांजाळ या गावी साग्निचित्य अतिरात्रया सोमयागाचे आयोजन करण्यात आले. देशोदेशींच्या विद्वानांच्या सहकार्याने आणि प्रा. फ्रिट्झ स्टाल यांच्या पुढाकाराने या यज्ञाचे पूर्ण चित्रीकरण करण्यात आले आणि त्यासंबंधी माहिती देणारा अग्नीहा मोठा ग्रंथही प्रकाशित करण्यात आला. डॉ.चिंतामण काशीकर यांनी या सर्व उपक्रमात मोलाचे मार्गदर्शन केले, तसेच त्या ग्रंथासाठी एक महत्त्वपूर्ण निबंधही सादर केला.

डॉ.काशीकर यांनी सुमारे वीस ग्रंथ आणि शंभराहून जास्त शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. ते मुख्यत: वेदविषयक आहेत. त्याचबरोबर डॉ. यॉली (Jolly) या जर्मन विद्वानाने लिहिलेल्या Medicinया ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद डॉ. काशीकर यांनी केला आणिIndian Medicin’ या नावाने तो स्वत: प्रसिद्ध केला. अनुवादाबरोबरच डॉ.काशीकर यांनी या ग्रंथामध्ये आपल्या अनेक टीपांची आणि संदर्भांची भर घालून त्यास अद्ययावत स्वरूप दिले. हा एक प्रमाणभूत ग्रंथ मानला जातो. काही काळापूर्वी या ग्रंथाची नवी आवृत्तीही प्रसिद्ध झाली आहे.

डॉ.काशीकर यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, टिळक आयुर्वेद महाविद्यालय या ठिकाणी संस्कृत, वेद, आयुर्वेदीय इतिहास इत्यादी विषयांचे अध्यापन केले. तसेच, अनेक विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले. संशोधनपर लेखनाबरोबरच डॉ. काशीकर यांनी सर्वसामान्य जिज्ञासूंसाठी लेख लिहिले. वैदिक संस्कृतीचे पैलूया नावाने त्या लेखांचा संग्रह प्रसिद्ध झाला.

पुणे विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, वैदिक संशोधन मंडळ, वेदशास्त्रोत्तेजक सभा, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, भारत गायन समाज अशा अनेक संस्थांशी डॉ. काशीकर यांचा घनिष्ठ संबंध होता. त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले; त्यांमध्ये संस्कृत विद्वत्तेसाठी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रपती पुरस्काराचाही समावेश आहे. डॉ. काशीकर यांचे पुणे येथे वयाच्या त्र्याण्णवाव्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.

डॉ. श्रीकांत बहुलकर

काशीकर, चिंतामण गणेश