कदम, रामचंद्र वासुदेव
रामचंद्र वासुदेव कदम हे राम कदम यांचे पूर्ण नाव. त्यांचे मूळ गाव मिरज होते. बालपणापासूनच त्यांना संगीताची आवड होती. मिरजेत त्यांच्या वडिलांची खानावळ होती. राम यांनी मिरजच्या महाराष्ट्र विद्यालयात तिसरीपर्यंत शिक्षण घेतले. लहानपणीच ते मिरजच्या अपान्ना गंगावणे यांच्या मेळ्यात बुलबुलतरंग वाजवत व गाणीही म्हणत. हाच मेळा पुढे करमरकरांचा मेळा म्हणून प्रसिद्धीला आला. छोट्या वयातच राम यांना या मेळ्यात खूप संधी मिळाल्यामुळे लहान वयातच बक्षिसांबरोबरच त्यांचे कौतुकही खूप झाले.
राम कदम यांना लहान वयातच संत गाडगेबाबांबरोबर राहायला मिळाले. त्यांच्या भजनात राम कदम बुलबुलतरंगची साथ करीत. त्यांच्या वडिलांचे हॉटेल फारसे चालत नसे. गरिबीमुळे राम कदम यांनी मिरजेच्याच जनरल ब्रास बँडमध्ये नोकरी केली. सुरूवातीला हरकाम्या म्हणून ते कार्यक्रमामधली वाद्ये पुसत. तिथे त्यांनी एकदा क्लॅरियोनेट वाजवून पाहिले, म्हणून वादकाने त्यांच्या थोबाडीत मारली. त्या तिरमिरीत ‘मी स्वत:चे क्लॅरियोनेट घेऊनच परत येईन’, अशी प्रतिज्ञा करून ते घराबाहेर पडले. दुसऱ्या गावी जाऊन स्वत:च्या कमाईतून क्लॅरियोनेट घेऊनच मिरजेला परतले. मिरजेचे बँडमास्टर चांदलाल यांनी राम कदम यांना क्लॅरियोनेट वादनामध्ये तयार केले. मधल्या काळात त्यांना खाँसाहेब अब्दुल करीम खाँ यांच्याकडे गाणे शिकण्याची संधी मिळाली.
पुढे चांदलाल यांनीच कदम यांना पुण्याच्या ‘प्रभात’मध्ये काम करण्यासाठी पाठवले. ‘प्रभात’मध्ये मिरजेचे ई.महंमद हे छायाचित्रकार म्हणून उमेदवारी करत होते. त्यांनीच रामची प्रभातमध्ये वर्णी लावली. कदम सुरूवातीला गड्याचे काम करीत, पण वादक म्हणून त्यांची लवकरच बढती झाली. प्रभातमध्ये केशवराव भोळे व मा. कृष्णराव अशा दिग्गज संगीतकारांच्या हाताखाली त्यांना शिकायला मिळाले. शिवाय नवयुग व शालिमार स्टुडियोत ते क्लॅरियोनेट वाजवायला जात. तिथे अनेक संगीतकारांच्या हाताखाली काम करण्याचा अनुभव त्यांना मिळाला. त्यातून त्यांच्यामधला संगीतकार तयार होत गेला. सुधीर फडके व वसंत पवार यांचे साहाय्यक म्हणूनही त्यांनी काम केले.
१९५१ साली ‘गावगुंड’ या चित्रपटापासून कदम यांची कारकिर्द सुरू झाली. १९६५ पर्यंत - म्हणजे सुमारे पंचवीस चित्रपट होईपर्यंत त्यांना सूर सापडत नव्हता. ‘केला इशारा जाता जाता’ या चित्रपटापासून मात्र त्यांची घोडदौड सुरू झाली. याच सुमारास संगीतकार व लावणीसम्राट वसंत पवार यांचे निधन झाले. मग ‘लावणीचे शिवधनुष्य’ या रामने यशस्वीरीत्या पेलले.
लावणी व्यतिरिक्त मराठी लोकसंगीतातील झगडा, भूपाळी, विराणी, गवळण, भारूड, पोतराज, वासुदेव, नागोबाची - हळदीची गाणी, धनगरगीते, कोळीगीते, मोटेवरची गाणी, गौरी-हादगा-मंगळागौरीची स्त्रीगीते असे सर्व प्रकार त्यांनी मराठी रसिकांना दिले. ‘पिंजरा’ या शांतारामबापूंच्या चित्रपटामुळे कदम यांनी कर्तृत्वाच्या यशाचे शिखर गाठले. ४५ वर्षांच्या सांगीतिक कारकिर्दीत ११३ मराठी, ३ हिंदी, १ तेलगू चित्रपट व २५ नाटके या सार्यांतून दिलेल्या लोकसंगीतातून अस्सल मराठी मातीचे संगीत देताना त्यांनी प्रभातमधील अभिजात संगीताचे संस्कार तर जपलेच, शिवाय मराठी लावणीचे लावण्यही खुलवले.
राम कदम हे मराठी लोकसंगीताचे अनभिषिक्त सम्राट होते. सूरसिंगारचे ‘बृहस्पती अॅवॉर्ड’ व ‘स्वामी हरिदास पुरस्कार’, याशिवाय ‘एकटा जीव सदाशिव’ (१९७४), ‘सुगंधी कट्टा’ (१९७६), ‘पैज’ (१९८०) व ‘साईबाबा’ (१९९५) या चित्रपटांना उत्कृष्ट संगीताचे राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले होते. ‘संगीतकार राम कदम’ हे मधू पोतदार लिखित चरित्र प्रकाशित झाले आहे. राम कदम यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावाने संगीतातील मान्यवर व्यक्तींना दर वर्षी दोन पुरस्कार दिले जातात.