Skip to main content
x

कद्रेकर, श्रीरंग भार्गव

   श्रीरंग भार्गव कद्रेकर यांचा जन्म रत्नागिरी येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण रत्नागिरीमध्ये आणि महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले. पुण्याच्या कृषी महाविद्यालयातून त्यांनी आपल्या गुणवत्तेवर सरकारी शिष्यवृत्ती मिळवून १९५० साली बी.एस्सी. (कृषी) पदवी प्राप्त केली. श्रीरंग कद्रेकर हे कृषी खात्यात नोकरी करत असताना १९५८ मध्ये एम.एस्सी. झाले. कृषी विद्यापीठात नोकरी करत असताना त्यांनी १९७१ मध्ये रसायनशास्त्र व मृदाशास्त्र या विषयांत पीएच.डी.ची पदवी मिळवली. त्यांनी १९५० मध्ये मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगावयेथे संशोधक म्हणून नोकरीस प्रारंभ केला. वेगवेगळ्या जमिनीत ऊस पिकाचे पोषण व साखर उतारा, तसेच गुळाची प्रत आणि रंग, चव, टिकाऊपणा यांचा अभ्यास करून त्यांनी संशोधनात्मक लेख प्रसिद्ध केले.

पाडेगाव येथील १० वर्षांच्या संशोधनानंतर १९७७ पर्यंत कद्रेकर यांनी अकोला, कोल्हापूर व दापोली येथील कृषी महाविद्यालयात मृदाशास्त्र विषयाचे पदवीपूर्व व पदव्युत्तर अध्यापन केले. नंतर त्यांनी दापोली येथे ३ वर्षे कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम केले. डॉ. कद्रेकर यांनी कोकण कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता व कुलगुरू या नात्याने महाराष्ट्राच्या कोकण विभागात कृषी शिक्षण रुजवून फलोत्पादनाला चालना देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांनी कोकणवासीयांना कृषी विषयाचे व विद्यापीठाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जिवापाड मेहनत केली. मुलांना कृषी शिक्षणासाठी कृषी विद्यापीठात आकृष्ट करून कोकणातील विद्यार्थ्यांचा प्रवेश वाढवण्याचे काम त्यांना करावे लागले. कोकणात १९८७ नंतर मोठा फलोत्पादन कार्यक्रम हाती घेण्यात आला. त्यासाठी या प्रशिक्षित मनुष्यबळाचा मोलाचा उपयोग झाला.

कोकण कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना स्वतःच्या प्रक्षेत्रावर फलोत्पादन करण्यासाठी प्रवृत्त करून विद्यापीठाच्या रोपवाटिकांमधून दर्जेदार कलमे व रोपे केवळ कोकणातच नव्हे; तर संपूर्ण महाराष्ट्रात पुरवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यासाठी डॉ. कद्रेकर यांना वसंतराव नाईक प्रतिष्ठानचा फलोत्पादन पुरस्कार’ (१९९६) देण्यात आला. त्यांच्या प्रयत्नांमुळे कोकणच्या चारही जिल्ह्यांत शासनमान्य रोपवाटिका तयार झाल्या व अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला. डॉ. कद्रेकर सेवानिवृत्त झाल्यावर त्यांच्या शेती, फलोद्यान, मृदा व जलव्यवस्थापन या विषयांतील ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा करून घेण्यासाठी महाराष्ट्र जल व सिंचन आयोगावरकोकणचा प्रतिनिधी म्हणून व कोयना अवजल वापर विषयाच्या अभ्यास गटावर तज्ज्ञ म्हणून शासनाने त्यांची  नियुक्ती केली.

 - डॉ. श्रीपाद यशवंत दफ्तरदार

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].