Skip to main content
x

के, वेंकटरामन

भारतातील रसायनशास्त्राच्या विश्वात पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळाअर्थात नॅशनल केमिकल लॅबोरेटरीया संस्थेचे एक वेगळे स्थान आणि महत्त्व आहे. या प्रयोगशाळेला असे मानाचे स्थान प्राप्त करून देण्यामध्ये या प्रयोगशाळेचे पहिले भारतीय वंशाचे संचालक डॉ.के. वेंकटरामन यांचा सिंहाचा वाटा आहे.    

डॉ. के. वेंकटरामन यांना त्यांचे सहकारी आपुलकीने आणि आदराने के.व्ही.म्हणत असत. त्यांचा जन्म मद्रास (आताचे चेन्नई) येथे एका उच्चभ्रू कुटुंबात झाला. तीन मुलांत ते मधले होते.

केव्हींचे प्रारंभीचे शिक्षण चेन्नई येथे झाले. त्यांनी १९२३ साली रसायनशास्त्रात एम. ए. ही पदवी प्राप्त केली. त्या काळात प्रेसिडेन्सी महाविद्यालय शिकवणार्‍या प्रा. बी. बी. डे यांचा त्यांच्यावर खूपच प्रभाव पडला होता. याच बी. बी. डे यांचे दुसरे नावाजलेले विद्यार्थी म्हणजे डॉ. टी. आर. शेषाद्री. नंतर मद्रास सरकारची शिष्यवृत्ती मिळवून केव्ही मँचेस्टर विद्यापीठामध्ये गेले. तेथील नावाजलेले रसायनशास्त्रज्ञ सर रॉबर्ट रॉबिन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी एम.एस्सी. (टेक्नॉलॉजी), पीएच.डी. आणि डी.एस्सी. या पदव्या प्राप्त केल्या.

१९२७ साली भारतात परत आल्यावर, एक वर्ष केव्ही यांनी बंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूटट ऑफ सायन्सया संस्थेत फेलोम्हणून काम केले. नंतर १९२८ साली त्यांनी लाहोर येथील त्या वेळच्या नावाजलेल्या ख्रिश्चन महाविद्यालयामध्ये अधिव्याख्याता म्हणून नोकरी पत्करली. लाहोर येथे या काळात केलेल्या संशोधनावर आधारित ए सिन्थेसिस ऑफ फ्लेवर अ‍ॅट रूम टेंपरेचरहा त्यांचा शोधनिबंध करंट सायन्सया संशोधनपत्रिकेत १९३३ साली प्रकाशित झाला. त्यांचे हे रसायनशास्त्रातील एक मूलभूत संशोधन कार्य होते. परंतु योगायोग असा की, त्याच सुमारास डब्ल्यू. बेकर नावाच्या संशोधकानेसुद्धा केव्हींसारखेच काम करून एक शोधनिबंध जर्नल ऑफ केमिकल सोसायटीया संशोधनपत्रिकेत प्रकाशित केला. फ्लेवोन्स ही रसायने तयार करण्याची प्रक्रिया त्यामुळे या दोघांच्याही नावांवर नोंदली गेली. बेकर-वेंकटरामन ट्रान्सफॉर्मेशनकिंवा बीव्ही ट्रान्सफॉर्मेशननावाने ओळखली जाणारी ही प्रक्रिया वापरून आजही रसायनशास्रज्ञ फ्लेवोन्स तयार करतात.

केव्हींच्या या मूलभूत आणि उच्च दर्जाच्या संशोधनामुळे १९३४ साली मुंबई विद्यापीठाने त्यांना इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये’ (आय.सी.टी.) मध्ये प्रपाठक म्हणून नेमणूक दिली. त्या वेळी आय. सी. टी.चे संचालक विख्यात वैज्ञानिक आर. बी. फोस्टर हे होते. ते १९३८ साली निवृत्त झाल्यावर प्राध्यापक आणि आय. सी. टी.चे संचालक म्हणून केव्हींनी धुरा सांभाळली. नंतरची १९ वर्षे ते या पदावर होते. त्यांचे रसायनशास्त्राचे सखोल ज्ञान, प्रशासकीय कामावरील पकड, नेतृत्वगुण आणि कर्तव्यकठोर वृत्ती यांमुळे अल्पावधीतच आय.सी.टी. नावारूपाला आली. त्यामुळे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आय.सी.टी.च्या सभागृहाला २४ डिसेंबर २००६ रोजी केव्हींचे नाव देण्यात आले.

आय. सी. टी.तल्या या वास्तव्यात केव्हींनी फ्लेवोनाइडस जातीच्या रंगावर संशोधन तर केलेच; पण त्याबरोबर त्याची संरचना, ते वापरण्याच्या पद्धती इत्यादी वस्त्रोद्योगांना लागणाऱ्या विविध प्रक्रियांवरदेखील संशोधन केले. त्यांच्या ऋणातून अंशत: मुक्त होण्यासाठी त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी मुंबई येथे इंडियन डायस्टफ इंडस्ट्रीज लिमिटेडया संस्थेची स्थापना केली. भारतीय उद्योगविश्वाने स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण व्हावे असे केव्हींना वाटत असे. त्याविषयी ते आग्रही होते. त्यांनी डाइजमधल्या सखोल ज्ञानाचा वापर करून केमिस्ट्री ऑफ सिन्थेटिक डाय अँड अ‍ॅनालिटिकल केमिस्ट्री ऑफ सिन्थेटिक डायअसे शीर्षक असलेले आठ भागांचे पुस्तक लिहिले. त्यांच्या डाइज आणि डाइज इंडस्ट्रीच्या व्यासंगामुळे दुसऱ्या महायुद्धात अपरिमित हानी होऊन जवळपास उद्ध्वस्त झालेल्या आय.जी.फारबिन इंडस्ट्री (ए.जी.) या जर्मन उद्योगाने त्यांना बोलावले आणि उद्योगाचा विकास कसा करता येईल, यावर त्यांच्याशी सखोल चर्चा केली.

१९५७ साली केव्हींनी पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक म्हणून सूत्रे हाती घेतली. त्यांच्याआधी प्रा. जी. आय. फिंच हे संचालक होते. एकदा राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत आल्यावर मात्र केव्ही शेवटपर्यंत तिथेच रमले. ते १९६६ साली तेथूनच निवृत्त झाले. त्याच सुमारास त्यांना दम्याचा त्रास सुरू झाला. तरीही त्यानंतर कितीतरी काळ, म्हणजे जवळपास दहा वर्षे त्यांनी स्वत:ला संशोधनकार्यात गुंतवून घेतले होते. केव्ही त्यांच्या मृत्यूपर्यंत कार्यमग्न होते.

केव्हींची संशोधनकार्यावरची निष्ठा, ध्येय आणि उद्दिष्ट निश्चित केल्यावर अविश्रांतपणे त्यांचा पाठपुरावा करण्याची वृत्ती आणि प्रशासकीय कामातले कौशल्य यांमुळे पुण्याची राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा थोड्याच कालावधीत रसायनशास्त्रातील संशोधकांचे मोहोळ बनले. भारतातील नावाजलेले रसायनशास्त्रज्ञ तेथे आले. नॅचरल प्रॉडक्ट्स अँड सिन्थेटिक ऑरगॅनिक केमिस्ट्रीया क्षेत्रात राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेची कीर्ती सर्वदूर पसरली. तो दबदबा आणि कीर्ती अद्यापही कायम आहे.

केव्ही नुसतेच नावाजलेले संशोधक नव्हते, तर ते एक उत्कृष्ट शिक्षकपण होते. त्यांच्यापासून अनेक विद्यार्थ्यांनी स्फूर्ती घेतली. प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांबरोबर काम करता करता, ते त्यांना संशोधनपत्रिकांमधून शोधनिबंध कसे लिहावेत, प्रयोगांमधून आणि प्रात्यक्षिकांद्वारे मिळालेले निष्कर्ष कसे नोंदवून ठेवावेत आणि त्यांचा शोधनिबंध लिहिण्यासाठी कसा उपयोग करावा, हे समजावून सांगत. शासकीय समित्यांवर काम करण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या सहवासात वेळ व्यतीत करणे त्यांना आवडत असे. विद्यार्थ्यांबरोबर वेळ घालवण्याच्या काळात एखाद्या शासकीय समितीची बैठक असली, तर केव्ही त्या बैठकीला गैरहजर राहात. आय.सी.टी.मध्ये असताना अनेक नवनवीन अभ्यासक्रमांची त्यांनी तेथे सुरुवात केली. अनेक उद्योजक आणि कारखानदार यांच्याबरोबर त्यांनी स्नेहाचे आणि आपुलकीचे संबंध प्रस्थापित केले. अभ्यासक्रमातील विषयांचा प्युअरआणि अप्लाइडअसा फरक दूर करून त्यांनी दोन्हींचा संगम घडवून आणला.

देशातील तसेच परदेशातील नावाजलेल्या वैज्ञानिकांनी, उद्योजकांनी आणि शास्त्रज्ञांनी तेथे येऊन विद्यार्थ्यांबरोबर संवाद करावा, त्यांच्यासमोर भाषणे द्यावीत यांसाठी केव्ही सतत प्रयत्नशील होते. त्यांच्या संशोधनकार्याचे अगदी थोडक्यात वर्णन करायचे झाले तर, ८५ विद्यार्थ्यांना त्यांनी पीएच.डी. पदवीसाठी मार्गदर्शन केले आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संशोधनपत्रिकांमधून २५० शोधनिबंध प्रकाशित केले.

केव्हींना आयुष्यात अनेक मानसन्मान मिळाले. इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी, नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स, इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस, पोलिश अकॅडमी ऑफ सायन्स आणि इतर अनेक संस्थांचे ते फेलो होते. इंडियन केमिकल सोसायटीचे ते अध्यक्ष होते, तर इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीचे उपाध्यक्ष होते. अनेक शास्त्रज्ञांच्या आणि वैज्ञानिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ठेवली गेलेली पदके त्यांना मिळाली होती. भारत सरकारचा पद्मभूषणहा सन्मानही त्यांना मिळाला होता. इंडियन जर्नल ऑफ केमिस्ट्रीया संशोधनपत्रिकेच्या संपादकीय मंडळावर त्यांनी अनेक वर्षे काम केले.

- डॉ. यशवंत देशपांडे

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].