केळकर, अशोक रामचंद्र
अशोक केळकर यांचा जन्म पुणे येथे झाला. १९५० साली पुणे विद्यापीठातून इंग्लिश विषयात एम.ए. पदवी मिळाल्यानंतर त्यांनी रॉकफेलर प्रतिष्ठानची मानाची शिष्यवृत्ती मिळवली. त्यायोगे ते अमेरिकेतील प्रसिद्ध कॉर्नेल विद्यापीठात १९५६पासून १९५८ पर्यंत राहिले. भाषाविज्ञान या त्यांच्या आवडीच्या विषयाचा विशेष अभ्यास करून त्यांनी पीएच.डी. पदवी मिळवली. मराठी रचनाव्यवस्था आणि पदव्यवस्था हा विषय प्रबंधासाठी घेऊन, तौलनिक साहित्य व समीक्षा यांचाही अभ्यास त्यांनी केला. भारतात परतल्यावर पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयामध्ये त्यांनी प्राध्यापक या नात्याने काम केले.
भाषा, शिक्षण आणि साहित्य यांसंबंधी अनेक शोधनिबंध, लेख व परीक्षणे इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांत त्यांनी प्रसिद्ध केली. ‘चांगला साहित्य समीक्षक हा शेवटी चांगला जीवन समीक्षकही असतो’, असे प्रतिपादन करून ते लिहितात की विविध विज्ञान, हस्तकला, तत्त्वज्ञान, वैचारिक कसदारपणा ह्या गोष्टी मराठी माणसाच्या संस्कृतीतच आढळत नाहीत. मग त्या मराठी साहित्य समीक्षेत कुठून येणार? भाषाविज्ञानाची अभ्यास पद्धती साहित्य क्षेत्रात वापरली गेली, तर साहित्याच्या अभ्यासाला वेगळे परिमाण लाभू शकेल, असा विश्वास ते व्यक्त करतात. केळकर म्हणतात, ‘सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे साहित्य कसे शिकवावे, साहित्याबद्दलच्या मर्मदृष्टीचा विद्यार्थ्यांत कसा विकास करावा, ह्याबाबत भाषाविज्ञान मौलिक मदत करू शकते’.
आग्रा विद्यापीठात १९५८ पासून १९६२ पर्यंत व नंतर डेक्कन महाविद्यालयात व पुणे विद्यापीठात अध्यापन करून १९८९ साली केळकर प्राध्यापक पदावरून ते निवृत्त झाले. आधुनिक भाषाविज्ञानाचे व्यासंगी असणार्या डॉ.केळकरांची भारतातील मोजक्या भाषा वैज्ञानिकांमध्ये गणना होते. मौलिक चिंतन, व्यापक आणि सखोल दृष्टी यांमुळे केळकरांची विद्वत्ता केवळ पुस्तकी, एकसुरी व बोजड झाली नाही. विद्यापीठीय, सरकारी व आंतरराष्ट्रीय स्तरांवर भाषाविज्ञान विषयक अनेक समित्या व परिषदा यांत त्यांनी भाग घेतला. आपल्या समृद्ध ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा करून दिला.
मराठी भाषेची सर्वांगीण अभिवृद्धी होऊन तिचे सार्वदेशिक महत्त्व व सामर्थ्य वाढावे, ह्यासाठी तपस्व्याच्या निष्ठेने तिच्या सेवेत रत राहणार्या काही थोड्या साहित्य सेवकांपैकी केळकर हे एक आहेत. १ जानेवारी १९८२ रोजी त्यांनी ‘मराठी अभ्यास परिषद’ स्थापन करून समविचारी व्यक्तींच्या मदतीने आणि परिषदेच्या वतीने जुलै १९८३ पासून ‘भाषा आणि जीवन’ नावाचे एक त्रैमासिक सुरू केले. या त्रैमासिकाचे उद्दिष्ट अत्यंत व्यापक तसेच दूरदृष्टीचे आहे. साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना प्राप्त झाला असून सरकारने ‘पद्मश्री’ ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला.
केळकरांची ग्रंथसंपदा पुढीलप्रमाणे असून त्याव्यतिरिक्त नियतकालिकांतून त्यांनी अनेक लेख प्रसिद्ध केले. ‘मराठी भाषेचा आर्थिक संसार’ (१९७७), ‘प्राचीन भारतीय साहित्य मीमांसा : एक आकलन’ (१९७९), ‘वैखरी: भाषा आणि भाषा व्यवहार’ (१९८३) ‘भेद विलोपन: एक आकलन’ (१९९५), ‘मध्यमा: भाषा आणि भाषा व्यवहार’ (१९९६), ‘स्टडीज इन हिंदी-उर्दू इन्ट्रोडक्शन अॅन्ड वर्ल्ड फोनॉलॉजी’ (१९६८) हा ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहे. स्वत:च्या काही पुस्तकांचे त्यांनी हिंदीत, गुजरातीत अनुवाद केले आहेत.