Skip to main content
x

कॅमरीश, स्टेला

          भारतीय कलेच्या पद्धतशीर अभ्यासाचा पाया घालणाऱ्या प्रोफेसर स्टेला क्रॅमरिश म्हणजे साऊथ एशियन आर्टया विषयावरील एक नामवंत अधिकारी कला इतिहासतज्ज्ञ, शांतिनिकेतनातील उत्कृष्ट शिक्षिका, भारतीय कलांना जागतिक व्यासपीठावर नेणाऱ्या गाढ्या अभ्यासक आणि फिलाडेल्फिया येथील कला संग्रहालयाच्या माजी अधीक्षिका होत. ऑस्ट्रियातील निकोल्सबर्ग येथे जन्मलेल्या स्टेला कॅमरिश अचाट बुद्धिमत्ता घेऊन आल्या. व्हिएन्ना युनिव्हर्सिटीत जोसेफ स्ट्रायगॉझस्की यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण पूर्ण करत असतानाच आपल्या विचार-वैशिष्ट्यांमुळे त्या इतरांपेक्षा प्रभावी ठरल्या. विद्यार्थिदशेत असताना चित्रकार कॅन्डेन्स्की यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. कलेच्या विशुद्ध अंतरंगाचा शोध घेणे आणि तिच्यातील अंंतस्थ संरचना जाणून घेणे, त्यांना अधिक महत्त्वाचे वाटू लागले. रूडॉल्फ स्टेनर या तत्त्ववेत्त्याच्या विचारांचा प्रभावही कॅमरिश यांच्या त्या वेळच्या लिखाणामधून स्पष्ट दिसत असे. बाह्य साधने आणि आपली ज्ञानेंद्रिये यांतून मिळणार्या ज्ञानाबरोबरच अंतस्थ प्रेरणेतून मिळणार्या ज्ञानानुभूतीवर त्यांचा विश्वास होता. म्हणूनच विद्यार्थिदशेपासूनच समरसून जीवनानुभव घेण्याकडे त्यांचा कल होता.

१९२१ मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतनमध्ये कला शिक्षण देण्यासाठी त्यांना निमंत्रित केले. पाश्चात्त्य कलाजगताशी पूर्णपणे अनभिज्ञ असणार्या येथील भारतीय विद्यार्थ्यांना त्यांनी इम्प्रेशनिझम ते क्युबिझमपर्यंतच्या कलाप्रवासाचे धडे तर दिलेच, शिवाय कलावंतांच्या विविध संकल्पना, कला निर्मितीमागचे चित्रकारांचे दाखले देऊन विद्यार्थ्यांसमोर मांडले. चित्राच्या विषयापलीकडे जाऊन त्यातील अंतर्गत रचनेकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना दिली. त्यांचेच एक विद्यार्थी विनोदबिहारी मुखोपाध्याय त्यांच्याविषयी लिहितात - ‘‘आपल्यापैकी बहुतेकांना आर्ट हिस्टोरियन म्हणून स्टेला क्रॅमरिश परिचित असल्या, तरी भारतीयांना आधुनिक कला-दृष्टी देण्यामध्ये त्यांचे योगदान फार मोठे आहे. आधुनिक विचार, प्रयोग, वेगवेगळ्या माध्यमांचा वापर इत्यादींशी परिचय घडविण्याचे कार्य तर त्यांनी केलेच; त्याचबरोबर भारतीय कलेचा आत्मा कशात आहे, तेही सप्रमाण दाखवून दिले.’’

त्या स्वतः उत्कृष्ट नर्तिका होत्या आणि शांतिनिकेतनातील विद्यार्थ्यांना सांगीतिक कवायती शिकवत असत. त्या जर्मन भाषेच्या उत्तम शिक्षिका देखील होत्या.

शांतिनिकेतनात राहत असतानाच स्टेला यांची भारतीय संस्कृतीशी खऱ्याअर्थाने ओळख झाली. तिथे होणाऱ्या अनेकविध सांस्कृतिक कार्यक्रमांत त्यांचा सहभाग असे. रवींद्रनाथ टागोर यांच्या सहवासात भारत खऱ्या अर्थाने कळलाअसे त्या म्हणत. भारतातील वास्तव्यात त्यांनी हिंदू आणि बौद्ध कलांचा सखोल अभ्यास केला. विशेष म्हणजे, त्यांचा हा अभ्यास केवळ विविध क्षेत्रांच्या भेटीपुरता मर्यादित न राहता, हिंदू धर्म आणि त्यातील संस्कृत ग्रंथांच्या गाढ अभ्यासापर्यंत विस्तारित झाला. भारतीय कलेवरील त्यांच्या लिखाणाला स्वानुभवातून लावलेल्या अन्वयार्थाचे परिमाण तर होतेच; त्याचसोबत ग्रंथाभ्यासातून आलेले विद्वत्तापूर्ण अधिष्ठानही लाभले. त्यांच्या हातून भारतीय संस्कृती, कला आणि धर्म यांच्या सखोल अभ्यासातून विपुल ग्रंथरत्नांची निर्मिती झाली.

‘Principles of Indian Art’ (१९२४), ‘Indian Sculpture’ (१९३२), ‘A Survey of painting in the Deccan’ (१९३७),  ‘Indian Terracottas’ , ‘Crafts of Travancore’ (१९६८) ही पुस्तके, त्यांची अफाट बुद्धिमत्ता, सखोल अभ्यास आणि नसानसात भिनलेली शुद्ध भारतीय आध्यात्मिकता यांची साक्ष देतात. १९३२ ते १९५० या काळात ‘Journal of the Indian Society of Oriental Art’ या प्राच्यविद्याविषयक अंकाचे त्यांनी सहसंपादन केले. १९३७ ते १९४१ या काळात भारतीय कलाया विषयावरील त्यांनी Courtauld Institute, London इथे दिलेली व्याख्याने गाजली. १९५०नंतर अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे त्या स्थलांतरित झाल्या. पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठात त्यांनी South Asian Art या विषयाचे अध्यापन केले. फिलाडेल्फिया कला संग्रहालयात भारतीय कला विषयाच्या अधीक्षिका म्हणून त्या कार्यरत झाल्या. भारतीय कलेचा संपूर्ण जगात प्रसार करण्याचे मोठे कार्य स्टेला कॅमरिश यांनी केले.

अध्यापन आणि लेखन यांशिवाय स्टेला या कला प्रदर्शनांच्या कुशल संयोजिका म्हणून नावाजल्या जात असत. फिलाडेल्फिया आर्ट म्यूझिअममध्ये त्यांनी भरविलेल्या ‘Unknown India: Ritual Art in Tribe and Village’ (१९६८), ‘Himalayan Art’ (१९७८) . प्रदर्शनांना उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. १९८१ मध्ये त्यांनी याच म्युझिअममध्ये सादर केलेला ‘Manifestations of Siva’ हा प्रयोग गाजला.

भारतीय कलेचा अभ्यास केवळ सौंदर्यशास्त्राच्या वैश्विक तत्त्वांचा मापदंड लावून न करता वैविध्यपूर्ण भारताच्या त्या-त्या ठिकाणाचे सांस्कृतिक, सामाजिक संदर्भ, त्या कलाकृतीमध्ये प्रतीत होणारे पुराकथांचे अंश, भारतीय तत्त्वज्ञान या साऱ्या बाबी लक्षात घेऊन व्हायला हवा,’ असे स्टेला क्रॅमरिश यांचे मत होते. तोपर्यंतचे कला अभ्यासक काळानुसार अथवा शैलीनुसार चित्रांचे अथवा शिल्पांचे रूढ पद्धतीने वर्गीकरण करीत असत. तसे न करता वरील संदर्भांनुसार वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून कलाकृतीकडे पाहायला हवे असे त्या म्हणत. कॅमरिश यांच्या लिखाणात निव्वळ कलाकृतीकडे न पाहता, ती घडविणारे कलावंत, त्यांचे आश्रयदाते आणि आर्थिक मदत पुरविणारा धनिकवर्ग यांच्याबाबतचे विचार त्यांच्या ‘Artist Patron and Public in India’ (१९५४), ‘Traditions of the indian Craftsman’ (१९५८) यासारख्या लेखातून आढळतात.

स्टेला क्रॅमरिश भारतीय लोककलांच्या संदर्भातही मोलाचे विचार मांडतात. भारताच्या खेड्या-पाड्यांमधून राहणाऱ्या विविध जाती-जमातींच्या जीवनाचे एक अंग बनून राहिलेल्या कलांचा अभ्यास मानववंशशास्त्राच्या दृष्टीकोनातून व्हायला हवा, असे त्यांना वाटे. धार्मिक कार्याच्या वेळी काढलेली भित्तिचित्रे असोत किंवा कलाकुसरीने युक्त अशी खेळणी, मुखवटे आणि अन्य वस्तू असोत, या साऱ्यांचा संग्रह करून त्याचे प्रयत्नपूर्वक जतन व्हायला हवे, अशी त्यांना तळमळ होती.

बौद्ध आणि हिंदू शिल्पकलेतून व्यक्त होणारी अभिजातता हा तर त्यांच्या हृदयाला भिडलेला विषय होता. आध्यात्मिक अनुभवांवर विश्वास असणार्या स्टेला क्रॅमरिश यांना शिल्पांकडे पाहताना विलक्षण अनुभूती येत असे. एलिफंटा येथील महादेवाची शिल्पाकृती त्यांना विशेष आवडत होती. भारतीय शिल्पाकृतींची जडणघडण ही केवळ बाह्य साधनांनी केलेली निर्मिती नसून ही प्रक्रिया म्हणजे जणू काही भारतीयांच्या आध्यात्मिक सूक्ष्म देहाचे दगडामध्ये झालेले रूपांतरण होय, असे त्यांना वाटे. गुप्त, पाल, सेन आणि चंदेेला यांच्या काळातील भारतीय स्थापत्यकला, शिल्पकला आणि चित्रकला यांचा सखोल अभ्यास करून स्टेला यांनी त्यांची निरीक्षणे पद्धतशीररीत्या तर मांडलीच; पण त्याहीपेक्षा स्थूलतेमागे सतत जाणवणारे सूक्ष्माचे अधिष्ठान, भौतिकतेकडून अभौतिकतेकडे नेणारी भारतीय कलेतील जबरदस्त ताकद, मूर्तामागे दडलेले अमूर्त तत्त्व आणि बाह्य सौंदर्याकडून आत्मिक सौंदर्यात परिवर्तन होत जाणारी भारतीय मूल्ये यांचे सातत्य त्यांच्या लेखनामधून जाणवते. भारतीय स्थापत्यकला, शिल्पकला इत्यादींचे शास्त्रीय पद्धतीने केलेले विश्लेषण आणि त्याचबरोबर भारतीयांची धार्मिक मानसिकता आणि तत्त्वज्ञानांची बैठक यांचा सुरेख संगम स्टेला क्रॅमरिश यांच्या ग्रंथसंपदेत आढळून येतो.

 जन्माने ऑस्ट्रियन असणाऱ्या स्टेला कॅमरिश मनाने मात्र पूर्णपणे भारतीय होत्या. विश्वभारतीने १९७४ साली देशिकोत्तम्ही पदवी त्यांना बहाल करून त्यांनी केलेल्या कार्याचा यथोचित गौरव केला, तर  १९८२ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषणपुरस्काराने सन्मानित केले.स्टेला यांचे १९९३ साली, फिलाडेल्फिया येथे देहावसान झाले.

डॉ. सीमा सोनटक्के

कॅमरीश, स्टेला