Skip to main content
x

कीर, गिरिजा उमाकांत

संवेदनशील साहित्यिक गिरिजा कीर यांचा जन्म धारवाड येथे झाला. गिरिजाताई पूर्वाश्रमीच्या रमा नारायणराव  मुदवेडकर. त्यांना लहानपणापासून लेखनात आणि वाचनात अभिरुची होती. मुंबई विद्यापीठाची बी.ए. ही पदवी त्यांनी मिळवली. स्वातंत्र्योत्तर काळात स्त्रियांच्या नियतकालिकांची संख्या बरीच होती. त्यात स्त्रियांचे अधिकाधिक लेखन प्रसिद्ध केले जाई. त्या काळात गिरिजाताईंनी कथालेखन करण्यास प्रारंभ केला. त्यांच्या कथा ‘माहेर’, ‘मानिनी’, ‘ललना’, ‘अनुराधा’, ‘प्रपंच’ या मासिकांतून प्रसिद्ध झाल्या. वि.स.खांडेकर यांच्या लेखनाचा प्रभाव त्यांच्या लेखनावर असल्याचे जाणवते.

१९६८ ते १९७८ या काळात त्यांनी ‘अनुराधा’ मासिकाच्या साहाय्यक संपादिका म्हणून काम केले. बालसाहित्यात कुमारगटासाठी लेखन करणाऱ्या महत्त्वाच्या लेखकांमधील त्या एक होत. ‘वेताळनगरी आणि साहसी हेमचंद्र’, ‘परीकथांच्या तोंडवळ्याची कथा’, ‘चंद्रावर सफर’, ‘उंटा उंटा कवडी दे’ या कथासंग्रहांप्रमाणे ‘खूप खूप गोष्टी’, ‘देणारे हात’, ‘साहसकथा’, ‘शूरांच्या कथा,’ ‘नीलाराणीचा दरबार’, ‘कुमारांच्या कथा’ इत्यादी कुमार साहित्य त्यांनी लिहिले. ‘झालाच पाहिजे व इतर नाटिका’, ‘ए बम्बै की राणी देखो आणि इतर नाटिका’ ही नाटिकांची पुस्तकेही त्यांनी लिहिली. रंजन व प्रबोधनपर लेखन करताना गिरिजाताईंनी चरित्रपर पुस्तकात ‘देवी अहल्याबाई होळकर, राजा राममोहन रॉय, महात्मा जोतिबा फुले’ इत्यादी समाजकार्य-कर्तृत्व असलेल्यांचा आलेख गोष्टीरूपातून मांडला.

प्रवासवर्णन लिहीताना ‘प्रवासवर्णन’ या शीर्षकाचेच पुस्तक १९८९ मध्ये प्रकाशित झाले. त्याचप्रमाणे ‘तसूभर जमीन मनभर आकाश’ हेही प्रवासवर्णनावर आधारित पुस्तक लक्षवेधी आहे. सत्तरच्या दशकात त्यांचे अनेक कथासंग्रह प्रसिद्ध झाले. त्यात ‘चांदण्यांचं झाड’, ‘देवखुणा’, ‘गिरकी’, ‘चाहूल’, ‘गिरिबन’, ‘अनिकेत’ इत्यादींचा उल्लेख करता येईल. ‘पूर्णपुरुष’ (१९७०), ‘चक्रवेध’ (१९७७), ‘स्वप्नात चंद्र ज्याच्या’ (१९७८), ‘आभाळमाया’ (१९८५), ‘आत्मकथा’ (१९९१), ‘झपाटलेला’ (१९९४), ‘चाहूल’ (१९७९), ‘अभिशाप’ (१९७९) इत्यादी कादंबर्‍यांत रोजच्या जीवनातील घटना प्रसंगांवर आधारित कथानक आहे. वास्तवाचे आदर्श चित्रण करणे गिरिजा कीर यांना आवडत असे .

‘गाभाऱ्यातील माणसं’ (१९७२) या पुस्तकातील व्यक्तिचित्रे कथात्मक आहेत. सामाजिक प्रश्नांसंबंधीची तळमळ असल्याने प्रत्यक्ष आदिवासी भागात जाऊन, कुष्ठरोगी वस्तीत जाऊन, त्यांची सुख-दु:खे जाणून मग त्यावर लेखन केले . ‘अनोळखी ओळख’ या पुस्तकात त्यांनी अनुताई वाघ यांचे हृद्य चित्रण रेखाटलेले दिसते. त्याचप्रमाणे ‘डायरेक्टर जनरल ऑफ पोलिस’ सूर्यकांत जोग तसेच जेलर जे.एस.कुर्डुकर यांचे काम जाणून घेऊन त्यांच्या कार्यकुशलतेचे, समग्र व्यक्तिमत्त्वाचे चित्रण या पुस्तकात केले . ‘कलावंत’ (१९९९) या पुस्तकात कलाकारांच्या मुलाखती आहेत. कलावंताचे घर, त्याचे जगणे-वागणे, कृती-भावना याचे बारकाईने चित्रण करून त्या-त्या कलेची, कलाकारांच्या, सर्वांगीण व्यक्तिमत्त्वांची ओळख त्यांनी करून दिली . त्यात सुमती गुप्ते-जोगळेकर, लीला चिटणीस इत्यादी अभिनेत्रींप्रमाणेच मेकअपमन, पटकथाकार, पडद्यामागे काम करणारी कलावंत मंडळी यांची व्यक्तिचित्रणेही या पुस्तकात आहेत. ‘साहित्य सहवास’ (१९९७) या पुस्तकात साहित्यिकांची ओळख करून देताना दुर्गा भागवत, विंदा करंदीकर अशा दिग्गज साहित्यिकांचे व्यक्तिचित्रण यात आहे. मुलाखत घेताना लेखिका मनाच्या तळापर्यंत जाऊन त्या व्यक्तीला बोलते करतात आणि त्यातून त्यांचे लेखन अधिक वास्तवदर्शी अन् बोलके झाल्याचे दिसते. विविध वाङ्मय-प्रकारांत लेखन करत आजपर्यंत त्यांची ७८ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. विविध साहित्य संमेलनांत, चर्चात्मक कार्यक्रमांत, साहित्यविषयक सभा-संमेलनांत त्यांचा विशेष सहभाग असे .

आजपर्यंत मिळालेल्या पुरस्कारांत महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ‘ह.ना.आपटे पुरस्कार’ (१९८०) ‘अनिकेत’ या कादंबरीला मिळाला. त्यांच्या साहित्यविषयक कामगिरीसाठी त्यांना ‘महाराष्ट्र राज्य साहित्य मंडळाचा विशेष पुरस्कार’ (१९९७),सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाचा पुरस्कार (२०१३) हे पुरस्कार मिळाले. याखेरीज पुणे मराठी ग्रंथालयाचा कमलाबाई टिळक पुरस्कार तसेच अभिरुची पुरस्कार आणि मुंबईचा श्री अक्षरधन महिला साहित्य पुरस्कार असे पुरस्कार त्यांना मिळाले. 

अशा या संवेदनशील लेखिकेचे  अल्पशा आजाराने निधन झाले.

- डॉ. रजनी अपसिंगेकर

 

कीर, गिरिजा उमाकांत