कोल्हटकर, महादेव काशिनाथ
महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या काळात व्यावसायिक व्यक्तिशिल्पे घडविणारे बडोद्यातील कलावंत व ब्रॉन्झ कास्टिंगच्या कामात प्रावीण्य मिळवणारे कुशल तंत्रज्ञ म्हणून महादेव काशिनाथ कोल्हटकर यांचा नावलौकिक होता.
त्यांचे वडील नवसारी येथे साहाय्यक तुरुंगाधिकारी होते. त्यांचे १९०२ च्या प्लेगच्या साथीत निधन झाले, त्यामुळे त्यांची पत्नी दोन अपत्यांसह एका नातेवाइकाच्या मदतीने बडोद्यात राहू लागली. लहान वयापासूनच महादेव कोल्हटकर गणपतीच्या मूर्ती करून घरखर्चासाठी मदत करीत. बडोदा येथे १८९० मध्ये ‘हुन्नर शाळा’ (क्राफ्ट स्कूल) म्हणून स्थापन झालेल्या ‘कलाभवन’ संस्थेत १९०३ मध्ये त्यांनी प्रवेश घेतला व शिवलाल उगारचंद सलाट नावाच्या शिल्पकार शिक्षकांकडून शिल्पकलेचे शिक्षण प्राप्त केले.
त्यांनी १९०७ मध्ये ‘जी.डी. आर्ट, मॉडेलिंग’ ही अंतिम परीक्षा मुंबई येथील सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथे जाऊन दिली व त्यात ते उत्तम प्रकारे उत्तीर्ण झाले. त्या काळात बडोदा, इंदूर, धार, ग्वाल्हेर अशा अनेक संस्थानांमधील विद्यार्थी मुंबईत येऊन सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये परीक्षा देत असत. कलाभुवनमधून शिवलाल मास्तर निवृत्त झाल्यावर त्यांच्या जागी कोल्हटकर यांची नेमणूक झाली. कलाभवनचे संस्थापक टी.के.गज्जर यांनी या तरुण व होतकरू शिल्पकाराला भरपूर प्रोत्साहन दिले. त्यातून कोल्हटकरांना शिल्पांच्या ओतकामाची फाउण्ड्री व ब्रॉन्झमधील कास्टिंगचा अनुभव घेता आला व ते व्यक्तीला समोर बसवून शिल्प बनविण्याच्या कलेसोबतच मातीमध्ये घडविलेल्या वास्तववादी व्यक्तिशिल्पाचे ‘लॉस्ट वॅक्स’ पद्धतीने पंचधातूत रूपांतर करण्यास शिकले. वस्तुत: ही कला भारतीय परंपरेत पूर्वीपासून होती व येथील देवदेवतांच्या किंवा बस्तरसारख्या लोककलेच्या मूर्ती याच प्रकारे तयार होत होत्या. परंतु तत्कालीन संस्थानिक व प्रतिष्ठित मंडळींना पाश्चिमात्य कला व संस्कृतीबद्दल वाटणाऱ्या आकर्षणातून ते या प्रकारची चित्र-शिल्पांची कामे पाश्चिमात्य देशांतील ब्रिटिश, फे्ंरच किंवा इटालियन चित्र-शिल्पकारांकडून करून घेत असत.
या परंपरेला प्रथमत: छेद दिला तो मुंबईच्या रावबहादूर गणपतराव म्हात्रे यांनी. त्यांच्यानंतरच्या काळातील तालीम व करमरकर, तसेच कलकत्ता (कोलकाता) व मद्रास (चेन्नई) येथील शिल्पकारांनी ही परंपरा पुढे चालविली. त्याच परंपरेत विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात महादेव काशिनाथ कोल्हटकरांनी बडोद्यासारख्या प्रगतिशील संस्थानात याची सुरुवात केली व बडोद्यातील शिल्पकारही प्रत्यक्ष शिल्प घडविणे व त्याचे ब्राँझमध्ये रूपांतर करण्याच्या कलेचे काम करू शकतात हे सिद्ध केेले. यातून त्यांना बडोद्याच्या राजघराण्यातील व्यक्तींची अर्धशिल्पे तयार करण्याचे काम मिळाले. यानंतर त्यांनी लाहोर येथील सर गंगाराम या दानशूर गृहस्थाचा पुतळा तयार केला. वास्तविक सर गंगाराम यांचा पुतळा पूर्वीच एका इटालियन शिल्पकाराने तयार केला होता. परंतु तो पसंत न पडल्यामुळे हे काम कोल्हटकरांकडे आले व त्यांनी ते यशस्विरीत्या पूर्ण केले.
त्यांची शिल्पे देशात अनेक ठिकाणी लागली आहेत. हिमालयातील मानसरोवर येथील हंसवाहिनी लक्ष्मीची मूर्ती, विजयनगर येथील कृष्णदेवराय यांचे पूर्णाकृती शिल्प, द्वारकेचे शिवस्मारक व त्याच्याच उदेपूर, धार, फलटण येथे असलेल्या प्रतिकृती, सिमल्याचा लाला लजपतराय यांचा पूर्णाकृती पुतळा, लोकमान्य टिळकांचे अहमदाबाद येथील शिल्प ही त्यांची काही उल्लेखनीय स्मारकशिल्पे आहेत.
वल्लभभाई पटेल हे देशाचे पहिले गृहमंत्री असताना, त्यांना प्रत्यक्ष समोर बसवून कोल्हटकरांनी त्यांचे शिल्प घडविले होते. औंधचे कलाप्रेमी महाराज भवानराव पंतप्रतिनिधी यांनी यमाई देवीच्या टेकडीवर शिवाजी सभागृह बांधायचे ठरविले. त्यासाठी त्यांनी कोल्हटकरांकडून शिवाजी महाराजांचा पुतळा करून घेतला. या पुतळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे शिवाजी महाराज उभे असून उजवा हात तलवारीच्या मुठीवर ठेवून सावध पवित्र्यात समोर रोखून पाहत आहेत. त्यातून शिल्पकाराचा मानवाकृतीचा व मानवी स्वभावाचा अभ्यास, व्यक्तिमत्त्व आकर्षक व कलात्मक रितीने मांडण्याचे सामर्थ्य व शिल्पकलेवरील प्रभुत्व लक्षात येते. त्यावर असलेला पाश्चिमात्य कलामूल्यांचा प्रभावही स्पष्टपणे जाणवतो.
त्यांच्या ब्रॉन्झ कास्टिंगमधील नैपुण्याची प्रसिद्धी तत्कालीन शिल्पकारांमध्ये पसरली व त्यातून त्यांनी ब्रॉन्झ कास्टिंगची बाहेरील कामे करण्यास सुरुवात केली. स्वत:च्या शिल्पांसोबतच ते र.कृ.फडके, तालीम अशा मुंबईतील शिल्पकारांच्या शिल्पांची ब्रॉन्झमधील ओतकामाची कामे करीत असत.
याशिवाय फोटोग्रफी व सिरॅमिक माध्यमातही त्यांना गती होती. सिरॅमिक पॉटरीचा कारखाना काढण्याचाही त्यांनी प्रयत्न केला होता. त्यांचा हा वारसा त्यांच्या पुढील पिढीतही सुरू राहिला व त्यांचे चिरंजीव गोविंद महादेव कोल्हटकर (१९१७ -१९९८) व त्यानंतर सध्या त्यांचे चिरंजीव विवेक गोविंद कोल्हटकर यांनी सुरू ठेवला आहे.