Skip to main content
x

करमरकर, विनायक पांडुरंग

      धुनिक महाराष्ट्राच्या शिल्पकलेच्या क्षेत्रात अत्यंत यशस्वी शिल्पकार म्हणून विनायक पांडुरंग करमरकर यांचे नाव घेतले जाते. त्यांच्या १९२८ मधील पहिल्या शिवस्मारकाच्या अश्‍वारूढ पुतळ्याने इतिहास घडविला. त्यानंतर करमरकरांनी सातत्याने वास्तववादी शैलीत अत्यंत दर्जेदार अशी स्मारकशिल्पे घडवून भार स्मारकशिल्पांच्या क्षेत्रात मापदंड निर्माण केला. परंतु त्या सोबतच त्यांनी स्वान्तसुखाय घडविलेली असंख्य व्यक्तिशिल्पे हा महाराष्ट्राच्या शिल्पकला क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा ठेवा आहे. कलाअभ्यासकांसकट अनेक कलारसिक व सर्वसामान्यांना आजही ती आकर्षित करतात. एवढेच नव्हे, तर त्यांच्या नंतरच्या काळातील व आजचे तरुण शिल्पकारही त्यांच्या शिल्पांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवतात.

      शिल्पकार करमरकरांचा जन्म सासवणे या कुलाबा जिल्ह्यातील गावी, पेशाने शेतकरी व गणपती मूर्तिकार कुटुंबात झाला. त्यांचे वडील पांडुरंग बाळकृष्ण करमरकर यांना एकूण चार मुलगे व तीन मुली अशी सात अपत्ये होती. विनायक हे त्यांचे सर्वांत लहान अपत्य होय. बालपणीच विनायकची आई निवर्तल्यामुळे पांडुरंगराव त्याची विशेष काळजी घेत. पांडुरंगरावांच्या गणपती मूर्तिकामात ही सर्व भावंडे त्यांना मदत करत. गणेशोत्सव प्रसंगी पांडुरंगराव आपला थोरला मुलगा दिनकर व लाडक्या विनायकला घेऊन मुंबईला जाऊन आपल्या गणेशमूर्ती विकत. बालपणापासून छोट्या विनायकचा कलेकडे ओढा बघून पांडुरंगरावांनी त्यांना चित्रकला व मूर्तिकलेसाठी प्रोत्साहन दिले.

      वयाच्या अकराव्या वर्षापासून विनायक गणपतीच्या छोट्या छोट्या मूर्ती घडवू लागले. त्यांना चित्रकलेचीही आवड होती. त्यांनी पंधराव्या वर्षाच्या सुमारास गावातल्या देवळाच्या भिंतीवर पौराणिक व ऐतिहासिक चित्रे काढली होती. त्यांचे आवडते दैवत शिवाजी महाराजांचेही चित्र त्यांत त्यांनी रेखाटले होते. एकदा कुलाबा जिल्ह्याचे तत्कालीन ब्रिटिश कलेक्टर ऑटो रॉथफिल्ड यांच्या नजरेस ती चित्रे पडली. त्या गुणग्रही अधिकाऱ्याने विनायकच्या उपजत कलागुणांचे चीज करावे म्हणून त्याच्या वडिलांना समजावून विनायकला मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट या प्रसिद्ध कलाशाळेत शिल्पकलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यासाठी पाठवावे अशी त्यांना प्रेरणा दिली व स्वतः त्याच्या शिक्षणखर्चासाठी आर्थिक मदत देण्याचे आश्‍वासन दिले. विनायक करमरकरांनी १९१० मध्ये जे.जे. स्कूलमध्ये प्रवेश घेतला. त्यांची शिल्पकलेची ओढ व तयारी बघून जे.जे. स्कूलचे तत्कालीन प्राचार्य सेसिल बर्न्स व उपप्राचार्य रोबाथम यांनी थेट तिसऱ्या शिल्पकला वर्गात त्यांना प्रवेश दिला.

      सर जे.जे. स्कूलच्या शिक्षणात नेत्रदीपक यश मिळवून त्यांनी १९१३ मध्ये तो अभ्यासक्रम पूर्ण केला. या काळात हुशार विद्यार्थी म्हणून त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. कलाशिक्षणात सातत्य दाखविणाऱ्या व उत्तम कलाकृती घडविणाऱ्या विद्यार्थ्यास देण्यात येणारे महत्त्वपूर्ण असे ‘लॉर्ड मेयो पदक’ त्यांनी पटकाविले. १९१३ मध्ये शिक्षण पूर्ण करून व्यवसायासाठी ते प्रयत्न करू लागले. त्या वेळी रॉथफिल्ड साहेबांनी त्यांची ओळख मुंबईचे प्रसिद्ध सर्जन डॉ. भाजेकर व रवींद्रनाथ टागोरांचे नातू सुरेंद्रनाथ टागोर यांच्याशी करून दिली. यातूनच त्यांचा संबंध रवींद्रनाथ टागोर व अवनींद्रनाथ टागोर यांच्याशी आला. सुरेन्द्रनाथांच्या आग्रहावरून ते कलकत्त्याला गेले व शिक्षणकार्यासाठी त्यांनी कलकत्त्याच्या झाँवताला मार्गावर स्टूडिओ उभारला. याच काळात त्यांनी १९१८ मध्ये पूर्वाश्रमीच्या येसू परांजपे यांच्याशी लग्न केले. कलकत्त्याच्या वास्तव्यात सुरुवातीला त्यांनी बेल्लूर मठातील रामकृष्ण परमहंस यांचा संगमरवरी पुतळा तयार केला व तो गाजला. त्यामुळे त्यांच्याकडे अनेक कामेे येऊ लागली.

      त्यांनी टागोर कुटुंबासाठी, तसेच चित्तरंजन दास, शास्त्रज्ञ पी.सी. रे अशी अनेक व्यावसायिक शिल्पे तयार केली. याच काळात त्यांनी महात्मा गांधींचे त्यांना प्रत्यक्ष समोर बसवून शिल्प तयार केले. हळूहळू करमरकर व्यावसायिकदृष्ट्या कलकत्त्यात स्थिरावू लागले; परंतु त्यांना इंग्लंडमध्ये जाऊन पुढील शिक्षण घेण्याची इच्छा होती. त्यामुळे करमरकरांनी वाडिया व टाटा ट्रस्टकडून कर्जाऊ शिष्यवृत्ती घेऊन आणि डॉ.भाजेकर, डॉ.राव व शिल्पकार म्हात्रे यांच्या आर्थिक साहाय्याने १९२० मध्ये लंडनला प्रयाण केले.

      लंडन येथील प्रसिद्ध रॉयल आर्ट अकॅडमीमध्ये दोन वर्षे अभ्यास करून ब्रॉन्झ कास्टिंगचे तंत्र त्यांनी शिकून घेतले. अनेक नामवंत चित्र-शिल्पकारांना भेटण्यासाठी, त्यांच्या कलाकृती अभ्यासण्यासाठी व पाश्‍चात्त्य कलेचा अभ्यास करण्यासाठी करमरकरांनी फ्रान्स, इटली व स्वित्झर्लंड या युरोपीय देशांचा दौरा केला. ते १९२२ मध्ये भारतात परतल्यानंतर पुनश्‍च आपल्या कलकत्त्यातील स्टूडिओत काम करू लागले. परंतु त्यांना व्यावसायिक कामे मिळेनात. अशा निराश अवस्थेत असताना, त्यांनी तेथील देवळात शंख फुंकणाऱ्या स्त्रिया बघून त्यावरून ‘शंखध्वनी’ (Conch Blower) म्हणून एका शंख फुंकणाऱ्या युवतीचे शिल्प घडवून कलकत्त्यात भरलेल्या फाइन आर्ट सोसायटीच्या १९२४ सालच्या प्रदर्शनात पाठविले. हे शिल्प प्रदर्शनात गाजले व त्यांच्या शिल्पाला सोसायटीचे रौप्य पदक व रु.३०० चा पुरस्कार मिळाला. यानंतर त्यांचे नशीब खुलले व त्यांच्याकडे विविध व्यावसायिक शिल्पांची कामे येऊ लागली. त्यांतील अत्यंत महत्त्वाचे काम शिवस्मारकाचे होते.

      ऑल इंडिया शिवाजी मेमोरिअल कमिटीचे अध्यक्ष कोल्हापूरच्या राजाराम महाराजांनी प्रथम करमरकरांवर शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या चबुतर्‍यावरील चार उत्थित शिल्पांचे काम सोपविले. वणी दिंडोरीची लढाई, राज्याभिषेक, भवानी देवी तलवार देताना व कल्याणच्या सुभेदाराची सून अशी ही रिलीफ पॅनल्स होती. ठरलेल्या मुदतीपूर्वीच करमरकरांनी ती पूर्ण केली. हा पुतळा १३ १/२  फूट उंचीचा होता. शिवाजी महाराजांच्या तीनशेव्या जन्मदिनी पुण्याच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या प्रांगणात १९२८ साली तो उभारावयाचा होता. वस्तुतः पुतळ्याचे काम प्रथम शिल्पकार रावबहादूर गणपतराव म्हात्र्यांना दिले होते; पण त्यांच्या हातून ते वेळेत पूर्ण होईना. शेवटी ते करमरकरांकडे सोपवण्यात आले. या कामासाठी त्यांनी मुंबईला कोल्हापूरच्या महाराजांच्या शिवतीर्थ पॅलेस येथे स्टूडिओ उभारला. हिंदुस्थानातील हे शिवछत्रपतींचे पहिले अश्‍वारूढ शिल्प असल्याने ते घडविण्यासाठी खूप कल्पकता व परिश्रमांची आवश्यकता होती. पुन्हा हा पुतळा अभिनव अशा एकसंध पद्धतीने ओतवण्याचे आव्हान होते.

      करमरकरांनी हे आव्हान स्वीकारले व आजपर्यंत भारतात कोणीही न केलेल्या एकसंध ओतकामाचे धाडस करण्याचे ठरवून त्या ओतकामासाठी माझगाव डॉकमधल्या मॅकेंझी अँड मॅजेनॉन कंपनीची फाउण्ड्री भाड्याने घेतली. मोठ्या जिकिरीचे हे काम यशस्विरीत्या पूर्ण करून त्यांनी पुतळा एकसंध ओतून आपली क्षमता सिद्ध केली. शिल्पकला तंत्रात महत्त्वाचा असा हा एक आगळावेगळा विक्रम त्यांनी आपल्या धाडसाने व कुशल बुद्धीने यशस्वी केला. करमरकरांच्या अगोदर अथवा नंतरही असे एकसंध ओतकाम कोणी केल्याचे ऐकिवात नाही.

      शिवछत्रपतींचा हा पुतळा घडविण्यापूर्वी करमरकरांनी शिवचरित्राचा सखोल अभ्यास केला होता. त्यानुसार त्यांनी छत्रपतींचे उत्तुंग व रुबाबदार व्यक्तिमत्त्व, त्यांचे वस्त्रप्रावरण, जिरेटोप इत्यादींचे सुयोग्य संयोजन, घोड्यावरची रुबाबदार बैठक, त्याला साजेल असा उमदा घोडा व त्याची चाल दाखवली. विजिगीषू इच्छेने मुठीत आवळून धरलेली भवानी तलवार, शिवछत्रपतींची सतेज व करारी मुद्रा अशा सर्व गोष्टी पूर्ण ध्यानात ठेवून त्यांनी या पुतळ्याची रचना कलात्मक दृष्टीने केली. या पुतळ्याच्या चौथऱ्यावरील शिवचरित्रावर आधारित उत्थित शिल्पे (पॅनल्स) त्यांनी आधीच घडविली होती.

      वरील पुतळ्याशिवाय त्यांनी घडविलेली पूर्णाकृती भव्य शिल्पे म्हणजे, कोलकत्याच्या बेलूर मठातील रामकृष्ण परमहंस, बडोद्याचे खंडेराव महाराज, बॉम्बे हायकोर्टमधील जस्टीस मुल्ला आणि गिरगाव चौपाटीवरील विठ्ठलभाई पटेल हे सर्व पुतळे त्यांच्या मार्बल व ब्राँझमधील कामाचे कौशल्य सिद्ध करतात, तसेच त्यांचे, महर्षी अण्णासाहेब कर्वे, आचार्य कृपलानी, महात्मा गांधी यांचे वास्तववादी पुतळे व त्यापूर्वी बडोदा, ग्वाल्हेर, गोंडल या विविध संस्थानांसाठी घडविलेली स्मारकशिल्पे त्यांच्या शिल्पनैपुण्याची साक्ष देतात. याशिवाय त्यांनी विविध उद्योजक व उद्योगसमूहांसाठी स्मारकशिल्पे घडविली असून त्यांतील जमशेदजी टाटा यांचा पुतळा गाजला.

      पुढे त्यांनी घडविलेले मामा वरेरकर व गुरुवर्य रवींद्रनाथ टागोरांचे आधुनिक पद्धतीचे कल्पनावादी अर्धपुतळे, हे सर्व त्यांच्या विविधांगी शिल्परचनेचे अप्रतिम नमुने आहेत.  त्यांच्या एकूण स्मारकशिल्पांची गणती नसली तरी त्यांनी शिवछत्रपतींचे, पुणे, नांदेड, इचलकरंजी, बीड येथे असे चार अश्‍वारूढ पुतळे उभारले आहेत.

      करमरकरांच्या शिल्पकलेचे आणखी एक अंग म्हणजे त्यांनी स्वान्तसुखाय अभिव्यक्तिपूर्ण केलेली शिल्पकला. समाजातील दुर्बल व कष्टाळू लोकांच्या जीवनावरची ही सर्वच शिल्पे भावपूर्ण असून ती त्यांनी आपल्या सहवासातील व परिसरातील व्यक्ती व प्राण्यांचीच केलेली आहेत. या शिल्पांमध्ये त्यांनी या सामान्य लोकांचे साधेभोळे जीवन, चालीरीती दाखविण्याचा प्रयत्न केला आहे व त्याला अनुसरून त्यांनी बोलके व भावनात्मक विषय निवडले असून शिल्प रचताना विषयाशी निगडित अर्थपूर्ण आशय, शिल्पाची लयपूर्ण रचना, साडी अथवा पेहरावाच्या घड्यांची सौंदर्यदर्शक योजना, माध्यमाच्या गुणांचा सखोल अभ्यास, या सर्व गोष्टी पुरेपूर विचारात घेतल्या आहेत. यांतील काही मोजक्या शिल्पांचा उल्लेख पुढीलप्रमाणे : त्यांना पदके व पारितोषिके मिळवून देणाऱ्या दोन कलाकृती, एक ‘कंबुवादिनी’ व दुसरी ‘मत्स्यकन्या’. समाजजीवनावर आधारित शिल्पे म्हणजे, ‘माता’ - बाळाला ममतेने स्तनपान करणारी कष्टाळू माता, ‘नमस्ते’ - आपल्या बाळाला नमस्काराचे बाळकडू पाजणारी मराठी युवती, ‘निशा’ - त्यांच्या पाळीव कुत्रीचे टेहळणीच्या पोझमधील शिल्प, अशी अनेक शिल्पे त्यांनी साकारली. बकरी, कुत्रा, लमाणी व वंजारी स्त्रिया त्यांची, तसेच कुटुंबातील व्यक्तींची शिल्पेही अप्रतिम आहेत.

      शिल्पकार म्हणून काम करीत असताना करमरकरांनी आपल्या आयुष्यात अनेक भव्य-दिव्य शिल्पस्वप्ने बघितली. अमेरिकेतील राष्ट्रीय स्मारकाच्या धर्तीवर ठाण्याजवळच्या मुंब्रा येथील पारसिकच्या डोंगरमाथ्यावरच्या खडकात, भारतीय राष्ट्रीय पुढाऱ्यांचे पुतळे अनेक शिल्पकारांच्या साहाय्याने खोदावेत, अशी त्यांची एक कल्पना होती. दिल्लीला महात्मा गांधींचे भव्य स्मारक व्हावे अशी त्यांची खूप इच्छा होती. बाहेरून चरख्यावर हात ठेवलेल्या महात्मा गांधींचा ११० फूट उंंचीचा पुतळा असावा व आतून पाच मजली इमारत असावी, अशी ही भव्य कल्पना होती. यातील तळ व पहिल्या मजल्यावर गांधीजींच्या वस्तू, वाङ्मय व स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास असे संग्रहालय कल्पिले होते. दुसरा व तिसरा मजला ग्रंथालय, प्रार्थना हॉल, खादी व इतर लघुउद्योगांचे प्रदर्शन व विक्री यांसाठी होता. वरचा मजला गेस्ट हाउस व स्टाफ क्वार्टर्ससाठी होता आणि तळघरात उपाहारगृह होते. तिथे गांधीजींना पसंत असलेले शाकाहारी पदार्थ दिले जाणार होते. ही सर्व कल्पना स्पष्ट करून सांगणारे मॉडेलही करमरकरांनी तत्कालीन राज्यकर्त्यांना दिले होते.

      काशाच्या खडकाचे रूपांतर करून टोपीवाल्या इंग्रजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या कान्होजी आंग्रे यांचे शिल्प घडविण्याचे व सिंहगडावरच्या एका कड्याला नरवीर तानाजीचा आकार देेण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. पण अशी भव्य स्वप्ने साकार होण्यासाठी पडत नसतात याचाच विदारक अनुभव त्यांना आला. करमरकरांच्या अशा अनेक भव्यदिव्य कल्पना कधीच साकार झाल्या नाहीत.

      त्यांना आयुष्यात अनेक पुरस्कार व सन्मान मिळाले. १९३० मध्ये त्यांच्या ‘मत्स्यकन्या’ या शिल्पाला बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनात सुवर्णपदक मिळाले. ते १९४९ मध्ये अमेरिकेतल्या व्हिस्कॉन्सीन विद्यापीठाच्या आमंत्रणावरून अमेरिकेत गेले व तिथे मिल्टन महाविद्यालयात त्यांनी शिल्पांची प्रात्यक्षिके व व्याख्याने दिली इतकेच नव्हे, तर त्या महाविद्यालयाचे अधिष्ठाता डलांड यांचे व्यक्तिशिल्प त्यांनी सर्वांसमक्ष घडवून प्रात्यक्षिक दिले.

      अमेरिकेहून परतल्यानंतर करमरकरांनी अमेरिकेतील शिल्पकला व स्मारकशिल्पे यांच्यावर लेख लिहिले व ते ‘मौज’, ‘सत्यकथा’ अशा दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झाले. त्यांचा बालपणातील आठवणींवर लिहिलेला लेख ‘साधना’ मासिकात प्रसिद्ध झाला होता.

      त्यांना १९६२ मध्ये भारत सरकारने ‘पद्मश्री’ देऊन त्यांचा गौरव केला. दिल्लीच्या ललित कला अकादमीनेे त्यांना १९६४ मध्ये ‘फेलोशिप’ प्रदान केली.

      करमरकर ज्या वेळी या शिल्पव्यवसायात उतरले,  त्या वेळी गणपतराव म्हात्रे, बाळाजी तालीम वगैरे दिग्गज व ज्येष्ठ शिल्पकार स्मारकशिल्प व्यवसायात अग्रेसर होते. करमरकरांनी त्यांचे अंगभूत व उपजत कलागुण, शिल्पकलेवरील निस्सीम भक्ती, अखंड शिल्पसाधना, कामातील सातत्य व प्रामाणिकपणा, नवनिर्मितीची क्षमता, अलौकिक प्रतिभा व कल्पनाशक्ती, माध्यमाचेे शिल्पदृष्ट्या आकलन व शिल्पतंत्राचे सखोल ज्ञान या जोरावर भारतीय परंपरावादी शिल्पपद्धती, भारतीय विषय आणि पाश्‍चात्त्य वास्तववादी शिल्पपद्धती यांचा सुवर्णमध्य साधून आपली नावीन्यपूर्ण वास्तववादी व मानवतावादी शिल्पे घडविली. परिणामी, करमरकरांनी या बुजुर्ग शिल्पकारांच्या मांदियाळीत आपले एक आगळेवेगळे स्थान निर्माण केले.

      त्यांनी बनविलेल्या शिल्पांची मॉडेल्स व स्वानंदासाठी केलेली शिल्पे अलिबागजवळ करमरकरांनी बांधलेल्या सासवण्याच्या वास्तूत बघायला मिळतात. किंबहुना, करमरकरांच्या शिल्पांचे संग्रहालय हे सासवण्याचे एक आकर्षणच आहे. या घराच्या आवारात मांजर, कुत्रा, म्हैस असे अनेक प्राणी मोकळेपणी पहुडलेले दिसतात, ते बघून आश्‍चर्य वाटते. दाराशीच अल्सेशिअन कुत्री बघून दचकायला होते. पण काही वेळानंतर असे लक्षात येते, की ही शिल्पकार करमरकरांच्या बोटांची जादू आहे. अगदी जिवंत वाटणारी ही शिल्पे श्रेष्ठ दर्जाची आहेत. त्यांचे सहृदय मन, प्राणिमात्रांवरील प्रेम व माध्यमावरील असामान्य प्रभुत्व हेच त्यांच्या निर्मिती व दर्जामागील अधिष्ठान आहे. शिल्पकलेच्या तंत्राचे तर ते उस्तादच होते. सर्वसाधारणपणे स्मारकशिल्पे व शिल्पे मार्बल किंवा ब्राँझमध्ये तयार करतात; परंतु करमरकरांनी आर्थिक कारणामुळे काही स्मारकशिल्पे व त्यांची स्वतःसाठी केलेली सर्व शिल्पे सिमेंट काँक्रीटसारख्या आधुनिक माध्यमात ओतविण्याचे तंत्र यशस्विरीत्या वापरले. त्यांच्या या प्रभुत्वाची साक्ष त्यांच्या कोणत्याही कलाकृतीत मिळाल्याशिवाय राहत नाही.

      मातीत शिल्प घडविताना शरीरशास्त्राचा अभ्यास, शिल्पविषय, वस्तूचा पोत, घडण व ते साकार करण्याची विलक्षण क्षमता व आकलन यांमुळे येणारी सहजता हा त्यांच्या शिल्पांचा एक मोठाच गुणविशेष आहे. वैशिष्ट्य हे की, त्यांच्या कामातील सहजता हा गुणविशेष लक्षातही येेणार नाही, या पद्धतीने त्यांच्या कलाकृतीचे ते अंग होते. असे शिल्प घडविताना माती लावणे, काढणे, कोरणे अशा प्रक्रियेद्वारे त्याला आकार देणे, याचा अचूक अंदाज त्यांच्या शिल्पात दिसून येतो. त्यामुळे शिल्पविषय हुबेहूब शिल्पांकित करण्याची त्यांची हातोटी सर्वच शिल्पांमधून जाणवते व अशी शिल्पे ते ब्रॉन्झ, सिमेंट काँक्रीट व मार्बलसारख्या माध्यमात समर्थपणे रूपांतरित करीत. ज्यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते अशा व्यक्ती व प्राण्यांच्या शिल्पांतून ते विशेषत्वाने लक्षात येते.

      या प्राणिशिल्पांबद्दल करमरकरांचे समकालीन सुप्रसिद्ध चित्रकार व संशोधक द.ग. गोडसे यांच्या ‘प्राण्यांचा सु़हृद शिल्पी’ या १९५२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात ते लिहितात,‘शिल्पकार म्हणून करमरकर श्रेष्ठ आहेतच; परंतु माझ्या मते, प्राणी-शिल्पकार म्हणून ते त्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. इतर शिल्पाकृतींपेक्षा प्राणिशिल्पां-मध्ये करमरकर अधिक स्वतंत्र, अधिक समरस होतात. शिल्पवस्तूविषयी वाटणारी त्यांची आत्मीयता एवढी तीव्र असते, की त्यांचे शिल्प म्हणजे प्रत्यक्ष आत्मीयताच साकार करण्याचा प्रयत्न असतो. विशेषतः त्यांनी केलेले अल्सेशियन कुत्रीचे शिल्प या दृष्टीने अनुपम आहे. ती एक श्रेष्ठ कलाकृती आहे. प्राणिमात्रांचे सर्व गुणविशेष या शिल्पाकृतीत एवढ्या आत्मीयतेने, एवढ्या तंत्रसिद्ध सहजतेने व एवढ्या हळुवारपणे सूचित झाले आहेत, की ही शिल्पाकृती म्हणजे निव्वळ त्यांच्या आवडत्या कुत्रीची प्रतिमा न ठरता सबंध प्राणिमात्रांचे, मनुष्य व प्राणी या सहानुभाव मैत्रीचे स्मारक ठरते. प्रत्यक्ष विधात्याला हेवा वाटावा एवढी ही कलाकृती श्रेष्ठ आहे. शिल्पकार करमरकरांचे श्रेष्ठत्व यातच आहे.’

      शिल्पकार करमरकर आयुष्यभर स्वतःच्या मस्तीत जगले. ते असामान्य शिल्पकार तर होतेच; पण शिस्तबद्ध संघटकही होते. त्यामुळे त्यांच्या काळातील दिग्गज मंडळी, राजकारणी, उद्योजक व कलावंतही त्यांना वचकून असत. अनेक महान व्यक्तिमत्त्वांना ते समोर बसवून त्यांचे शिल्प अल्पावधीत व हुबेहूब साकार करत. महात्मा गांधी, सर विश्‍वेश्‍वरय्या, एव्हरेस्टवीर शेर्पा तेनसिंग, बॅरिस्टर जयकर, साहित्यसम्राट न.चिं. केळकर, आचार्य कृपलानी, सर कावसजी जहांगीर अशा प्रसिद्ध व्यक्तींसोबतच कुटुंबातील व्यक्ती, मित्रमंडळी, नोकर अशा अनेकांची व्यक्तिशिल्पे त्यांना समोर बसवून त्यांनी घडविली. स्वातंत्र्यचळवळीत अनेक भूमिगत नेत्यांसाठी त्यांचा स्टूडिओ ही लपण्याची जागा असे. वाङ्मय, संगीत, नाट्य या सर्वच क्षेत्रांतील लोकांचे त्यांच्याशी संबंध होते. ते स्वतः लेखन करीत व त्यांचे लेख अनेक वृत्तपत्रे व मासिकांतून प्रसिद्ध झाले. त्यांनी लिहिलेले ‘मुखवटे’ हे नाटक त्यांच्या नाट्यप्रतिभेची साक्ष देते. त्यांनी लिहून ठेवलेला ‘एका पुतळ्याची जन्मकथा’ हा लेख १९८० च्या ‘किर्लोस्कर’ मासिकात प्रसिद्ध झाला. त्यातून कलावंताला कोणकोणत्या दिव्यातून जावे लागते याचा अंदाज येतो.

      शिल्पकार करमरकरांनी आपल्या दैवी हस्तकौशल्याला तपश्चर्येची जोड देऊन, स्वतःच्या शिस्तबद्ध आयुष्यक्रमामुळे विपुल शिल्पनिर्मिती केली. कामावरच्या निष्ठेने आपल्या निर्मितीला असा दर्जा दिला, की जो आजही आनंद व प्रेरणा देऊ शकतो. व्यावसायिक शिल्पनिर्मितीतून मुक्त होऊन केवळ स्वानंदासाठी मुक्तपणे शिल्पनिर्मिती करण्याची त्यांची इच्छा साकार होऊ शकली नाही. परिणामी, शिल्पकलेतील आधुनिक विचार व वास्तववादापलीकडचे स्वातंत्र्य घेण्याबाबत त्यांना विचार करण्यास सवड सापडली नसावी. रवींद्रनाथ टागोर व मामा वरेरकर यांच्या शिल्पांत त्यांनी आधुनिक पद्धतीचा वापर केला असला तरी आधुनिक पद्धतीच्या कलानिर्मितीबाबत करमरकरांची मते सहानुभूतीपूर्ण असूनही, विरोधाच्या दिशेनेच व्यक्त झाली.

      करमरकर विविध संस्थांशी संबंधित होते. तसेच त्यांनी आपल्या जन्मगावी, सासवणे येथे अनेक उपक्रम सुरू करून त्यांना आर्थिक साहाय्य केले. आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, बॉम्बे आर्ट सोसायटी, भुलाभाई मेमोरिअल इन्स्टिट्यूट, इंडियन स्कल्प्टर असोसिएशन, मुंबई अशा अनेक संस्थांशी ते संबंधित होते.

      इचलकरंजी येथे बसविण्यासाठी, शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा बनवीत असतानाच १९६७ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या जन्मगावी, सासवणे येथे त्यांनी १९३४ मध्येच घर व स्टूडिओ बांधून ठेवला होता. त्यांची निवडक व आवडती शिल्पे त्यांनीच सासवण्यात नेऊन ठेवली होती. आज सासवणे गावाचे ‘शिल्पकार करमरकर शिल्पालय’ हे मोठेच आकर्षण आहे.

      - प्रा. विठ्ठल शानभाग, सुहास बहुळकर

करमरकर, विनायक पांडुरंग