Skip to main content
x

कर्वे, इरावती दिनकर

विसाव्या शतकातील एक प्रमुख मानवशास्त्रज्ञ व लेखिका म्हणून इरावती कर्वे मराठी माणसांना परिचित आहेत. आधुनिक महाराष्ट्रातील या अलौकिक विदुषीने मानवशास्त्राखेरीज पुरातत्त्व-विद्या आणि इतर सामाजिक शास्त्रांमध्ये भरीव संशोधनकार्य केले आहे.

इरावती कर्वे यांचा जन्म ब्रह्मदेशातल्या (आताच्या म्यानमार) मिंगयानमध्ये झाला. तिथल्या इरावदी नदीच्या नावावरून त्यांचे नामकरण झाले. लहान वयातच त्या शिक्षणासाठी पुण्यात आल्या. फर्गसन महाविद्यालयात शिकत असताना विख्यात गणिती व तेव्हाचे प्राचार्य रँगलर परांजपे यांच्यामुळे त्या प्रभावित झाल्या. १९२६ मध्ये त्यांनी तत्त्वज्ञान विषयात पदवी संपादन केली. त्यांना मानाची समजली जाणारी मुंबई विद्यापीठाची दक्षिणा शिष्यवृत्तीमिळाली. त्यांनी प्रा. घुर्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यांच्या प्रबंधाचे शीर्षक ‘The Chitpavan Brahmins An Ethnic Study’ असे होते. त्यानंतर इरावती कर्वे जर्मनीत गेल्या व तेथे त्यांनी सुप्रसिद्ध कैसर विल्हेम संस्थेमध्ये मानवशास्त्रात डॉक्टरेटची पदवी मिळवली. त्यांच्या प्रबंधाचा विषय ‘The Normal Asymmetry Of Human Skull’ असा होता व त्यांना त्या काळात गाजलेल्या सुप्रजननशास्त्र (Eugenics) या विषयाचे प्रा. युजेन फिशर यांचे मार्गदर्शन लाभले होते.

भारतात परतल्यावर काही वर्षे मुंबईच्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठात कुलसचिव म्हणून काम पाहिल्यानंतर पुण्याला नव्याने पुन्हा सुरू झालेल्या डेक्कन महाविद्यालयामध्ये त्या इतिहास विषयाच्या प्रपाठक या पदावर रुजू झाल्या व अखेरपर्यंत त्या तिथेच राहिल्या. १९४९ मध्ये त्यांना प्राध्यापक पदावर बढती मिळाली. डेक्कन महाविद्यालयामध्ये इरावती कर्वे व ह.धी. सांकलिया यांनी मिळून पुरातत्त्वविद्येमधल्या आजच्या मानवशास्त्रीय संशोधनाचा पाया घातला व प्रारंभापासूनच हे संशोधन जागतिक पातळीच्या दर्जाचे व्हावे म्हणून प्रयत्न केले.

इरावती कर्वे यांना अनेक मानसन्मान मिळाले. त्यांनी १९४७ मध्ये दिल्ली येथे झालेल्या इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये मानवशास्त्र विभागाचे अध्यक्षपद भूषवले. १९५५ मध्ये लंडन विद्यापीठात व १९५९-१९६० मध्ये बर्कलीच्या कॅलिफोर्निया विद्यापीठात विशेष व्याख्याने दिली. त्यांच्या युगान्तया, ‘महाभारतया विषयावर आधारित पुस्तकाला १९६८ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.

इरावती कर्वे व प्रा. सांकलिया या दोघांनी १९४९ मध्ये गुजरातमधील लांघणज या मध्याश्मयुगीन स्थळाचे उत्खनन केले. या ठिकाणी मानवी अवशेषही मिळाले असल्याने हे संशोधन महत्त्वाचे ठरले. त्यांच्या १९५३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या (‘Kinship Organization in india’) या अतिशय गाजलेल्या पुस्तकात त्यांनी भारतीय समाजरचनेच्या संदर्भात अत्यंत गुंतागुंतीच्या प्रश्नांबद्दल स्पष्ट आणि नेमकी मांडणी केली. वांशिक व भाषिक गटांच्या दरम्यानचे फरक त्यांच्या बाह्य शरीररचनेच्या व आनुवंशिक संरचनेच्या आधारे अभ्यासता येतील का, हा त्यांच्या संशोधनाचा मूळ गाभा होता. त्याला अनुसरून इरावती कर्वे यांनी १९६१ मधल्या (‘Hindu Society : An Interpretation’) या पुस्तकात महाराष्ट्रातील समाजरचनेचे प्रारूप एका आकृतीत दिले आहे. इरावती कर्वे यांच्या वंश या संदर्भातल्या सर्व संकल्पना आज तरी मान्य होण्याजोग्या नसल्या, तरी त्या काळात केलेले संशोधन आजही मोलाचे आहे.

आज ज्ञानाचे स्वरूप विविधांगी झालेले आहे. मानवी जीवनाच्या अभ्यासासाठी पुरातत्त्व व मानसशास्त्र या सामाजिक शास्त्रांप्रमाणेच गणित, संख्याशास्त्र, जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्रांच्या अनेक शाखा एकत्र येत आहेत. ही गरज इरावती कर्वे यांनी अर्धशतकापूर्वीच ओळखली होती. विसाव्या शतकातील एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व असलेल्या इरावती कर्वे यांची प्रतिभा पुढील काळातील आव्हाने अगोदरच समजण्याएवढी विलक्षण होती. इतकेच नाही, तर आज समाजशास्त्रात मूलभूत बदल घडविणार्‍या स्त्री-वाद व उत्तर-आधुनिकतावाद या संकल्पना त्यांच्या मानवशास्त्रावरील संशोधनपर आणि ललित लेखनात जाणवतात. प्राचीन भारतीय समाज जीवनाच्या अभ्यासासाठी इरावती कर्वे यांनी निवडलेला प्राचीन भारतीय साहित्याच्या विश्लेषणाचा मार्ग तेव्हा सर्वस्वी नवीन होता. कारण, कोणत्याही संस्कृतीचा अभ्यास तिचा इतिहास जाणून घेतल्याखेरीज करता येणार नाही व कोणत्याही समाजाची रचना परंपरा समजून घेतल्या नाहीत तर कळणार नाही, ही त्यांची सैद्धान्तिक भूमिका अतिशय महत्त्वाची आहे.

मानवांमधील सांस्कृतिक-जैविक विविधतेचा अभ्यास करण्यासाठी संख्याशास्त्रातील मल्टि-व्हेरिएटपद्धतींचा वापर करण्यात इरावती कर्वे अग्रणी होत्या. मानवांमधील जैविक विविधतेचा अभ्यास करताना कोणते एकक वापरावे याबद्दल अनेक मतप्रवाह आहेत. या संदर्भात इरावती कर्वे यांनी जातीची व सामजिक एककाची केलेली व्याख्या आजही समर्पक आहे. विविध जाती-भाषा समूहांच्या संख्याशास्त्रीय अभ्यासाचा इरावती कर्वे यांचा हेतू वंशावर आधारित वर्गीकरण करणे हा नसून जातींच्या उगमाची निरनिराळी गृहीतके तपासणे हा होता. म्हणूनच एक समाजशास्त्रज्ञ असूनही प्रसंगी सहकार्‍यांची कडवट टीका स्वीकारून कर्वे यांनी समाजशास्त्रात जीवशास्त्रामधल्या आनुवंशिकतेच्या अभ्यासाचा आग्रह धरला होता.

युगान्तव इतर लेखनाच्या चिकित्सेतून आपल्याला दिसते, की वर्णव्यवस्था, जातीसंस्थेचा उगम आणि प्राचीन काळापासून भारतीय समाजात असलेले स्त्रीचे स्थान यांबद्दलचे इरावती कर्वे यांचे विचार मूलभूत पातळीवर इतरांच्यापेक्षा भिन्न होते. भारतीय समाजाची आजची रचना अशी का आहे, हा कर्वे यांच्या सर्व संशोधनाचा गाभा होता.

त्या स्वत:ला स्त्री-वादी म्हणत नव्हत्या; पण स्त्री-अभ्यास हे एक स्वतंत्र ज्ञानक्षेत्र म्हणून उदयास येण्याअगोदरच्या काळात कर्वे यांच्या संशोधनाचे निष्कर्ष काढण्याच्या पद्धतीत व त्यावर आधारित लेखनात स्त्री-वादी भूमिका आढळते.

इरावती कर्वे केवळ प्राचीन नव्हे, तर तत्कालीन सामाजिक प्रश्नांचाही विचार करत असत हे त्यांच्या लेखनातून जाणवते. कोयना धरणामुळे विस्थापित झालेल्यांवरील लेखात आपल्याला त्यांच्यामधल्या संशोधकाच्या सामाजिक संवेदनशीलतेचा हा पैलू दिसतो.

डॉ. प्रमोद जोगळेकर

कर्वे, इरावती दिनकर