Skip to main content
x

कुलकर्णी, भास्कर माधव

             भारतीय आदिवासी लोककलेतील महत्त्वाचा संशोधक कार्यकर्ता म्हणून भास्कर माधवराव कुळकर्णी यांचे नाव सन्मानाने घेतले जाते. भास्कर कुळकर्णी यांचा जन्म मुंबईत, मालाड येथे झाला. त्यांचे वडील सवाई माधवराव कुळकर्णी हे हिंदू महासभेचे कट्टर कार्यकर्ते होते. तत्कालीन समस्त मालाडकरांमध्ये ‘महादेवभाऊ’ या नावाने ते प्रसिद्ध होते. त्यांचा दगडांच्या खाणींचा, तसेच लाकूड व कोळशाच्या वखारींचा व्यवसाय होता.

             भास्करच्या आई पार्वतीबाई त्या काळातही जातपात न मानता कुणाच्याही अडीअडचणीला धावून जात. महादेवभाऊ व पार्वतीबाई यांना एकूण पाच मुले, भास्कर हे त्यांतील तिसरे अपत्य. कुळकर्णींच्या घरात धार्मिक वातावरण होते. घरामध्ये सर्वांना वाचनाची आवड होती. या सार्‍या वातावरणाचा व त्यातून मिळणार्‍या विचारस्वातंत्र्याचा परिणाम होऊन त्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित होत गेले. त्यांचे घराबाहेरचे मित्रमंडळ सेवादलात जाणारे असल्यामुळे त्यांनी दोन्ही प्रकारच्या विचारसरण्या अनुभवल्या व अधिक स्वातंत्र्य व मुक्त विचारधारा मानणार्‍या सेवादलात जाणे पसंत केले.

             भास्कर कुळकर्णी यांचे शालेय शिक्षण मालाडमधील एन.एल. हायस्कूल येथे झाले. त्यानंतर त्यांनी १९५१च्या दरम्यान सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या उपयोजित कला विभागात, तसेच एस.एल. हळदणकर यांच्या ‘हळदणकर्स फाइन आर्ट इन्स्टिट्यूट’ येथे कलाशिक्षण घेतले. सुरुवातीला काही काळ जे. वॉल्टर थॉम्प्सन व एअर इंडियामध्ये काम केल्यानंतर ते विणकर सेवा केंद्र (वीव्हर्स सर्व्हिस सेंटर) येथे वस्त्र- संकल्पनकार म्हणून काम करू लागले. नंतरच्या काळात दिल्ली येथील हँडलूम व हँडिक्राफ्ट एक्स्पोर्ट कमिशन (एचएचईसी) मध्ये संशोधक कलाकार म्हणून त्यांनी काम केले. या दोन्ही कामांदरम्यान त्यांनी भारतभ्रमण तर केलेच; पण परदेशी जाऊन तेथील लोककलांचा अभ्यासही केला. या काळात या दोन्ही संस्थांच्या सल्लागार व अध्यक्ष असलेल्या श्रीमती पुप्पुल जयकर यांच्याशी त्यांचा संपर्क आला. भास्कर कुळकर्णी यांच्या कामाने प्रभावित झालेल्या पुप्पुल जयकर यांनी त्यांना सतत प्रोत्साहन व कामातील नवनवीन संधी उपलब्ध करून दिल्या. बिहारमधील मधुबनी या लोककलेसंदर्भात काम करण्याची मिळालेली संधी ही त्यांपैकीच एक.

             १९७५ मध्ये आणीबाणीच्या काळात बिघडलेले वातावरण व अंतर्गत राजकारणाचा त्रास होऊ लागल्याने भास्कर कुळकर्णी यांनी दिल्लीतील नोकरीचा राजीनामा दिला आणि ते थेट डहाणूजवळच्या वारली आदिवासींमध्ये काम करण्यासाठी महाराष्ट्रात परत आले. डहाणू येथील गंजाड या गावी स्थायिक होऊन त्यांनी वारली कलाकारांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. त्यापूर्वीच, १९७२ च्या दरम्यान त्यांनी वारली कलेतील उत्स्फूर्त व विलक्षण आविष्कार मुंबईच्या कलाजगतास ज्ञात करून दिला; त्याचे मुंबईत व दिल्लीत प्रदर्शन करून तो राष्ट्रीय पातळीवर पोहोचविला. परंतु नंतरच्या काळात त्यांच्यात व स्थानिक आदिवासी लोकांमध्ये मतभेद निर्माण झाले व त्यांनी हा वारली परिसर सोडला.

             ते पुन्हा बिहारमधील मधुबनी येथे गेले व त्यांनी तेथील कलाकारांबरोबर काम करण्यास सुरुवात केली. दरम्यान कौटुंबिक कलह, व्यक्तिगत पातळीवर आलेले अनेक सामाजिक-राजकीय कटू अनुभव अणि चाकोरी- बाहेरची मते यांमुळे त्यांच्यातील संवेदनशील कलावंत अस्वस्थ व निराश झाला. ते व्यसनांच्या अधीन झाले. मुळातल्या ‘भटक्या’ स्वभावामुळे ते अधिकच भटकू व भरकटू लागले. याच अवस्थेत त्यांनी दरभंगा गाठले. इथेच त्यांचा अत्यंत विपन्नावस्थेत मृत्यू झाला.

             त्यांचा लोककलेचा गाढा व्यासंग होता. वारली, बस्तर, संथाळ, दक्षिणेतील कुँआर, मधुबनी अशा ठिकाणच्या लोककलाकारांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. मधुबनी व वारली या राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेल्या आदिवासी कलांना समाजासमोर आणण्याचे श्रेय भास्कर कुळकर्णी यांना दिले जाते.

             वाढत्या वयाची फिकीर न करता ते विविध प्रांतांतल्या आदिवासींमध्ये भटकत राहिले व त्यांच्यासारखेच जगू लागले. धाडसी वृत्ती व लोकसंग्रह करण्याचा स्वभाव यांमुळे त्यांचा लोककलेचा अभ्यास प्रत्यक्ष अनुभवांशी निगडित होता. भारताच्या खेड्यापाड्यांत विखुरलेले अनेक स्त्री, पुरुष कलाकार त्यांनी शोधले व त्यांना कलानिर्मितीसाठी प्रोत्साहित केले. राष्ट्रपती पदक आणि पद्म पुरस्काराने सन्मानित जिव्या सोम्या मशेसारखे वारली चित्रकार भास्कर कुळकर्णी यांच्यामुळे प्रकाशझोतात आले.

             भारतातील लोककला व लोककलाकार यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर स्थान मिळवून देण्याचे महत्त्वाचे कार्य भास्कर कुळकर्णी यांनी केले. हे काम करत असताना त्यांनी प्रसंगी स्वत:ची कलानिर्मिती बाजूला सारली; पण लोककला व लोककलाकार यांच्यावर मनापासून प्रेम केले. एवढेच नव्हे, तर त्यांची जीवनशैली समजून घेताना तीच जीवनशैली स्वत:ही स्वीकारण्याचे धैर्य त्यांच्यामध्ये असल्यामुळे लोककलेची पाळेमुळे त्यांना खर्‍या अर्थाने कळली होती, असे म्हणता येते.

             व्यक्तिगत जीवनातले अनुभव, वीव्हर्स सर्व्हिस सेंटर व हॅण्डलूम आणि हॅण्डिक्राफ्ट एक्स्पोर्ट कमिशन या शासकीय संस्थांमधील अनुभव व राजकारण, त्यांची स्वत:ची सामाजिक व राजकीय मते, चित्रनिर्मितीमधील अनुभव, लोककलेविषयीची सूक्ष्म निरीक्षणे अशा अनेक विषयांवरील नोंदी व रेखाटने ते आपल्या डायरीत सातत्याने करीत असत. अशा जवळपास शंभर दैनंदिनींमधून त्यांनी या नोंदी करून ठेवल्या आहेत. या नोंदी वाचताना भास्कर कुळकर्णी यांच्यातला सच्चा माणूस सातत्याने समोर येतो व या लोककलेतील संशोधक कार्यकर्त्याच्या योगदानाचे महत्त्व लक्षात येते.

- माणिक वालावलकर

 

कुलकर्णी, भास्कर माधव