Skip to main content
x

कुलकर्णी, वासुदेव गोविंद

         थार्थवादी शैलीत व जोमदार रंगलेपनातून जलरंग व तैलरंगाची वैशिष्ट्ये सांभाळत निसर्गचित्रे, व्यक्तिचित्रे व प्रसंगचित्रे रंगविणारे चित्रकार म्हणून वा.गो. कुलकर्णी प्रसिद्ध होते. त्यांनी नाशिकमध्ये आयुष्यभर कलाशिक्षण व कलाप्रसारासोबतच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली बांधीलकी आयुष्यभर जोपासली.

         वासुदेव गोविंद कुलकर्णी यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील पेठ या गावी झाला. लहानपणीच त्यांना चित्रकलेविषयी आकर्षण होते. शालेय शिक्षणानंतर चरितार्थाकरिता म्हणून ते मुंबईत आले. अर्थार्जनासाठी त्यांनी ट्रेसरची नोकरी केली. ही नोकरी सुरू असतानाच लो.टिळक निवर्तले आणि गांधीयुग सुरू झाले. असहकाराची चळवळ सुरू झाली. तरुण वासुदेव अस्वस्थ झाले आणि त्यांनी १९२१ च्या असहकार चळवळीमध्ये उडी घेतली.

         सत्याग्रहाचा काळ संपला. मात्र चित्रकला शिक्षणाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. मुंबईला असतानाच कलामहर्षी सा.ल. हळदणकरांशी त्यांची गाठ पडली आणि त्यांचे चित्रकला शिक्षण सुरू झाले. त्यांनी १९२१-१९२४ या काळात सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेशही घेतला, पण सहा महिन्यांतच हे कलाशिक्षण थांबले व आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना नाशिकला परतावे लागले. मात्र हळदणकरांकडे झालेल्या चित्रकलेच्या शिक्षणाने त्यांच्या जीवनाचे ध्येय जणू निश्‍चित झाले. चित्रकलेविषयीची जन्मजात आत्यंतिक ओढ व आकलनक्षमता असल्यामुळे नाशिकला परतल्यानंतर त्यांनी आपली वाट स्वतःच शोधली.

         १९२० पासून जवळजवळ ६५ वर्षे हा त्यांच्या कलानिर्मितीचा कालखंड आहे. कुलकर्णींनी निसर्गचित्रे, व्यक्तिचित्रे आणि दैनंदिन जीवनातील घटनाप्रसंगांची चित्रे रंगविली. शिल्पकलेतही त्यांना रस होता. स्वतःच्या अभ्यासासाठी आणि आनंदासाठी तर ती केलीच, शिवाय दुसर्‍या महायुद्धाच्या काळात रंगसाहित्य उपलब्ध नसल्यामुळेही ती घडली. मात्र या चित्रकाराचा मुख्य भर निसर्गचित्रांवर आणि दैनंदिन जीवनातील घटना आणि प्रसंग यांच्या चित्रणांवर दिसतो. जलरंग, तैलरंग, पेस्टल अशा विविध माध्यमांतून त्यांनी चित्रनिर्मिती केली.

         हे सारे करीत असताना १९४० मध्ये त्यांनी ‘नाशिक आर्ट ट्रेझर्स’ ही संस्था स्थापिली. स्वातंत्र्योत्तर काळात तिचे नामांतर ‘नाशिक कला निकेतन’ असे झाले. नाशिक शहरात एक पब्लिक आर्ट गॅलरी सुरू करण्याच्या दृष्टीने दरवर्षी अखिल भारतीय पातळीवर त्यांनी वार्षिक कलाप्रदर्शने आयोजित केली. कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष व्यक्तिचित्रे व निसर्गचित्रांच्या स्पर्धा घेतल्या. त्यांनी १९३० पासून स्वतःचा चित्रकला वर्ग ‘नाशिक कला निकेतन’ संस्थेकडे वर्ग केला व त्याला शासकीय मान्यताही मिळाली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत लोकवर्गणी व आश्रयदात्यांकडून देणग्या मिळवून त्यांनी विद्यालय व चित्रसंग्रहासाठी संस्थेची तीन मजली इमारत उभी केली.

         दरवर्षी वार्षिक कलाप्रदर्शनाच्या निमित्ताने त्यांनी महाराष्ट्रातील मान्यवर चित्रकारांना बोलावून त्यांची प्रात्यक्षिके व चर्चासत्रे आयोजित केली. तसेच, लहान विद्यार्थ्यांपासून ते प्रौढांपर्यंत रेखाटन मंडळ सुरू केले.

         वा.गो. कुलकर्णींच्या निसर्गचित्रांवर, विशेषतः तैलरंग माध्यमात केलेल्या निसर्गचित्रांवर ब्रिटिश स्कूल प्रणित वास्तववादी शैली आणि दृक्प्रत्ययवादी शैलीचा संमिश्र प्रभाव दिसतो. नाशिकमधील आणि नाशिकच्या आसपास असलेल्या निसर्गरम्य ग्रमीण परिसरातील अनेक निसर्गचित्रे त्यांनी रंगवली. नाशिकच्या गोदावरी नदीवरील देवळा—घाटांचे तत्कालीन अनेक चित्रकारांना आकर्षण वाटे. निसर्गाच्या नुसत्याच रमणीय व अल्हाददायक देखाव्यापेक्षा वा.गो. कुलकर्णींची चित्रे मात्र वेगळी वाटतात. हे वेगळेपण दिसते ते त्या चित्रांतील विविध अविर्भावातील मानवाकृतींमुळे.

         त्यांच्या निसर्गचित्रांतील मानवी आकृत्या या फक्त मानवी अस्तित्व दर्शविण्याकरिता नसतात, तर सामाजिक संदर्भ घेऊन त्या अवतरताना दिसतात. ‘मॉर्निंग मेलडी’ हे तैलरंगातील निसर्गचित्र पाहताना त्या काळातील मराठी समाजाचे व संस्कृतीचेच दर्शन झाल्यासारखे वाटते. तऱ्हेतऱ्हेचे लोक, त्यांची वेशभूषा आणि त्यांची विविध कृतिकार्ये यांमुळे हे चित्र जिवंत होते. इथे प्रातर्वेदी वासुदेव व पगडीवाला आहे. लुगडे बदलत असतानाची स्त्री आहे. फुले विकणारी फुलवाली आहे. भिक्षुक आहेत. क्रियाकर्म करणारे ब्राह्मण आहेत, तसेच पाण्यात उभे राहून अर्घ्य देणारे अभिजनही आहेत. साधु-संन्यासी, श्रीमंत-गरीब, भिक्षुक-भिकारी, बाल - तरुण-वृद्ध, स्त्री-पुरुष, एका विशिष्ट श्रद्धेने सारा समाज एकत्र येण्याचे हे जणू भारलेले स्थानच झाल्यासारखे वाटते. सकाळच्या वातावरणातील मांगल्य तसेच नदीकाठावरील आर्द्रता, या चित्रांतून प्रत्ययास येते.

         मानवाकृतींची प्रमाणबद्धता राखून एका विशिष्ट समाजातील नाना तर्‍हेचे लोक त्यांच्या गुणवैशिष्ट्यांसह व योग्य तपशिलांसह निसर्गचित्रात दाखवलेले आहेत. हे सर्व दृश्य अतिशय सुंदर आहे. वास्तव दृश्यापेक्षाही सुंदर. चित्रातील यथार्थदर्शन, रंगसंगती, ढगाआडून डोकावणारी कोवळी उन्हे, दूर दिसणारी देवालयाची शिखरे आणि भासमान होणारा समूहध्वनी चित्रावकाश भरून टाकतो. त्यामुळे या निसर्गचित्राची दृश्यात्मकता तर परिणामकारक झालीच आहे; पण आशयाची व्यापकताही वाढलेली आहे. अशा चित्रात कुलकर्णींचे गुरू कलामहर्षी सा.ल.हळदणकर व चित्रकार तासकर यांचा प्रभाव जाणवला तरी त्यांच्या अभिव्यक्तीचे वेगळेपणही लक्षात आल्याखेरीज राहत नाही.

         मानवाबद्दलचीच नव्हे, तर समाजाबद्दलची आस्था हे वा.गो.कुलकर्णी या व्यक्तिमत्त्वाचेच एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. त्यांच्या एकंदर जीवन- प्रवासातून आणि चित्रांतूनही ते प्रकर्षाने दिसून येते. ज्याला ‘जॉन्र’ (John) असे म्हटले जाते, अशा कलाप्रकारात त्यांनी हाताळलेले विषय पाहिले तर आपल्याला हेच दिसून येते.

         हळदीकुंकू, लपंडाव, बाहुला असे अनेक विषय त्यांनी हाताळले. हळदीकुंकू हे तैलरंगातील मोठ्या आकाराचे चित्र आपले लक्ष वेधून घेते. मराठी कुटुंबातून होणारा, हा काहीसा धार्मिक अधिष्ठान ठेवून योजलेला स्त्री - समारंभ ! खरे तर, स्त्रियांना एकत्र जमण्याचे ते निमित्त. स्वातंत्र्यपूर्व काळातील १९३६ मधील हे चित्र आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेता, या चित्राचे व विषयाचे महत्त्व अधिक वाटते. मध्यमवर्गीय घरगुती समारंभाचे वातावरण, निरनिराळ्या कुटुंबातील, जाती-जमातींतील, आर्थिक स्तरांतील स्त्रिया, यांबरोबरच सुसंस्कृत, शिक्षित, पांढरपेशा वर्गाबरोबरच अशिक्षित, काहीशा उपेक्षित अशा कष्टकरी समाजातील स्त्रियांचेही चित्रण यातून दिसते. शहरी, ग्रमीण असा स्त्रियांचा भेदही इथे सूचित होतो.

         त्या काळच्या मराठी स्त्रियांची वेशभूषा, इष्ट देवतेकरिता केलेले सुशोभीकरण आदी गोष्टी इथे चित्रित केलेल्या दिसतात. चित्राचे बंदिस्तपण, मध्यमवर्गीय घरातील भिंतींचा रंग, पोत, काहीसा मंद प्रकाश इ. घटक अतिशय सुंदर रितीने चित्रित केलेेले दिसतात. मराठी स्त्रियांचे उठणे-बसणे, त्यांचे सजणे, नऊवारी साडी नेसणे, यांसारख्या तपशिलांतून मराठी स्त्रियांची खास वैशिष्ट्येच टिपली आहेत. अशा प्रकारची चित्रे म्हणजे त्या कालखंडातील वातावरणाचा, सामाजिकतेचा आणि संस्कृतीचा दस्तऐवजच असतो; जाणतेपणाने वा अजाणतेपणाने निर्माण केलेला!

         ‘विरहिणी’ हे चित्रही रविवर्म्याच्या प्रतिमाविश्‍वाची आठवण करून देणारे आहे. काहीसे काव्यात्मक आणि भावविभोर. वाड्याच्या आतील परिसरात पायर्‍यांवर बसलेली ही प्रौढा. स्वतःच्याच विश्‍वात हरवलेली ! कुठेतरी एकलेपणाची तीव्र जाणीव असलेली. सुकलेले झाड ग्रीष्म ऋतू दर्शवत असले तरी फुललेला गुलमोहर विरहातील प्रेमभावना सूचित करतो. काहीसे सांकेतिक चित्रण असलेले हे चित्र आहे. काळे-जांभळे लुगडे नेसलेली, किंचित स्थूल आणि विलक्षण उदास भाव दर्शविणारी ही स्त्री बघताना सहजता आणि नाट्य यांचा अतिशय सुंदर मिलाफच या चित्रांतून आपल्याला पाहायला मिळतो. त्या काळच्या समाजातील घराघरांतून असणार्‍या अशा स्त्रियांचे एक भावविश्‍वच यातून प्रतिबिंबित झालेले दिसते.

         कुलकर्णी यांच्या चित्रांत रंग, पोत, रंगलेपन, रचना, प्रकाश व अवकाशाचेही महत्त्व जाणवते. नदीकाठचे व उघड्या परिसरातील अवकाश त्यांच्या चित्रांतून जाणवते. तसेच, वास्तूच्या अंतर्भागातील अवकाश व प्रकाशाची नेमकी जाणीवही त्यांच्या चित्रांतून आपल्याला प्रकर्षाने होते. ‘विरहिणी’, ‘बाहुला’, ‘लपंडाव’ या कलाकृतींतून हा अनुभव आपल्याला घेता येतो.

         कुलकर्णी यांच्या चित्रांतील मानवाकृतींचे पवित्रे किंवा पोझेस अवघडल्यासारख्या वा मॉडेल उभ्या केल्यासारख्या दिसत नसून त्या प्रसंगाच्या वा घटनेच्या अनुषंगाने असणार्‍या अनुरूप व नैसर्गिक वळणाच्या वाटतात. अगदी सहज व स्वाभाविक अशा ‘लपंडाव’मधील गुडघ्यावर हात ठेवून किंचित वाकून उभी राहिलेली आकृती, जवळच जमिनीवर हात ठेवून व एक पाय दुमडून बसलेली मुलगी, ‘हळदीकुंकू’ या चित्रातील स्त्रिया, पायातील काटा काढताना या चित्रातील आपल्या आईच्या मांडीवर पाय ठेवलेला मुसमुसून रडत असलेला मुलगा, त्याच्याच शेजारी हात पाठीमागे घेऊन डोकावून पाहणारा त्याचा भाऊ, लाकडी संदुकीवर बसलेली आजी अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. यातून दिसतो तो मानवाकृतींचा त्यांचा अभ्यास. पण मजेची गोष्ट अशी, की बऱ्याचवेळा स्त्री - मॉडेल न मिळाल्यामुळे पुरुष मॉडेलवरून अवयवाचा फरक करून ते स्त्रीचे चित्र रेखाटीत.

         कुलकर्णींनी स्वतःच्या कुटुंबातील व्यक्ती, स्वतःच्या जीवनातील प्रसंग यांपासूनच प्रेरणा घेऊन ही चित्रे साकारलेली आहेत. त्यामुळे नकळतपणे त्यांच्या चित्रांना एक हृद्य असे परिमाण लाभले आहे. त्यांच्या चित्रांत काळाची मनःपूर्वक गुंतवणूक झालेली दिसते.

         कुलकर्णींनी तैलरंगात, तसेच जलरंगातही व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत. प्रामुख्याने त्यांच्या स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तींची आणि नातेवाइकांची, तसेच त्यांना वाटणाऱ्या आदर्श पुरुषांचीही ! माजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसादांचे प्रत्यक्ष सीटिंगवरून केलेले व्यक्तिचित्र हा त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण.

         कुलकर्णींनी शिल्पकलेतही काम केलेेले आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जेव्हा रंगसाहित्याची चणचण भासू लागली, तेव्हा त्यांनी मातीतून व्यक्तिचित्रे घडविली. शिल्पकार करमरकर हे त्यांचे स्फूर्तिस्थान होते. शिवाजी महाराज, डॉ. हेडगेवार, विवेकानंद, तात्या टोपे, राणा प्रताप या राष्ट्रपुरुषांच्या व्यावसायिक शिल्पांबरोबरच त्यांच्या स्वतःच्या पत्नीचे, तसेच कुटुंबातील इतर नातेवाइकांची अर्धशिल्पेही त्यांनी केली आहेत. त्यांनी केलेले कोळ्याचे शिल्प, सुईतून दोरा ओवणाऱ्या स्त्रीचे, तसेच लहान मुलांचे शिल्पदेखील फार सुंदर आहे. हुबेहूबतेबरोबरच नाजूकता व लालित्यही त्यात दिसते.

         कलावंत कुलकर्णींच्या व्यक्तिमत्त्वाचा - जीवनाचा दुसरा पैलू म्हणजे त्यांची समाजाविषयी असलेली तळमळ. त्यातूनच त्यांचे समाजकार्य घडले. कला ही समाजाकरिता असते याचे त्यांना भान होते. सामान्य रसिकांत कलाभिरुची वाढावी म्हणून त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. नाशिकच्या परिसरात जाऊन, त्या परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण स्थळांची, तसेच त्या परिसरातील निसर्गाची चित्रे काढून याच गावातील एखाद्या देवळात, अन्य ठिकाणी ते प्रदर्शने भरवत. नाशिकमध्ये अनेक मान्यवर चित्रकारांची प्रात्यक्षिके त्यांनी घडवून आणली, तसेच चित्रकारांची चित्रे संग्रहाकरिता त्यांनी विकतही घेतली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेशी त्यांची आयुष्यभर बांधीलकी होती. हाडाचे शिक्षक आणि मनाचे कलावंत असलेल्या वा.गो. कुलकर्णींनी आपल्या निष्ठा आयुष्यभर जपल्या आणि त्याप्रमाणेच ते जगले. कुठल्याही तडजोडी न करता, जीवनात आणि कलेतही! प्रसंगी, सुरुवातीच्या काळात दैनंदिन उदरनिर्वाहाकरिता त्यांनी छायाचित्रणकला शिकून त्याचा उपयोग केला.

         कुलकर्णी ८२ वर्षे जगले. भारतात होणाऱ्या अनेक प्रदर्शनांतून त्यांनी सुवर्ण, रौप्यपदके, तसेच अनेक पारितोषिके मिळवली. नाशिक हीच आपली कर्मभूमी ठरवून त्यांनी तेथेच कलानिर्मिती केली व कला समाजाभिमुख करण्याचा प्रयत्न केला. त्यांची योग्य ती  दखल मात्र घेतली गेली नाही अथवा त्यांना प्रसिद्धीही मिळाली नाही. त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर २००५ मध्ये जहांगीर आर्ट गॅलरीत होणाऱ्या ‘मास्टर स्ट्रोक्स ४’ या प्रदर्शनात त्यांची चित्रे प्रदर्शित करण्यात आली.

- शिवाजी तुपे, माधव इमारते

कुलकर्णी, वासुदेव गोविंद