Skip to main content
x

कुलकर्णी, विश्वास मुरलीधर

रविमुकुल

        पुस्तकांचे दृश्यसंकल्पन आणि मुखपृष्ठे, रेखाचित्रे, सुलेखन, छायाचित्रे अशा माध्यमांचा कल्पक उपयोग करणारे चित्रकार विश्वास मुरलीधर कुलकर्णी ऊर्फ रविमुकुल यांचा जन्म व शालेय शिक्षण उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरुम येथे झाले. त्यांनी १९८१ मध्ये  अभिनव कला महाविद्यालय, पुणे येथून उपयोजित कलेतील जी.डी. आर्ट ही पदविका प्राप्त केली.

        रविमुकुल यांच्यावर शालेय वयात संस्कार झाले ते चित्रकार दलाल, मुळगावकर यांचे. गंमत म्हणून यांच्या चित्रांची कॉपीही त्यांनी केली होती. आधी सोलापूर आणि नंतर पुण्यात आल्यावर पद्मा सहस्रबुद्धे, सुभाष अवचट, बाळ ठाकूर यांची पुस्तकाच्या आशयाला न्याय देणारी प्रयोगशील मुखपृष्ठे त्यांच्या पाहण्यात आली आणि पुस्तकांची मुखपृष्ठे म्हणजे निव्वळ सजावट नव्हे हे लक्षात आले.

        ‘फिरता सिनेमा’ या पुस्तकाचे रविमुकुल यांनी १९८० साली केलेले मुखपृष्ठ विश्वास कुलकर्णी या नावाने प्रसिद्ध झाले. ते त्यांचे पहिले मुखपृष्ठ होय. नंतर ‘रविमुकुल’ या नावानेच ते काम करू लागले. लेखनाच्या जातकुळीशी सलगी दाखवणारे आणि स्टॉलवर उठून दिसण्याइतपत आकर्षक असलेले मुखपृष्ठ असावे असे रविमुकुल यांचे मत आहे. त्यासाठी ते आधी पुस्तक वाचतात. ते वाचत असतानाच मुखपृष्ठावर चित्र काय असावे, त्यासाठी कोणते माध्यम निवडावे याचा अंदाज त्यांना येतो आणि मग ते कागदावर उतरते. रविमुकुल यांनी पुस्तकाच्या गरजेनुसार कधी सुलेखनाचा, कधी छायाचित्रणाचा, तर कधी मुद्रणातील तंत्राचा वापर करून अनेक अर्थपूर्ण मुखपृष्ठे केलेली आहेत.

        उदाहरणार्थ, ‘एका जन्मातल्या गाठी’ या कथासंग्रहाच्या मुखपृष्ठासाठी रविमुकुल यांनी झाडाच्या फांद्या चितारण्यासाठी काळ्या बॉलपेनचा वापर केला आहे, तर ‘खेळ मांडियेला’ या पुस्तकासाठी शेतावरचे दृश्य परिणामकारकपणे दाखवण्यासाठी पेपर कटिंगचे तंत्र वापरले आहे. ‘चिअर्स’ पुस्तकासाठी चिअर्स  या  मुक्तशैलीतल्या अक्षरांचा एकच ब्लॉक अक्षरमुद्रणपद्धतीने वेगवेगळ्या रंगांत छापून रविमुकुल यांनी मुखपृष्ठात रंगत आणली आहे.

        रविमुकुल उत्तम इलस्ट्रेटर आहेत. अनेक मासिकांमधून त्यांची कथाचित्रे प्रसिद्ध झालेली आहेत. रेखाटनांमधील त्यांच्या लयबद्ध आणि गतिमान रेषा, रेषांच्या जाळीमधून विशिष्ट पोत साधण्याचे कौशल्य आणि काळ्या/पांढर्‍या अवकाशाची केलेली नाट्यपूर्ण मांडणी ही त्यांच्या चित्रांची वैशिष्ट्ये आहेत. या वैशिष्ट्यांचा पुस्तकाच्या लेखनप्रकृतीनुसार लिखित आशय दृश्यरूप करण्यासाठी ते नेमका वापर करतात. अशा वेळेस त्यांच्या उपयोजित कलेलाही अभिजाततेचा स्पर्श होतो. उदाहरणार्थ, ‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी: संहिता आणि समीक्षा’ या शंकर सारडा संपादित पुस्तकाचे मुखपृष्ठ. कॅन्व्हसवर केलेल्या मूळच्या व्यक्तिचित्राचा पोत आणि वरच्या आडव्यातिडव्या रेघोट्यांनी साधलेला आणि मूळ चित्र धूसर करणारा पोत यांचा एकत्रित परिणाम अभिजात चित्राचा प्रत्यय देतो. पण त्याच वेळेस ह.मो. मराठेंच्या कादंबरीतील स्फोटक आशय आणि त्यावरील मतमतांतराचा गलबलाही त्यातून सूचित होतो.

        आशा बगे यांच्या ‘भूमिका आणि उत्सव’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील आणि आतील स्केचेसमधून बगे यांच्या लेखनशैलीला अनुरूप अशी सौम्य आणि संयत शैली रविमुकुल वापरतात. पांढर्‍या आणि करड्या रंगाचा, माणसाचे दुभंगलेपण दाखवण्यासाठी त्यांनी जो वापर केला आहे, त्यात ‘विचार’ आणि रेखाटनाला संकल्पनाच्या पातळीवर नेण्याची ताकदही आहे. अनेक मान्यवर लेखकांच्या साहित्यकृतींना दृश्य-माध्यमातून एक वेगळा अन्वयार्थ देणारे चित्रकार म्हणून रविमुकुल यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.

- दीपक घारे

कुलकर्णी, विश्वास मुरलीधर