Skip to main content
x

कुळकर्णी, वसंतराव

संतराव कुळकर्णी यांचा जन्म सातारा येथे झाला. सातारा - कऱ्हाडजवळच्या 'वऱ्हाड ' या गावचे राहणारे म्हणून त्यांचे मूळ नाव वऱ्हाडी होते. वडील बागायतदार होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोरेगावात झाले. सातवी अभ्यासासाठी ते बेळगावला चुलत्याकडे होते. या बेळगावातच त्यांच्यावर गाण्याचे संस्कार झाले. बेळगावाहून सातवी उत्तीर्ण झाल्यानंतर (त्या वेळची मराठी मॅट्रिक) वडिलांनी वसंतरावांना दुसऱ्या चुलत्याकडे इंग्रजी शिक्षणासाठी पाठविले. या चुलत्याला संगीत नाटकाची आवड होती. आपल्या घराण्यात कुणीतरी गाणे शिकावे ही त्यांची इच्छा होती. वसंतरावांना त्यांनी लक्ष्मणराव बैरागी या मास्तरांची शिकवणी ठेवली. ही त्यांच्या संगीत शिक्षणाची सुरुवात होय.
औंध येथे अंतूबुवा जोशींकडे शिकणाऱ्या बंडू कुळकर्णी या तरुणाच्या सुचवण्याने, तसेच
  गजाननबुवांच्या सल्ल्याने वसंतराव औंधला अंतूबुवांकडे संगीत शिक्षणाकरिता गेले. औंध येथे राहून त्यांच्या अतिशय कडक शिस्तीत तब्बल आठ वर्षे त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. वयाच्या पंचविसाव्या वर्षी बुवांच्याच सांगण्यावरून वसंतरावांनी औंधमधून मुक्काम हलवला आणि शिकवण्या व संगीताचे कार्यक्रम करून आपल्या चरितार्थास सुरुवात केली.
याच दरम्यान, त्यांच्या आयुष्यात एक नाट्यपूर्ण स्थित्यंतर घडून आले. बॅ. खाजगीवाल्यांनी त्यांच्या महेश नाट्य कंपनीत वसंतरावांना ७५ रु. पगारावर घेतले. इथून त्यांचा नाट्यप्रवास सुरू झाला. या कंपनीच्या ‘खलवधू’, ‘कृष्णकारस्थान’, ‘लक्षाधीश’ आदी नाटकांतून संगीत भूमिका करून त्यांनी नट म्हणून आपला जम बसविला. नाटकांतून काम करत असतानाच त्यांना गोविंदराव टेंब्यांचाही सहवास लाभला. महेश नाटक मंडळी दोन वर्षांतच बंद पडली. त्या वेळी बालमोहन संगीत नाटक मंडळी जोरात सुरू होती. बालमोहनचे मालक दामूअण्णा जोशींनी त्यांना आपल्या कंपनीत बोलावून घेतले. आचार्य अत्रेंच्या संगीत ‘पाणीग्रहण’ या नाटकातील वसंतरावांची चंडोलची भूमिका गाजली. याच कंपनीच्या ‘जग काय म्हणेल’, ‘लग्नाची बेडी’ आदी नाटकांतून त्यांनी प्रमुख संगीत भूमिका केल्या. या खेरीज  ‘शारदा’, ‘संशयकल्लोळ’, ‘सौभद्र’ या नाटकांतूनही त्यांनी भूमिका केल्या. ‘संशयकल्लोळ’ या नाटकाच्या शेकडो प्रयोगांत काम केले. त्यांनी १९४९ पासून नाट्यकलोपासक मंडळ, दादर या संस्थेच्या अनेक नाटकांचे नाट्य व संगीत दिग्दर्शन केले. याशिवाय इतर अनेक मंडळांची नाटकेही दिग्दर्शित केली. त्यांतील काहींना पारितोषिकेही मिळाली. वसंतरावांचा १९६१ पर्यंत रंगभूमीशी संबंध होता.
वसंतरावांनी अंतूबुवांकडून ग्वाल्हेर घराण्याची गायकी आत्मसात केली. त्यानंतर त्यांनी आग्रा घराण्याचे गायक व वाग्गेयकार पं. जगन्नाथबुवा पुरोहितांकडे १९६८ पर्यंत म्हणजे बुवांच्या अखेरपर्यंत तालीम घेतली. त्यानंतर १९७७ पासून उ. खादीम हुसेन खाँ कडेही ते शिकत होते. वसंतराव कुळकर्णी यांचे गायकापेक्षाही एक उत्तम शिक्षक म्हणून योगदान फार मोठे आहे. ‘गुरू समर्थ गायन विद्यालया’ची स्थापना १९५२ साली गोरेगावात झाली. सुरेश हळदणकरांच्या साहाय्याने त्यांच्याच जागेत हे विद्यालय १९५३ साली सुरू झाले. त्यानंतर १९५९ साली ‘सफिया मंझिल’मध्ये हे विद्यालय आले व ते आजतागायत सुरू आहे.
अतिशय शिस्तबद्ध, वेळेच्या बाबतीत काटेकोर असलेल्या वसंतराव कुळकर्णींच्या हाताखाली आजवर अनेक विद्यार्थी शिकून गेले आहेत. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देऊन, शास्त्राच्या बाबतीत तडजोड न करता, विद्यार्थ्यांच्या वकुबानुसार, त्याचा मूळ आवाज बिघडू न देता त्याचे गाणे ते फुलवत. अस्थायी अंतऱ्यावर त्यांचा विशेष कटाक्ष असे. आरती अंकलीकर-टिकेकर, रघुनंदन पणशीकर, देवकी पंडित, प्रमिला दातार, विजया जोगळेकर-धुमाळे, नरेन्द्र दातार, राणी वर्मा, भारती वर्मा अशा अनेक गायक-गायिकांचा शास्त्रीय संगीताचा पाया पक्का करून घेण्यात व त्यांच्यामधील सांगीतिक गुण फुलविण्यात वसंतरावांचा वाटा निश्चितच मोठा आहे.
अनेक बंदिशी त्यांच्या संग्रही होत्या. त्यांचे कार्यक्रम जाहीररीत्या विशेष झाले नसले तरी खासगी कार्यक्रमात ते रंग भरत. त्यांचा आवाज तसा मैफिलीतील गायनाला अनुकूल नव्हता. मा. कृष्णराव, राम मराठे यांचा त्यांच्या गायनावर विशेष प्रभाव होता. ‘गुनिये’ या नावाने त्यांनी अनेक बंदिशी रचल्या .

माधव इमारते

कुळकर्णी, वसंतराव