Skip to main content
x

कुलवाल, लक्ष्मीनारायण विठ्ठलदास

          विदर्भासाठी  मूलस्थानी आंबा कलमाची लागवड व संत्रा फळांची गळ’ यावर उल्लेखनीय कार्य करणार्‍या डॉ. लक्ष्मीनारायण विठ्ठलदास कुलवाल यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील रायपूर या गावी झाला. त्यांनी बी.एस्सी. (कृषी १९६४) व एम.एस्सी. (उद्यानविद्या १९६८) पदवी नागपूर कृषी महाविद्यालयातून प्राप्त केली. पुढे त्यांनी कृषी विद्यापीठ बंगळुरू येथून १९८०मध्ये पीएच.डी. पदवी मिळवली. सुरुवातीच्या काळात डॉ. कुलवाल यांनी कृषी पर्यवेक्षक म्हणून देऊळगाव येथे नोकरी केली. पुढे कृषी अधिकारी म्हणून व त्यानंतर व्याख्याता म्हणून त्यांनी नागपूर, जळगाव, कोल्हापूर व अकोला येथे काम केले. नंतर डॉ.पं.दे.कृ.वि.त त्यांनी साहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक या पदांवर काम केले. त्यांची १९९१मध्ये प्राध्यापक म्हणून निवड झाली. त्यानंतर ऑक्टोबर २०००मध्ये त्यांची निवड संचालक विस्तारशिक्षण या पदावर झाली. या पदावर कार्यरत असताना त्यांनी अधिष्ठाता (निम्न शिक्षण), अधिष्ठाता (पदव्युत्तर शिक्षण) या पदांचा अधिभार सांभाळला. ते उद्यानविद्या विभागप्रमुख म्हणून सप्टेंबर १९९६पासून कार्यरत होते आणि ऑक्टोबर २०००पासून ते संचालक झाल्यावर विभागप्रमुख पदाचा अधिभार त्यांच्याकडे होता. ते एप्रिल २००२मध्ये सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतर कुलवाल यांनी एप्रिल २००४ ते एप्रिल २००७ या काळात डॉ. पं.दे.कृ.वि.त कार्यकारी परिषदेचे तज्ज्ञ सदस्य, तसेच काजू संशोधन व ऑइलपाम समिती या अखिल भारतीय कृषी परिषद, नवी दिल्लीच्या क्यूआरटी समितीत सदस्य म्हणून कार्य केले.

          डॉ.कुलवाल यांनी मूलस्थानी आंबा कलमांच्या लागवडीबाबतचे संशोधन व त्यावरची शिफारस केली. त्यांनी डॉ.देशमुख व डॉ.गुणवंत तायडे या सहकाऱ्यांसह पॉलीबॅगमध्ये चिकूची मृदुकाष्ठ कलमे करण्याची पद्धत विकसित केली. तसेच चिकू अभिवृद्धी याविषयी डॉ.प्र.पुं.देशमुख व डॉ.कुलवाल यांनी नवसारी येथील राष्ट्रीय परिसंवादात निबंध सादर केला. डॉ. कुलवाल यांनी संत्रा, किन्नो व लिंबाच्या खुंटा जातीवर संशोधन केले. त्यांनी आंब्याच्या विविध वाणांवर प्रयोग केले. चिंचेचा स्मृती वाण, कांद्याचा अकोला सफेद वाण, भेंडीचा अकोला बहार वाण विकसित करण्यात त्यांचा सहभाग होता. त्यांनी पानकोबीचा खोडवा घेण्याची पद्धत, कांदा व लसणाची सघन लागवड पद्धत विकसित केली.

          डॉ कुलवाल यांचे ३६ संशोधनपर निबंध, ५३ शास्त्रीय लेख, ९ पुस्तिका, ४ पुस्तके, २ अहवाल प्रकाशित झाले असून, ४३ मराठी लेख, ४ घडीपत्रिकाही त्यांनी लिहिल्या आहेत. कांदा लागवडीत पहिले बक्षीस (१९८४), अ‍ॅस्पी पुरस्कार (१९८४), डॉ.पटेल पुरस्कार (१९८५), उत्तम शिक्षक पदक (१९८५), उत्तम संशोधनाबाबत डॉ.के.जी.जोशी बक्षीस (१९८६-८७) व इंडियन सिट्रीकल्चर संस्थेद्वारे जीवनगौरव पुरस्कार (२००६) आदी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. त्यांचा अकोला येथे उद्यानविद्या महाविद्यालयाचे बळकटीकरण करण्यात सिंहाचा वाटा होता.

          कुलवाल यांनी कृषिविस्तार कार्यातही भरीव कार्य केले. विद्यापीठस्तरीय मोठे वार्षिक कृषी प्रदर्शन नेहमी अकोला येथे होत असे, मात्र डॉ.कुलवाल विस्तारशिक्षण संचालक असताना त्यांनी हे प्रदर्शन इतर केंद्रांवर (नागपूर, अमरावती, बुलढाणा, सिंदेवाही, गोंदिया इ.) घेण्याचा पायंडा पाडला. अशा तऱ्हेने त्यांनी खेड्यात शेतकऱ्यांचे दाराशी नेऊन कृषी ज्ञानाचे दालन खुले केले. 

-  डॉ. प्रकाश पुंडलिक देशमुख

कुलवाल, लक्ष्मीनारायण विठ्ठलदास