Skip to main content
x

कुंटे, यशवंत नारायण

          बिनबियांचा (सीडलेस) संत्र्याचा वाण शोधून काढण्याचे महत्त्वाचे काम करणारे कृषिशास्त्रज्ञ यशवंत नारायण कुंटे यांचा जन्म त्या काळच्या मध्य प्रदेश राज्यातील (सध्याचा छत्तीसगड) बिलासपूर येथे झाला. त्यांनी १९४७मध्ये नागपूर कृषी महाविद्यालयातून बी.एस्सी. (कृषी) पदवी प्राप्त केली. नागपूर जिल्ह्यातील रामटेकमधील थारसा येथील संत्रा संशोधन केंद्रात संशोधन साहाय्यक म्हणून १९४९मध्ये त्यांची नेमणूक झाली. तेव्हाच त्यांनी फलोद्यान या विषयात १९४९-५१मध्ये पुण्यातील कृषी महाविद्यालय येथून एम.एस्सी. (कृषी) पदवी प्राप्त केली. त्यांनी १९५८ ते ६१पर्यंत पुण्यातील कृषी महाविद्यालयात व्याख्याता म्हणून सेवा केली. त्यानंतर अकोला येथे कृषी विद्यापीठ स्थापन झाले व त्यांची प्राध्यापक म्हणून निवड होऊन नागपूर येथे कृषी महाविद्यालयात बदली झाली. तेथून ते १९८३मध्ये सेवानिवृत्त झाले.

         कुंटे यांनी संत्रा संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर १५०० संत्रा कलमांची सुयोग्य आखणी व लावणी केली. लुसर्न गवतात त्यांना ट्रायकंटेनॉल हे संजीवक सापडले व त्याची फवारणी संत्रा झाडावर केल्यास वेगाने व चांगली वाढ होते, असे त्यांना आढळले. बिनबियांचा संत्रा वाण हे त्यांचे अत्यंत महत्त्वाचे संशोधन होय. नागपूरच्या तेलखेडी बागेत १८२ क्रमांकाच्या झाडावरची फळे त्यांना बिनबियांची (१९६५) आढळली. त्यावर त्यांनी १० वर्षे संशोधन केले. या वाणाची कलमे लावून बागा तयार केल्या. या बिनबियांच्या संत्र्यात १.४४ बिया (दीड बिया सरासरी प्रतिफळ) असतात, तर नेहमीच्या संत्र्यात ८ ते १२ बिया प्रतिफळ असतात. या बिनबियांच्या संत्रा झाडाची उंची ४.३६ मीटर, लांबी  रुंदी (आकारमान) २४ चौ.मी. असते. फळांचे वजन १३४ ते १४१ ग्रॅम व रसाचे प्रमाण ५२% आहे. फळप्रक्रिया (रस, सरबते, जेली, मार्मलेड इत्यादी) उद्योगात या बिनबियाच्या फळांना मोठी मागणी आहे. याच्या रसात कडवटपणा नसतो. हा वाण १९८३मध्ये प्रसारित केला व महाराष्ट्र राज्य स्तरावर २००३च्या मे महिन्यात त्याची शिफारस केली गेली. प्रा. कुंटे हे इंडियन सोसायटी ऑफ सिट्रीकल्चर या संस्थेचे आजीव सदस्य आहेत. भा.कृ.अ.सं., पुसा, नवी दिल्ली यांनी संत्राबागांचे पुनरुज्जीवन व संगोपन यावर पाहणी करून (१९८१) शिफारशी करण्यासाठी एक समिती तयार केली होती. यावर प्रा. कुंटे एक सदस्य होते व त्या समितीने सुचवल्यानुसार पुढे नागपूर येथे राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र स्थापन झाले.

        प्रा. कुंटे यांनी ‘प्रिन्सिपल्स ऑफ हार्टिकल्चर’ या नावाने इंग्रजीत एक पुस्तक लिहिले. त्याच्या १० आवृत्त्या निघाल्या आहेत. त्यांनी सोलन (हिमाचल), नागपूर, बंगलोर येथे झालेल्या अ. भा. फळपिके परिसंवादामध्ये शोधनिबंध वाचले. ते एम.एस्सी. व पीएच.डी. (उद्यानविद्या) साठी मान्यताप्राप्त परीक्षक आहेत.

- डॉ. प्रकाश पुंडलिक देशमुख

कुंटे, यशवंत नारायण