Skip to main content
x

खैरनार, गोविंद राघो

            बृहन्मुंबईमहानगरपालिकेतील अतिक्रमणविरोधी कारवायांकरिता व देशव्यापी चर्चेसाठी सर्वाधिक गाजलेली कारकीर्द म्हणून गोविंद राघो खैरनार यांची कारकीर्द ओळखली जाते. लहानपणापासून प्रत्येक बाबतीत केवळ सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास न ठेवता ती गोष्ट स्वानुभवाने तावून सुलाखून घेणे व मगच योग्य व खऱ्या निष्कर्षाप्रत पोहोचणे ही खैरनार यांची सवय, तसेच अन्यायाविरुद्ध आपला आवाज उठवणे व विरोध करणे ही त्यांची वृत्ती या गोष्टी प्रेरणादायक आहेत.

       एका शेतकरी कुटुंबात नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातल्या पिंपळगाव (वाखारी) येथे गोविंद राघो खैरनार यांचा जन्म झाला. पूर्णपणे अशिक्षित अशा घराण्यातील गोविंद खैरनार हे शाळेत जाणारे पहिलेच. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नाशिक येथील भिकुसा यमासा क्षत्रिय वाणिज्य महाविद्यालयातून त्यांनी बी.कॉम. पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षणासोबत त्यांनी एन.सी.सी. मध्येही प्रवेश घेतला व उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून पारितोषिकही मिळविले. शालेय, महाविद्यालयीन जीवनातही अपात्र शिक्षक व भ्रष्टाचारी वसतिगृह चालक यांच्याविरुद्ध त्यांनी आवाज उठवलेला आहे. प्रथमत: १९६४ पासून राज्यशासनाच्या सेवेत त्यांनी नोकरीची सुरुवात केली व नंतर १९७४ पासून बृहन्मुंबई महापालिकेच्या सेवेत ते विभाग अधिकारी म्हणून रुजू झाले.

       अनधिकृत बांधकामविरोधी कारवायांमुळे खैरनार यांची कारकीर्द विशेष गाजली. मुंबईतील फोर्ट वस्तुसंग्रहालयाजवळील अनधिकृत दुकाने व फेरीवाले हटविण्याची मोहीम ही अशा प्रकारच्या मोहिमांची सुरुवात होती. प्रचंड राजकीय विरोध, वरिष्ठांचा विरोध अशा एकूणच दबावपूर्ण स्थितीतही आपण आपले काम चोखपणे बजावण्याची हातोटी व प्रसंगी आवश्यक असा  निर्भयपणा व कर्तव्य, कार्यतत्परता  या गुणांमुळेच खैरनार भविष्यकाळात ‘वन मॅन डिमॉलिशन आर्मी’ या विशेषणाने ओळखले जाऊ लागले.

       कुर्ला विभागातील कुर्ला स्टेशनच्या पश्चिमेला लागून असलेल्या बस टर्मिनसच्या ठिकाणी दोनशे-अडीचशे फेरीवाले, पथारीवाले, हातगाडीवाले, टपऱ्या इत्यादींनी अतिक्रमण  केल्याने बससेवा बंद करण्याची वेळ आली होती. पोलिसांच्या मदतीने प्रथम अतिक्रमण हटविण्याच्या प्रयत्नात अपयश आले. सोबत आवश्यकतेपेक्षा जास्त पोलीस ताफा असूनही केवळ राजकीय इच्छाशक्तीवरच देशातील यंत्रणा चालतात याचा प्रत्यय त्या ठिकाणी आला. परंतु नंतर योग्य पोलीस अधिकारी सदर विभागात बदलून आल्यावर हीच कार्यवाही कमीतकमी पोलीस ताफा व म.न.पा. कर्मचाऱ्यांच्या मदतीने चार ते पाच तासांत निकालात निघाली. सदर फेरीवाल्यांनी खैरनार यांच्या घरासमोर कारवाईच्या निषेधार्थ रोज रात्री अकरा वाजेपर्यंत मोर्चा नेण्याचे उद्योग साधारण आठ-दहा दिवस केले. नंतर पालिकेच्या कार्यालयात बैठक चालू असताना घुसून तोडफोड, तसेच सामानाची फेकाफेकी करण्याचे विध्वंसक कृत्य केले. सदर परिस्थितीतही स्वत:चा व सहकाऱ्यांचा बचाव करण्यासाठी प्रसंगी आक्रमकता दाखवून समोरच्याचे मनोबल खच्ची करून त्या परिस्थितीवर खैरनार यांनी विजय मिळवला.

       शीव (सायन) रस्ता रुंदीकरण या कामासाठी आवश्यक असलेल्या जागेवर अनधिकृत मटका व्यवसाय, मच्छी मार्केट, मंदिर, इत्यादींवर त्यांनी योग्य कारवाई केली. त्या ठिकाणी मोठा व लांब सिमेंटचा रस्ता तयार झाला.

        तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातेवाईक, चंद्रकांत पाटील यांचे अनधिकृत हॉटेल त्यांनी पोलिसांच्या मदतीने जमीनदोस्त केले.

      शिवाजी पार्कवरील बेकायदा धार्मिक स्थळे, धारावी  येथील कुख्यात ‘डॉन’ दाऊद इब्राहिमची मेहजबिन इमारत, भेंडीबाजार, मुसाफिर खाना, अशा अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामविरोधात कारवाया करण्यात खैरनार यांचा पुढाकार होता. पैकी काही कारवाया यशस्वी झाल्या , तर काही राजकीय हस्तक्षेपामुळे अयशस्वी ठरल्या .

      खैरनार यांची १जानेवारी१९८८ पासून उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली. वरील प्रकारच्या अतिक्रमणविरोधी कारवायांबरोबरच पालिका कर्मचार्‍यांमध्ये शिस्तीचे वातावरण निर्माण करणे, राजकीय भ्रष्टाचारी अधिकारी, तसेच कुविख्यात गुंडाना टक्कर देणे, विविध प्रकारचे भ्रष्टाचार जवळून पाहणे व शक्य तेथे विरोध करणे, दुर्दैवाच्या फेर्‍यात अडकलेल्या  वेश्यांची कुंटणखाण्यातून सुटका व पुनर्वसन करणे असे अनेक प्रकारचे कार्य खैरनार यांच्या नावावर जमा आहे.

      अशा प्रकारच्या नि:स्पृह, नि:स्वार्थी व कर्तव्यतत्पर अधिकार्‍यास समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिलेला आहे, तसेच वृत्तपत्रांनीही त्यांच्या कामाची योग्य दखल वेळोवेळी घेतलेली आहे.

     तरीही आपल्या देशात अशा अधिकार्‍यास २९जून१९९४ पासून महापालिका सेवेतून राजकीय आकसाने तांत्रिक कारण दाखवून निलंबित करण्यात आले. निलंबनानंतरही त्यांची भ्रष्टाचाराविरोधी वैयक्तिक लढाई चालूच राहिली. देशव्यापी, राज्यव्यापी, व्याख्यान दौरे, तसेच अनेक सभा-संमेलने या माध्यमातून त्यांनी भ्रष्टाचारविरोधी व्यापक जनआंदोलन लढा चालू ठेवला.

- वसुधा कानडे

खैरनार, गोविंद राघो