Skip to main content
x

खांबेटे, दत्तात्रेय पांडुरंग

सोमाजी गोमाजी कापशे

     दत्तात्रेय पांडुरंग खांबेटे यांचा जन्म वेंगुर्ला येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण व उच्च शिक्षण अनुक्रमे चिपळूण, वेंगुर्ल्याचे मिशन स्कूल व सांगली येथील विलिंग्डन महाविद्यालय येथे झाले. ते १९३६ मध्ये बी. ए., १९४१ मध्ये एम.ए. झाले. सुरुवातीला त्यांनी काही काळ शिक्षक म्हणून काम केले. नंतर १९४७ मध्ये ‘लोकमान्य’ दैनिकात त्यांनी उपसंपादक म्हणून काम केले. १९६०-१९६५ मध्ये ‘मार्मिक’च्या संपादकीय विभागात होते. अनेक टोपणनावांनी चुरचुरीत, विनोदी व राजकीय विषयांवर मर्मभेदक लेखन करण्यात त्यांचा हातखंडा होता. इंग्रजी व मराठी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांचे वाचनही दांडगे होते.

     महाविद्यालयात असताना, १९३५ साली नव्यानेच निघालेल्या ‘मनोहर’ मासिकात त्यांची पहिली विनोदी कथा प्रसिद्ध झाली. त्यानंतर ‘मनोहर’, ‘किर्लोस्कर’ मासिकांत, ‘मार्मिक’ साप्ताहिकात त्यांचे लेखन प्रसिद्ध होऊ लागले. ‘ग्रंथ कीटक’ या टोपणनावाने ‘नवनीत’ मासिकाच्या सदरातील लेखांचे संकलन असलेले त्यांचे पुस्तक आहे. अनेक नियतकालिकांतून विज्ञान विषयावर त्यांनी जे लेख लिहिले, त्यांतील निवडक लेखांचा संग्रह ‘मोठ्या माणसांच्या गमतीदार गोष्टी’ (संभाषण चतुरांचा सोबती) हा आहे. ‘पन्नास-एक वर्षांत मुंबई समुद्रात बुडेल’ या पुस्तकात विज्ञानाच्या विविध क्षेत्रांतील चित्ताकर्षक व रोमहर्षक अशा अनेक हकिकती खांबेटे यांनी सांगितल्या आहेत.

     खांबेटे यांनी विज्ञान कथा, काल्पनिक कथा आणि अद्भुत कथा लिहिल्या त्या ‘शामकांत सामंत’ या टोपणनावाने. विज्ञान कथा हा प्रकार मराठीत प्रथम खांबेटे यांनी आणला. पहिला भयकथासंग्रह ‘भीतीच्या छाया’ (१९४८) हादेखील त्यांच्याच नावावर आहे. जगातील गाजलेल्या स्त्री-पुरुष गुप्तहेरांवर त्यांनी रंजक व माहितीपूर्ण लेख लिहिले आहेत.

     खांबेटे यांच्या गुप्तहेर कथा, युद्ध कथा, गुन्हेगार कथा, अतिंद्रियशक्ती असलेल्या सिद्ध मांत्रिकांच्या कथा, बंडलबाजीच्या कथा असे विविध प्रकारचे सत्यकथांचे आठ संग्रह प्रकाशित झाले आहेत.

     ‘दैनिक लोकमान्य’ची रविवारची आवृत्ती, ‘साप्ताहिक मार्मिक’, ‘नवल’, ‘नवनीत’ इत्यादी मासिके, नियतकालिके ह्यांतून खांबेटे यांनी विपुल लेखन केले आहे. १९६६ ते १९७१ या कालावधीत ‘नवनीत’ मासिकात दर महिन्याला खांबेटे किमान पाच लेख लिहीत असत. त्यातील एका लेखावर त्यांचे नाव असे. बाकीचे लेख ते विविध टोपणनावांनी लिहीत असत. उदाहरणार्थ सोमाजी गोमाजी कापशे, मंडणमिश्र, के. दत्त, दत्ता मराठे, प्रज्ञानंद, गोष्टीवेल्हाळ, निसर्गप्रेमी, चंद्रहास, संतदास, शामकांत सामंत, मुरारी वेंगुर्लेकर अशी ही विविध टोपणनावे.

     महाविद्यालयात असताना खांबेटे यांनी रामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंद यांची चरित्रे वाचली होती. ते त्यांचे अनन्य भक्त बनले होते. विवेकानंदांची बरीच तेजस्वी भाषणे त्यांना अगदी मुखोद्गत होती. आधी आपण नास्तिकच होतो, पण स्वामी विवेकानंदांनी आपले संतांविषयीचे गैरसमज पूर्णपणे दूर केले, असे ते म्हणत. नंतर त्यांना संतचरित्रे व संतांची शिकवण या वाचनाची गोडीच लागली. ‘नवनीत’ मासिकात खांबेटे यांनी सतत पाच वर्षे ‘तरुणांचे स्फूर्तिदाते संत’ या विषयावर लेखन केले. यांपैकी काही लेख ‘संतांनी सांगितलेली सुखाची साधना’ या पुस्तकात तर बाकीचे लेेख ‘चिरंतन सुखाचे मार्गदर्शन’ या पुस्तकात प्रसिद्ध झाले.

     याव्यतिरिक्त ‘उपहास’ (१९७०), ‘माझे नाव रमाकान्त वालावलकर’ (१९६०-१९८५), ‘नवर्‍याचे संगोपन’ (१९७१), ‘प्रेमाची देणीघेणी’ (१९७६) असे अनेक कथासंग्रहही प्रसिद्ध आहेत. पण त्यातही त्यांचे विनोदी कथालेखन अग्रस्थानी आहे. मराठी माणसांच्या दैनंदिन जीवनातील साध्यासुध्या घटनांतून खळाळत्या हास्यनिर्मितीचा आविष्कार साधण्याचे विलक्षण कौशल्य लक्षणीय आहे. त्यांच्या अनेक कथा ‘हंस’, ‘मोहिनी’ ह्या मासिकांत प्रसिद्ध झाल्या.

     मानसशास्त्र या विषयावरही त्यांनी जे अभ्यासपूर्ण सुबोध लेखन केले, तेही वाचकप्रिय ठरले. ‘हसत खेळत मनाची ओळख’ (१९६०), ‘स्वयंसूचना’ (१९६०), ‘मनाच्या संशोधनाची सुरस कथा’ (१९७०), ‘आजारीपणाचे मानसशास्त्र’ (१९७४) इत्यादी ‘न्यूनगंड’ हे मानसशास्त्रीय पुस्तक  हे त्यांचे शेवटचे लेखन होय.

     केरळमधील कान्हनगड येथील आनंदाश्रमाचे श्रीस्वामी रामदास हे खांबेटे यांचे आध्यात्मिक गुरू होते. त्यांच्या ‘In Quest of God ’ आणि ‘श्रीमाताजी कृष्णाबाई’ या दोन इंग्रजी पुस्तकांचे त्यांनी मराठीत अनुवाद केले आहेत. तसेच धनंजय कीर लिखित ‘वीर सावरकर’ या इंग्लिश चरित्राचा खांबेटे यांनी केलेला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (१९७२) हा अनुवादही उत्कृष्ट आहे. 

- प्रा. मंगला गोखले

खांबेटे, दत्तात्रेय पांडुरंग