Skip to main content
x

खंडालवाला, कार्ल जमशेद

     कार्ल जमशेद खंडालवाला यांच्या आईचे नाव खोरशेद होते. कायद्याची पदवी प्राप्त केल्यावर अल्पावधीतच कार्ल यांनी वकिलीत नावलौकिक मिळवला. विद्यार्थिदशेपासूनच प्राचीन भारतीय चित्रकलेकडे त्यांचा ओढा होताच. कायद्याच्या अभ्यासाबरोबर त्याचाही व्यासंग वाढत गेला. प्रगाढ विधिज्ञता आणि कला इतिहास नैपुण्य अशा दोन विभिन्न क्षेत्रांत कार्ल खंडालवाला यांना चांगलीच प्रतिष्ठा लाभली आणि ललित कला (प्राचीन) खंडाच्या संपादनाची जबाबदारी त्यांच्याकडे आली. तसेच मार्ग पब्लिकेशनच्या प्रकाशनांसाठी तज्ज्ञ सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिले. पीएच.डी. पदवीसाठी परीक्षक म्हणून अनेक विद्यापीठांनी खंडालवाला यांची नियुक्ती केली आहे. कलाक्षेत्रामध्ये खंडालवाला यांनी प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, मुंबईचे चेअरमन व बोर्ड ऑफ ट्रस्टीजचे सदस्य; ‘कला एन्शंट’चे सन्माननीय प्रमुख संपादक अशी मानाची अनेक पदे भूषवली.

खंडालवाला यांनी लिहिलेल्या आणि संपादन केलेल्या काही प्रमुख पुस्तकांमध्ये ‘पहाडी मिनिएचर पेंटिंग्ज’, ‘न्यू डॉक्युमेंट्स ऑफ इंडियन पेंटिंग्ज’, ‘इंडियन पेंटिंग्ज अँड स्कल्प्चर्स’, ‘अमृता शेरगील’, ‘हेब्बर’, ‘गुल्शन-इ-मुसावी’, ‘कलेक्टर्स ड्रीम’ इत्यादीचा समावेश आहे. यातील काही ग्रंथांसाठी डॉ. मोतीचंद्र आणि शरयू दफ्तरी दोशी यांनी सहलेखन केले आहे. भारत सरकारने कार्ल खंडालवाला यांना ‘पद्मश्री’ देऊन सन्मानित केलेले असून त्यांना कलकत्त्याच्या एशियाटिक सोसायटीचे ‘रामप्रसाद चंद्र मेडल’ बहाल करण्यात आले होते. ते ललित कला अकादमीचे सन्माननीय फेलो होते.

एक कायदेपंडित म्हणून निवृत्त झाल्यावर वार्धक्यातही त्यांनी चित्रकलेचा छंद जोपासला.

संपादित

खंडालवाला, कार्ल जमशेद