Skip to main content
x

लोहकरे, दत्तात्रेय मोरेश्वर

अनंतदास रामदासी

    नंतदास रामदासी म्हणजेच पूर्वाश्रमीचे दत्तात्रेय मोरेश्वर लोहकरे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील भोर संस्थानात ज्येष्ठ शुद्ध दशमी, या तिथीला झाला. त्यांच्या आईचे नाव रंगूबाई. दत्तात्रेय २-३ वर्षांचा असतानाच त्याचे मातृछत्र हरपले. दत्तात्रेयाचे वडील शाळा खात्यात नोकरीला होते. त्यांची शिस्त अत्यंत कडक त्यामुळे नीटनेटकेपणा, स्वच्छता, टापटीप, स्वावलंबन हे चांगले गुण लहान वयातच त्यांच्या अंगी बाणले. वडिलांच्या सतत बदल्यांमुळे नेवासे, संगमनेर, अहमदनगर, पुणे इत्यादी ठिकाणी त्याचे शिक्षण पार पडले.

     फायनलची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर दत्तात्रेयांनी काही काळ वऱ्हाडात नोकरी केली व नंतर ल.रा.पांगारकर यांच्या ‘मुमुक्षु’ मासिकातही काही काळ नोकरी केली. पण त्यात त्यांचे मन रमले नाही. त्यांनी नोकरी सोडून दिल्यामुळे वडिलांनी रागावून दत्तात्रेयांना घर सोडून जाण्यास सांगितले, तेव्हा त्यांनी खरोखरच घर सोडले. शोधाशोध करूनही दत्तात्रेय न सापडल्यामुळे शोकाकुल होऊन वडिलांनी इहलोक सोडला.

     दत्तात्रेयांना विशीतच ल.रा.पांगारकरांचा सहवास लाभल्यामुळे त्यांच्या सदुपदेशाने दासबोधाची आवड निर्माण झाली होती. पांगारकरांचा निरोप घेऊन दत्तात्रेयाने नाशिक-पंचवटीकडे प्रयाण केले. तेथे काही वर्षे गायत्री पुरश्चरण केले आणि समर्थ भक्तीची सुरुवात केली. नंतर त्यांनी नाशिक सोडून पदभ्रमण सुरू केले. गोपाळ नावाच्या एका दशग्रंथी ब्राह्मणासोबत अनेक तीर्थक्षेत्रे हिंडत दत्तात्रेय १९०७ च्या माघ महिन्यात काशीला आले. दत्तात्रेयाने तेथे गोजीवन चौंडे महाराजांच्या नेतृत्वाखाली रामघाटावरील बालकराम मंदिरात चाललेल्या त्रयोदशाक्षरी महामंत्र अनुष्ठानात सहभाग घेतला. दत्तात्रेयांची भक्ती व सेवाभाव पाहून महाराजांनी त्यांच्यावर कृपानुग्रह केला. रथसप्तमीच्या पवित्र दिवशी दत्तात्रेय रामदासी झाले आणि त्यांचे नामकरण ‘अनंतदास रामदासी’ असे करण्यात आले. त्याच मुहूर्तावर काशीत समर्थांची मूर्ती व पादुकांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. काशीपासून आठ कोसांवर असलेल्या हनुमान मंदिरात अनंतदासांनी दीड वर्षे पुरश्चरण केले.

     अनंतदास १९०९ मध्ये चौंडे महाराजांच्या सोबत काशीहून वाईस आले. तेथे गोशाळेची व संस्कृत पाठशाळेची जबाबदारी त्यांनी उत्कृष्टपणे सांभाळली. तसेच, त्यांनी विरोधकांना तर्कशुद्ध पद्धतीने तोंड देत गोवर्धन संस्थेने चालविलेल्या तीन मासिकांचे व पाक्षिकांचे संपादन केले.

     श्री चौंडे महाराजांच्या आज्ञेनुसार श्रीसमर्थकृत अभंग संकलित करण्याचे कार्य हाती घेऊन मठाच्या वतीने ‘श्रीसमर्थांची अभंग गाथा’ अनंतदासांनी प्रकाशित केली. १९०९ साली सज्जनगडावर १३ कोटींचे जपानुष्ठान झाले व त्यानंतर गोवर्धन संस्थेचे अनंतदास विश्वस्त झाले. एक-दोन वर्षे त्यांनी चौंडे महाराजांबरोबरच्या दौऱ्यात भ्रमंती केली. १९११ साली ‘श्री रामदासी सांप्रदायिक उपासना पद्धती’ प्रकाशित झाली. १९१८ मध्ये त्यांनी ‘गोरक्षण’ वृत्तपत्राचे संपादकत्व स्वीकारले. गणेशोत्सव, गोवर्धन मठ सुरू करून समाजात गोरक्षणाविषयी जागृती निर्माण केली. रामदास कथा; ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी यासाठी महाराजांसमवेत व स्वतंत्रपणे अनंतदास यांनी भारतभर पर्यटन केले. सतत संचार करून समर्थ संप्रदाय व गोसेवेच्या कार्याचा प्रचार व प्रसार केला.

     विदर्भात हिंगणघाट, जि.वर्धा यापासून सुमारे १५ मैलांवर असलेल्या गिरड खेडेगावात पुरातन श्रीराम मंदिर आहे. अशा या दोन-अडीचशे वर्षांची थोर परंपरा असलेल्या मठावर सर्वसंग परित्यागी, वितरागी अशा अनंतदासजींची मठाधीश म्हणून १९३५ साली नियुक्ती झाली. मठाचे कार्य लोकाभिमुख करण्याकडे लक्ष घातल्यामुळे मध्यंतरीच्या काळात नाममात्र राहिलेल्या गिरड मठाचे नाव अनंतदास यांच्यामुळे महाराष्ट्रभर नव्हे, तर संपूर्ण हिंदुस्थानात झाले. १९४२ साली वेदशास्त्रसंपन्न रामदासशास्त्री जोशी व वामनराव मुळे यांच्या साहाय्याने गिरड, हिंगणघाट व नागपूर येथे संस्कृत पाठशाळा स्थापन करण्यात आल्या.

     अनंतदास यांनी १९३५ मध्ये श्री चौंडे महाराजांच्या विस्तृत चरित्र लेखनाचे कार्य सुरू केले. माहिती गोळा करण्यासाठी पुन्हा एकदा भारत भ्रमण केले. कल्याण पालखीच्या निमित्ताने मराठवाड्यात जास्त येणे-जाणे होऊ लागले. परांडा व धाराशिव येथे श्री योगीराज कल्याण महाराजांच्या सेवेचा योग आला. इकडे नित्य प्रवचने, उपासना, जपानुष्ठान, उत्सव व ग्रंथलेखनादी कार्ये होऊ लागली. तेथे निष्ठावंत सेवक निर्माण झाले. गोवर्धन संस्था सोडल्यावर शरीर थकल्यामुळे गिरडचे कार्य चालवणे कठीण झाले; पण वृद्धपणी शिष्यांनी  त्यांना फुलासारखे जपले. त्यांनी ग्रंथलेखन, मुद्रणाचा खर्च केला, कशाचीही उणीव पडू दिली नाही. श्री कल्याण स्वामी महाराजांना, हैद्राबाद सुलतानशाहीला शह देण्यासाठी डोमगाव प्रांती नेमले होते.

     मराठवाडा भागात श्री कल्याणस्वामी महाराजांनी मठाचे ४० ठिकाणी जाळे पसरवले. १९४७ मध्ये श्री अनंतदासजींसारख्या मुरब्बी प्रचारकाची स्वधर्म प्रचाराची त्या भागातील मोहीम, त्या वेळी त्यांनी केलेल्या प्रचंड जनकार्याचा इतिहास मराठवाड्यातील जनता-जनार्दनाच्या हृदयपटलावर कायमचा कोरला गेला आहे. सज्जनगड पालखी सोहळ्याच्या वतीने प्रतिवर्षी श्री दासनवमीस ठिकठिकाणाहून श्री समर्थ शिष्य तसेच प्रशिष्यांच्या पालख्या आणण्याचा प्रघात १९२० सालापासून सुरू आहे. त्यात श्रीक्षेत्र डोमगावहून श्री योगिराज कल्याणस्वामी महाराजांची पालखी आणण्याचा मान श्री अनंतदासजींकडे होता. तो त्यांनी देहान्तापर्यंत चालवला. इतकेच नव्हे, तर ही प्रथा अव्याहतपणे चालू राहण्याची व्यवस्था करून ठेवली. मेथवडे मठातूनही श्री समर्थ पालखी सोहळ्याच्या कार्यास तेथील भक्तांना प्रवृत्त केले.

     अनंतदासजींच्या चर्येवर विलक्षण तेज होते. सरळ, लांब नासिका, भव्य कपाळ, गोरा, तेजस्वी चेहरा, पांढरीशुभ्र दाढी असे  त्यांचे लोभस व्यक्तिमत्त्व होते. ते त्रिकालज्ञानी साक्षात्कारी तपस्वी होते. त्यांची प्रवचने अत्यंत रसाळ, महत्त्वपूर्ण व बोधप्रद वाटत.

     ‘‘गोरस आरोग्यदायक व सत्त्वबुद्धिकारक आहे. शरीर प्रकृती सुदृढ राखण्याकडे पूर्ण लक्ष ठेवले पाहिजे. आहारात गाईचेच दूध-दुभते वापरण्याचा निश्चय करावा. गोमाता ही भगवन्मूर्ती आहे. तिची सेवा ही श्रीरामसेवाच आहे.’’ असे ते सांगत. श्रीदेवीच्या नवरात्रात अश्विन शुद्ध एकादशी, रविवार, पहाटे ४ वाजता श्रीराम नामस्मरणात अनंतदासजींनी समर्थ चरणी आपला देह ठेवला. वयाच्या अठ्ठ्याहत्तराव्या वर्षी धाराशिव येथे त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. नागनाथ मंदिराजवळील भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले व तेथे पादुका स्थापन करून छोटेसे मंदिर बांधण्यात आले व परांडा येथील श्री हंसराज स्वामी यांच्या मठात त्यांची समाधी बांधण्यात आली.

— संपादित

लोहकरे, दत्तात्रेय मोरेश्वर