Skip to main content
x

मायदेव, वासुदेव गोविंद

     रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरजवळच्या माभळे ह्या आजोळच्या गावी वासुदेव मायदेव यांचा जन्म झाला. आई पार्वतीबाई लहानपणी वारली. त्यामुळे नंतर ते वडिलांबरोबर मिरजेस आले. नंतर धारवाड व पुढे पुण्यास आले. १९९०मध्ये मॅट्रिक्युलेशन, १९१६मध्ये बी.ए.बी.एड.नंतर एम.ए.अशा प्रकारे त्यांची पहिली २२ वर्षे बालपणात आणि शिक्षणात गेली. त्यांनी पुढील ४५ वर्षे सामान्यतः स्त्री-शिक्षण, मराठी भाषा यांच्या विकासाप्रीत्यर्थ व्यतीत केली. त्यांची राहणी साधी, निर्व्यसनी, काटकसरी जीवन होते. त्यांनी काही काळ अनाथ बालिकाश्रमात चिटणीस म्हणून काम केले. पुढे हिंगणे स्त्री-शिक्षण संस्था, नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, पुणे सेवासदन व सूतिकासेवा मंदिर या संस्थांची त्यांनी यथाशक्ति सेवा केली.

     मराठी भाषेतील जुन्या व नव्या कवींचा योग्य सत्कार व योग्य पुरस्कार ह्यांसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. मराठी वाङ्मयाची चरित्र, कोश, काव्य ह्या दालनांची सेवा केली. वीर सावरकरांचे ‘माझी जन्मठेप’ या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर प्रा.वसंतराव नाईक यांच्याकडून करवून घेताना त्यांनी त्या प्रांतात मदतीचा हात पुरविला. ईश्वरावर त्यांचा विश्वास होता. त्यांना सगुण उपासना आवडे. त्यांना संत ज्ञानेश्वर हे खरे मार्गदर्शक वाटत.

     मायदेवांनी ‘वेचलेले क्षण’ हे आत्मचरित्र १९६२मध्ये लिहिले. त्यांची भाषा अत्यंत सुबोध, सरळ आणि कौटुंबिक असल्याने त्यांच्या लिहिण्यातील खरेपणा जाणवतो. मायदेवांनी प्रामुख्याने कविता, अधिक लिहिल्या. त्यांच्या ‘भावतरंग’, ‘अभिनय गीत’, ‘शिशुगीत’, ‘भावनिर्झर’, ‘बालविहार’, ‘सुधा’, ‘किलबिल’, ‘भावविहार’, ‘क्रीडागीत’, ‘छंदगीत’, ‘भावपरिमल’ या रचना लोकप्रिय झाल्या. तसेच त्यांनी ‘भा.रा.तांबे कविता भाग १ व २’ यांचे संपादनकार्य केले. तसेच त्यांनी सावरकर-कविता, सावरकर-काव्य-समालोचन केले.

     आपण समाधानी असल्याचे ते आत्मचरित्रात म्हणतात. ‘जगाने उपेक्षा केली नाही, काही कमी पडू दिले नाही, उलट योग्यतेपेक्षा जास्त प्रेम, पैसा व मान मिळवून दिला’, असे ते नमूद करतात.

     “ये केव्हा येणार! मंगला ये जेव्हा येणार!

     आल्यावरती खोटी क्षणभर नाही तुझी करणार॥” असे आपल्या कवितेत मृत्यूला उद्देशून म्हणताना आपण मृत्यूची प्रतिक्षा करीत नाही; परंतु त्याच्या जाणिवेने भयभीतही होत नाही, असा समाधानी व धैर्यपूर्ण भावच कवी व्यक्त करतो.

     - निशा रानडे

मायदेव, वासुदेव गोविंद