Skip to main content
x

महाजन, श्रीकृष्ण गोपाळ

     गोपाळ आणि आनंदी महाजन हे श्रीकृष्ण उर्फ मामांचे आईवडील! त्यांच्या जन्माच्या दोन महिन्यांपूर्वीच वडिलांचे निधन झाले. ओढग्रस्त परिस्थितीत आईने मुलांचे संगोपन केले. प्राथमिक शालेय शिक्षण कोळथऱ्यात झाले. वडील बंधू मुंबईला पोस्टात नोकरीला होते. गावी सोय नसल्याने मॅट्रिकपर्यंतच्या शिक्षणासाठी मामा मुंबईला आले. दादरच्या छबिलदास विद्यालयामधून १९४२ ला मॅट्रिक झाले. विज्ञान पदवीसाठी रुईया महाविद्यालयात प्रवेश घेतला. रुईयात खेळात, तसेच मल्लखांब प्रशिक्षणात प्राविण्य मिळवले. सायंशाळेत शिक्षकाची अर्धवेळ नोकरी केली. इंटर सायन्सपर्यंतचे शिक्षण पहिल्या क्रमांकाने पूर्ण केले.

     त्या वेळच्या भारतीय स्वातंत्र्य आंदोलनापासून महाजन अलिप्त राहाणे अशक्य होते. याचवेळी त्यांचा संपर्क रा. स्व. संघाच्या तत्त्वज्ञानाशी आला. ते पूर्णपणे संघ विचारांशी बांधले गेले. काही सहकाऱ्यांसह घरदार, शिक्षण सोडून मामा संघप्रचारक झाले. महात्मा गांधींची १९४८ मध्ये हत्या झाली. हिंसाचार उसळला. मामांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. सुदैवाने मामा बचावले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सरकारने बंदी घातली. संघविरोधी वातावरणामुळे मामा कोळथऱ्याला परतले. तेथे अटक होऊन ते तुरुंगात गेले. बंदीवासात मामांनी व्यायाम, गीता, दासबोध सारख्या धर्मग्रंथांचा आणि कोळथर्याच्या विकासाचा अभ्यास केला. कैदेतून सुटल्यावर गावाच्या विकासाचे ध्येय बाळगूनच मामा गावी परतले. त्यांचा विवाह शांताबाईंशी झाला.

      तो काळ १९५० च्या आसपासचा होता. खेड्यात मराठीला प्राधान्य असल्याने कोळथऱ्यात सातवीपर्यंतची मराठी शाळा होती. मुलांनी इंग्रजी आणि संस्कृत शिकावे हे मामांचे ठाम मत होते. इंग्रजी आणि संस्कृत भाषेवर प्रभुत्व असल्याने हे विषय ते उत्तम शिकवित. याचाच परिणाम म्हणून ‘व्हिलेज अपलिफ्ट सोसायटी’ तर्फे इंग्रजी शाळेचे पाचवी ते सातवीचे वर्ग मामांनी सुरू केले. तीनही वर्षाचा अभ्यासक्रम एकाच वर्षात पूर्ण करण्याचा स्वतंत्र वर्गही सुरु झाला.

     शाळा गावच्या सर्व घटकांसाठी खुली होती. शाळा चार-पाच वर्ष चालली कारण शासनाने इंग्रजी विषय सातवीनंतरच शिकवावा असा आदेश दिला. शासनाचे नवे धोरण पचवणे मामांच्या प्रकृतीला मानवणार नव्हते. मामा काही काळ शिक्षणक्षेत्रापासून दूर झाले. पण १९५८ च्या सुमारास तिकडेच परतले. आठवीचा इंग्रजी वर्ग सुरू केला. आर्थिक व्यवस्थापनाबरोबरच शाळेचे अध्यक्ष, कार्यवाह, मुख्याध्यापक, शिक्षक, शिपाई या सर्व भूमिका केल्या. त्याकाळच्या ग्रामीण प्रवृत्तीनुसार विद्यार्थी संख्या नगण्य होती.

      हजेरीपटावर किमान विद्यार्थीसंख्येची शासनाची अट होती. परिसरातल्या गावच्या मुलांसाठी मामांनी घरातच विद्यार्थी आश्रम सुरू केला. तालुक्यातून तीन मुले शाळेत आणली. प्रतिसाद वाढू लागला. गावात ९ वी ते ११ वी चे वर्गही आले. शाळेची सुंदर वास्तू उभी झाली. दरवर्षी शाळेचा ११ वीचा निकाल ६० ते ७० टक्के लागल्याने पालकांचा विश्वास वाढला. पंचक्रोशीच्या सीमा रुंदावल्या आणि परिसराबाहेरचे विद्यार्थीही शाळेत येऊ लागले.

      शासनाने शाळेला अनुदान मंजूर केले. अनुदानाने आर्थिक दृष्ट्या शाळा स्थिरावली. मात्र या अपार कष्टांचा विपरित परिणाम मामांच्या प्रकृतीवर झाला. यामुळे मामांनी १९७४ ला शाळेच्या कामकाजातून बाजूला होण्याचा दृढनिश्चय केला. शाळा आणि आश्रमाची जबाबदारी ग्रामस्थांनी घ्यावी असे जाहीर केले. ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला नाही म्हणून १९७४ च्या जूनपासून शाळा आणि आश्रम बंद पडले. शाळेवरच्या सर्व कर्जाची जबाबदारी मात्र मामांनी स्वतःवर घेतली.

      ग्रामस्थांचा पुढाकार नसल्याने दोन्ही संस्था १९८४ पर्यंत बंदच राहिल्या. त्यामुळे महाजन हेच संस्थेचे मूलभूत आधार होते हे सिद्ध झाले. मामाच्या मनातही शाळा पुन्हा सुरू करण्याचे विचार येत होतेच. शाळेसाठी ५०,००० रुपयांची देणगी घेऊन मामांनी १९८५ ला शाळा पुन्हा सुरू केली. या अनुदानित  शाळेची विद्यार्थी संख्या आज ५०० पेक्षा जास्त आहे. विद्यामंदिर आणि विद्यार्थी आश्रम या संस्था आज कोकण, मुंबई, ठाणे आणि कल्याण परिसरात दर्जेदार शिक्षण संस्था म्हणून ओळखल्या जातात.

       शिक्षणाशिवाय आयुर्वेदीय औषध निर्मिती, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातही मामांचे योगदान होते. संघकार्यकर्ते  असल्याने १९७५ च्या आणीबाणीत भूमिगत होऊन मुंबईत आले. प्रथमोपचारी औषधांच्या निर्मितीचा वारसा आईकडून मिळाला होता. अर्थार्जनासाठी कोळथर्‍याहून औषधे आणून मुंबईत विक्री सुरू केली. हळूहळू जम बसला आणि कोळथर्‍यातच आगोम औषधालय प्रा. लि. कारखाना उभा राहिला. आनंदी गोपाळ महाजन नावातल्या आद्याक्षरांनी मामांनी त्याचे  नामकरण केले. केशरंजना गुटिका आणि तैलार्क या आगोम उत्पादनांनी जगमान्यता मिळवली. स्वतः बागायती फळशेती करून दापोली परिसरात प्रसारही केला. जगप्रसिद्ध उत्तम दर्जाच्या हापूस आंबा रसावर प्रक्रिया करुन तो हवाबंद कॅन्समधून विकण्याची सुरुवात मामांनी १९५५ मध्ये केली. प्रक्रियायुक्त कृषी उत्पादनासाठी शेतकर्‍यांना प्रशिक्षणासह प्रोत्साहन दिले. आजही आगोम उद्योग आयुर्वेदीय औषधांबरोबर हापूस रसाचे कॅन्स विकत आहे.

        मामा संघवादीविचारांचे कट्टर पाईक असल्याने गावात त्यांना  अनेक हितशत्रू होते. सामाजिक समतेच्या कार्यात ग्रामस्थांचा विरोध झेलावा लागला. सर्व खटल्यात आपली बाजू मामा स्वतः मांडत. सगळ्या आपत्तीतून ते निर्दोष सुटले.

        कोळथर्‍यात कुणावर अन्याय झाला तर ते दूर करीत. हिंदूत्वाचे कट्टर अभिमानी असूनही त्यांनी धार्मिक आधारावर भेदभाव केला नाही आणि गावच्या मुस्लीम बांधवांचे हितच जपले. गावातल्या उर्दू शाळेची पक्की इमारत ही महाजनांच्या प्रयत्नांचे फळ आहे. मात्र मशिदीवरून हिंदूंची सवाद्य मिरवणूक जाण्याच्या हक्कासाठी संघर्ष करून तो कायमचा प्रस्थापित केला. परिणामी आज गावी हिंदू-मुस्लिम ऐक्य सुरक्षित आहे. हिंदू धर्मातल्या जाती-उपजाती भेदांनाही मामांचा विरोध होता. त्यांच्या विद्यार्थी आश्रमात जेवण वाढण्याचे काम रोजच्या ठरवून दिलेल्या पाळ्यांप्रमाणे दलित विद्यार्थीही करत. गावच्या राजकारणातही महाजन सक्रिय होते. त्यांच्या सेवावृत्तीची जाण गावाला असल्याने ते सलग १२ वर्ष, १९५६ ते १९६८, सरपंचपदी निवडून आले.

       आयुष्याच्या अखेरीस महाजनांनी शब्दशः वानप्रस्थाश्रम स्वीकारला. गावाजवळच्या वनात पर्णकुटीत स्थलांतर केले. या कुटीला ते मठी असे म्हणत. शिक्षण प्रसारक, दीनांचे कैवारी, सेवाव्रती, कठोर, निर्भय, शिस्तप्रिय, गीतेचे अभ्यासक, देशभक्त, प्रामाणिक राजकारणी, यशस्वी उद्योजक, सूक्ष्म आयर्वेद संशोधक आणि कट्टर संघवादी असे मामांच्या व्यक्तिमत्त्वाचे सारांशाने वर्णन करता येईल. 

- सुधाकर कुलकर्णी

महाजन, श्रीकृष्ण गोपाळ