Skip to main content
x

महाम्बरे, गंगाधर मनमोहन

मालवणला १९५७ साली भरलेल्या साहित्य संमेलनातील ‘कवीसंमेलना’मध्ये महाम्बरे यांनी ‘तू विसरुनी जा रे, विसरुनी जा’ ही कविता तिथे गाऊन दाखवली. महाम्बरे यांच्यावर खूश झालेले आचार्य अत्रे म्हणाले, “महाम्बरे यांच्या कवितेने या कवीसंमेलनाची सुरुवात होऊ द्या.” तेव्हापासून महाम्बरे यांची गाणी गाजू लागली. महाम्बरे मूळचे गोव्यातील म्हापशाचे. त्यांचे वडील मालवणच्या टोपीवाला हायस्कूलमध्ये शिक्षक होते. ते साहित्याचे व संगीताचे जाणकार होते. मालवणच्या त्यांच्या घराजवळ मुरलीधर मंदिर होते. तेथे नेहमी भजन-कीर्तन होत असे. त्यांच्या घराच्या माडीवर अण्णासाहेब आचरेकरांचा संगीताचा वर्ग होत असे. लहानपणापासून अशा वातावरणात ते वाढले. त्यांना बालवयातच वाचनाचीही आवड लागली.

शिक्षण संपल्यावर पुढे चरितार्थासाठी ते १९४९ साली मुंबईला आले. तेथील सांस्कृतिक वातावरणात त्यांची प्रतिभा फुलली. लवकरच त्यांना ‘संतांची कृपा’ या नाटकाची गाणी लिहिण्याची संधी मिळाली. यशवंत देव या गाण्यांचे लेखन आणि संगीत दिग्दर्शन करणार होते, पण ते आजारी पडले आणि त्यांनीच गंगाधर महाम्बरेंना ‘तुम्ही गाणी लिहा’ अशी विनंती केली. महाम्बरे यांनी या संधीचा उपयोग करून छान गाणी लिहिली आणि गीतलेखनाचा त्यांचा प्रवास सुरू झाला.

मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून काम करताना महाम्बरे यांचा ग्रंथांवरील स्नेह वाढीस लागला. महाम्बरे यांना माणसांच्या भेटीचे वेड होते. ग्रंथपालाच्या नोकरीमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डी.जी. तेंडोलकर, इतिहासकार टॉयन्बी, इंदिरा गांधी, सी.डी. देशमुख इत्यादींच्या भेटी आपसूक घडल्या.

त्यांनी त्यांच्या पुस्तकांमधून चित्रपट, साहित्य, संगीत, रंगभूमी, विज्ञान आणि औद्योगिक क्षेत्रातील शेकडो व्यक्तींशी वाचकांची ओळख करून दिली आहे.

पुण्यात फिल्म इन्स्टिट्यूट सुरू झाली. तेथील मोठ्या ग्रंथसंग्रहालयासाठी ग्रंथपाल नेमण्याची जाहिरात आली. महाम्बरे यांनी त्यासाठी अर्ज केला. देशभरातल्या साठ स्पर्धकांतून पंधरा जणांना मुलाखतीसाठी बोलावले. त्यातून त्यांची निवड झाली. तेथे ग्रंथपाल म्हणून काम करताना प्रभातचे एस.फत्तेलाल यांच्याशी ओळख झाली. फत्तेलाल यांनी महाम्बरे यांना ‘युगे युगे मी वाट पाहिली’ या त्यांच्या चित्रपटासाठी गाणी लिहिण्याची संधी दिली. पुढे ‘धाकटी मेहुणी’, ‘सोबत’ अशा चित्रपटांसाठी त्यांनी लिहिलेली गाणी गाजली.

‘पैसे झाडाला लागतात’, ‘गा भैरवी गा’, ‘सर्वस्वी तुझाच’ व ‘परशुराम’ या नाटकांची गाणी त्यांनी लिहिली. त्यांनी अनेक भावगीते लिहिली आहेत. लता मंगेशकर, आशा भोसले, माणिक वर्मा, सुमन कल्याणपूर, अनुराधा पौडवाल, आरती मुखर्जी, परवीन सुलताना या गायिकांनी त्यांची भावगीते गायली आहेत.

‘कंठातच रुतल्या ताना’, ‘संधिकाली या अशा’, ‘निळासावळा नाथ’, ‘पूर्वीच्या देवा तुला’ अशी काही त्यातील गाजलेली भावगीते! गीतलेखनाबरोबरच तरुणांना मार्गदर्शक ठरेल असे विषय निवडून त्यांनी अभ्यासपूर्ण लिखाण केले. ‘युनिक फिचर्स’तर्फे नामवंतांच्या पत्रोत्तरांवरील ‘थोडं इकडचं थोडं तिकडचं’ ही त्यांच्याच नियतकालिकात येणारी मालिका, तरुण भारत या वृत्तपत्रातील ‘भेटी लागी’ हे सदर, त्याचप्रमाणे ‘किशोर’ या लहान मुलांच्या मासिकासाठी लिहिलेली ‘ओळखपाळख’ ही औद्योगिक विषयावरील त्यांची लेखमाला खूप गाजली. महाम्बरे यांनी ५५हून अधिक पुस्तके लिहिली. त्याच प्रमाणे वृत्तपत्र, आकाशवाणी व दूरचित्रवाणी यासाठीही त्यांनी भरपूर लिखाण केले. त्यांनी लिहिलेल्या ‘मौलिक मराठी चित्रगीते’ या ग्रंथाला ४९व्या राष्ट्रपती पुरस्कार वितरण सोहळ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला.

हॉलीवूडचा प्रसिद्ध विनोदी अभिनेता डॅनी के याच्याबरोबर एका वार्तापटात त्यांनी काम केले. सत्यजित राय यांच्याबरोबर झालेली भेट हा तर महाम्बरे यांच्या आयुष्यातील आनंदाचा ठेवा होता. अनेक मान्यवर व्यक्तींच्या पत्रांचा दुर्मीळ खजिना महाम्बरे यांच्याकडे होता. महाम्बरे यांच्या गीतांनी केवळ आनंदच नाही, तर नव्या जाणिवा, नव्या संवेदना मराठी रसिकांना दिल्या. त्यांच्या पत्नी अरुंधती महाम्बरे या बंगाली भाषेच्या जाणकार असून उत्तम लेखिका आहेत.

- मधू पोतदार

महाम्बरे, गंगाधर मनमोहन