महानोर, नामदेव धोंडो
नामदेव धोंडो महानोर यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेडा येथे शेतमजुराच्या घरी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण शेंदुर्णी-जळगाव येथे तर दोन वर्षे महाविद्यालयीन शिक्षण पळसखेडे-पिंपळगाव (हरेश्वर) येथे झाले. शिक्षण घेत असतानाच त्यांना साहित्याची व लिखाणाची आवड निर्माण झाली. त्यांनी खेडे, ग्रामीण जीवन, निसर्ग, खेड्यातली सुखदुःखे, कविता व कथा-कादंबऱ्यामधून चित्रण केले आहे.
महानोर यांनी शेतीमध्ये ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा कार्यक्रम राबवला. त्यांनी कोरडवाहू फळझाडे लागवड यशस्वीरीत्या करून, चांगल्या प्रतीच्या फळांचे उत्पादन व विक्री करून दाखवली. शिवाय त्यांनी मृदा व जल संधारणाचे कार्यक्रम राबवले. पाण्याचा योग्य वापर होण्यासाठी ठिबक व तुषार संचाचा वापर केला तसंच ते फळांची निर्यात करतात. स्वतःच्या शेतीमध्ये राबवलेले कार्यक्रम भाषण, परिसंवाद व चर्चासत्रांतून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य ते मनापासून करतात. शेतीतील नवीन तंत्रज्ञानाबाबत पुढीलप्रमाणे त्यांचे लेख व पुस्तके प्रकाशित झाली आहेत 'रानातल्या कविता', वही, पावसाळी कविता, शेतीसाठी पाणी, जलसंधारण, फलोत्पादन, ठिबक सिंचन, सीताफळ बागेची गोष्ट. त्यांच्या या बहुमोल कार्याबद्दल शासनाने त्यांना कृषिभूषण पुरस्कार, वनश्री पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार, यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार, वसंतराव नाईक शेती व ग्रामीण विकास प्रतिष्ठान पुरस्कार, कवी कुसुमाग्रज पुरस्कार, चंद्रभागा तीरी आदी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
महानोर यांनी ‘शेतीसाठी पाणी’ या पुस्तकामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सविस्तर लिखाण केले आहे. त्यांनी पाणी अडवा पाणी जिरवा - जल संधारण, पाणी वापरांच्या नव्या पद्धती - ठिबक सिंचन, हिरवी अमेरिका, कृषी विद्यापीठे, फलोत्पादन विकास कार्यक्रम, कमी पाण्यावरची मोसंबी, वनशेती, केळी, ज्वार खोडवा, कापूस खोडवा, मिरची व तेलबिया तसेच अधिक उत्पादन देणारी - धूळपेरणी, पोत शेतीचा, शेतकर्यांच्या मनाचा इत्यादी विषय आपल्या साहित्यातून चर्चिले आहेत.एक सर्जनशील कवी व प्रयोगशील शेतकरी, मनाने कवी आणि तनाने शेतकरी, दोन्ही क्षेत्रांत दिगंत कीर्ती, भरघोस आणि कसदार निर्मिती, रानातल्या कविता लिहिणारे आणि शेतात खुरपणी करणारे असे महानोर यांचे व्यक्तिमत्त्व आहे. निर्मळ आणि प्रेमळ, हळव्या मनाचे असल्यामुळे रान कोरडे असेल तर डोळ्यांत पाणी उभे राहते, शेतकरी सुधारावा आणि दगडा-धोंड्याच्या महाराष्ट्रात नंदनवन फुलवावे आणि ते सुजलाम सुफलाम व्हावे हे त्यांचे स्वप्न आहे. या मातीतील माणूस शेतीसंबंधी बोलतो किंवा लिहितो तेही झपाटून, यांची साक्ष त्यांच्या साहित्यसंपदेचे प्रत्येक पान देते.
शेतीविषयाच्या संदर्भात महानोर यांनी अनेक परदेश दौरे केले आहेत. त्यांच्या शेतीला अनेक मान्यवर, विद्वान लोकांनी भेटी देऊन त्यांनी राबवलेल्या उपक्रमांची प्रशंसा केलेली आहे. महानोर यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या बहुमोल कार्याबद्दल शासनाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार देऊन त्यांचा कार्याचा गौरव केला.
- संपादित