Skip to main content
x

मलांट्रा, जेरी

     भारतातील - विशेषत: वेरूळ-अजिंठा लेण्यातील शिल्पांनी अनेक भारतीय-अभारतीय अभ्यासकांना भुरळ घातली आहे. आजवर अनेकांनी या लेण्यांचा अभ्यास केला असला, तरी जेरी मलांट्रासारख्या मोजक्याच इतिहास संशोधकांचे विशेष योगदान लाभले आहे. अमेरिकेतील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञांपैकी एक असा नावलौकिक असणार्‍या, अमेरिकन उच्च-शिक्षण समितीतील वरिष्ठ पदाधिकारी, टेक्सास विद्यापीठातील धोरणात्मक नियोजनाचे श्रेय ज्यांच्याकडे जाते, अशा जेरी मलांट्रा यांच्या अत्युच्च शैक्षणिक आलेखाला भारतातील - विशेषत: महाराष्ट्रातील बौद्ध लेण्यांच्या अभ्यासाची पार्श्वभूमी आहे, हे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

      मिनसोटा विद्यापीठातून मानववंशशास्त्र आणि पुरातत्त्व या विषयातन १९७३ साली पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी प्राच्यविद्येमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पीएच.डी.च्या अभ्यासाचा विषय म्हणून त्यांनी भारतातील वेरूळ लेण्यांची निवड केली. १९८१मध्ये अभ्यासासाठी त्या भारतात आल्या. या ठिकाणी अभ्यास करताना त्यांना जाणवले की, वेरूळ येथील बौद्ध लेण्यांची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून त्यांच्या मांडणीतून बौद्ध धर्माचा एक समग्र इतिहासच डोळ्यासमोर येत आहे. आपल्या संशोधनाद्वारे एका नव्या दृष्टीकोनातून या लेण्यांचा त्यांनी अभ्यास केला. यातूनच त्यांचा प्रबंध हा महाराष्ट्रातील तसेच भारतातील बौद्ध धर्माचा इतिहास सांगणारा महत्त्वपूर्ण दस्तऐवज ठरला आहे. ‘Unfolding a Mandala : The Buddhist Cave temples at Ellora’ या पुस्तकातून पुढे तो प्रकाशित झाला.

     या अभ्यासाच्या दरम्यानच त्यांच्यातील अस्वस्थ संशोधिकेला भारतातील विविध ठिकाणची प्राचीन बौद्ध लेणी, शिल्पे आणि बौद्ध धर्म यांनी इतके झपाटून टाकले की, प्रबंध पूर्ण झाल्यावरही त्या १९८३नंतर वारंवार भारतभेटीस येत राहिल्या. त्यांनी वेरूळ, अजिंठा, अमरावती, नागार्जुनकोंडा, सांची, सारनाथ, उज्जयिनी इत्यादी अनेक ठिकाणांना भेटी देऊन तिथल्या बौद्ध वास्तूंचा, शिल्पांचा सखोल अभ्यास केला. १९८७ ते ९० या काळात त्यांनी केलेले हे काम ‘The Encyclopedia of Asian History ’मध्ये समाविष्ट आहे.

     बौद्ध वास्तू, शिल्पे यांच्याकडे कलात्मक दृष्टीने पाहण्याची रसिकता आणि त्याचबरोबर एका इतिहासतज्ज्ञाची अभ्यासक नजर या दोन्हींचा संगम मलांट्रा यांच्या ठिकाणी झालेला दिसतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध ठिकाणी त्यांनी सादर केलेल्या शोधनिबंधांच्या आणि व्याख्यानांच्या विषयवैविध्यावरून हेच दिसून येते. उदाहरणार्थ 'Mara's Army : Text and Image in Early Indian Art' किंवा 'The date of Ajanta Cave 27 Inscription' इ. केवळ लिखाणातूनच  नव्हे, तर विद्यार्थिदशेत असताना भारतीय संगीताचा अभ्यास करण्यासाठी भारतात येण्यावरूनही त्यांच्यातली कलासक्त वृत्ती प्रत्ययाला येते.

     लहानशा बीजापासून वटवृक्ष निर्माण व्हावा, त्याप्रमाणे जेरी मलांट्रा यांच्या संशोधनाचा विस्तार वेरूळ लेण्यांपासून सुरू होऊन दक्षिण आशियाई देशातील बौद्ध धर्माच्या अभ्यासापर्यंत जाऊन पोहोचला. आज South Asian Buddhist Art & History या विषयावरील त्या एक अधिकारी व्यक्ती आहेत. ज्या विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले, त्या मिनसोटा विद्यापीठातच इतिहास-प्राध्यापिका म्हणून कार्यरत (१९९२-२००२) होण्याचे भाग्य त्यांना लाभलेच; पण तेवढ्यावरच न थांबता, जेरी मलांट्रा या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाने संशोधन आणि उच्च-शिक्षण क्षेत्रातील स्वत:च्या देशातील एक ज्येष्ठ मार्गदर्शिका होण्यापर्यंतचा टप्पा गाठला आहे. बरोबरच त्यांची जिद्द, अभ्यासू वृत्ती, प्रामाणिकपणा आणि आधुनिक दृष्टीकोन हे गुण आजच्या पिढीला आदर्शवत ठरतील, यात शंका नाही!

डॉ. सीमा सोनटक्के

मलांट्रा, जेरी