Skip to main content
x

मोडक, आत्माराम वासुदेव

     त्माराम वासुदेव मोडक यांचा जन्म धार संस्थानात ठिकरी या गावी झाला. वडिलांचे नाव वासुदेव वामन मोडक व आईचे नाव सत्यभामा होते. आत्माराम व त्यांचे  दोन बंधू असे तिघे आजन्म ब्रह्मचारी राहिले. ठिकरी व धरमपुरी या दोन गावात बालपण व्यतीत केलेल्या मोडक यांचे मराठी शिक्षण घरीच झाले; कारण त्या भागात मराठी शाळा नव्हती. वयाच्या तेराव्या वर्षांपर्यंत त्यांना शालेय शिक्षण नव्हते. इंदूर येथील २ क्रमांकाच्या शाळेत ते दाखल झाले व ४ थी नंतर इंदूर सिटी विद्यालयामध्ये त्यांचे शिक्षण झाले. गणित विषय इतका चांगला होता की गुरुजी आत्मारामालाच गणित शिकवायला सांगत. या वयात त्यांनी खूप वाचनही केले. २२ व्या वर्षी ते मॅट्रिक झाले व महाविद्यालयात नाव नोंदवले, परंतु ते नाममात्र. चार वर्षांचा अभ्यासक्रम वाचून काढला. वकिलीचा अभ्यास व नोकरी करताना १९२१ पासून त्यांनी उघडपणे राजकारणात भाग घेतला. लोकमान्य टिळक व नंतर म. गांधी हे त्यांचे आदर्श होते. सत्याग्रहात भाग घेतल्याने मोडक तुरुंगात गेले. तेथे कैद्यांना लिहायला, वाचायला शिकविले व पाट्या, पेन्सिली, पुस्तके मागविली. ग्रंथालय स्थापन केले. मुळशी सत्याग्रह चालू असताना मोडक पुणे कचेरीत सचिव होते. खानदेशचा दौरा करताना त्यांनी वंजारी समाजात काम केले. गुरांच्या गोठ्यात राहून ते गुराख्यांना शिकवीत. प्रौढसुद्धा शिकायला येत. ग्रामोन्नतीविषयी ते ग्रामस्थांचे प्रबोधन करीत. १९१७ मध्ये इंदूर येथे झालेल्या अ. भा. हिंदी साहित्य संमेलनात त्यांनी स्वयंसेवक म्हणून काम केले होते. १९३२ - ३५ मध्ये त्यांनी पुण्यात हिंदी शिक्षणाचे वर्ग मोफत चालवून मुलांना अ. भा. हिंदी प्रचार सभेच्या परीक्षांना बसविले.

      मोडक बेळगाव जिल्ह्यात मराठी भागात प्रचारक म्हणून गेले. १९३५ पासून रत्नागिरी जिल्ह्यात, आप्पासाहेब पटवर्धनांच्या सूचनेवरून त्यांनी हिंदी प्रचार आरंभ केला. हिंदी प्रचार हे देशकार्य मानून ते पूर्णपणे मोफत शिकवीत. सकाळी ७ ते ९ पर्यंत वर्गात उपस्थित राहणारे बहुसंख्य शाळकरी व नोकरी करणारे असत. रात्रीचा वर्ग ११ वाजता संपत असे. त्यांनी मालवण, चिपळूण, वेंगुर्ले आणि सावंतवाडी येथेही हिंदी केंद्रे स्थापन केली. १९३७ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या कामासाठी त्यांनी चिपळूण, खेड, दापोली, गुहागर, मंडणगड या तालुक्यात कार्य केले. मुक्काम रत्नागिरी येथे असे. सेवादल संघटना, रत्नागिरी जिल्हा युवक परिषदेच्या कामात आप्पासाहेब पटवर्धनांना साहाय्य केले. त्यांनी रत्नागिरी जिल्हा काँग्रेस समितीचे चिटणीस पदही भूषविले. साने गुरुजी सत्कार निधी समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी १० हजार रुपयांचा निधी जमविला. डाकवे दंपती, सामंत गुरुजी वगैरे अनेक माणसे व कार्यकर्ते त्यांनी जोडले.

      मोडक यांचे शिक्षणाच्या क्षेत्रात रत्नागिरीचे ‘सर्वोदय छात्रालय’ हे अत्यंत प्रशंसनीय कार्य. बाळासाहेब खेरांनी छात्रालयाच्या निवासाची सोय स्वत:च्या तेथील जागेत विनामूल्य केली. आर्थिक भार खेर व आप्पासाहेबांनी मिळून सांभाळला. हे छात्रालय सर्व जातीजमाती व सर्व धर्मियांसाठी होते. मोडक गुरुजींनी १ एप्रिल १९४९ पासून या सर्वोदय छात्रालयाचा शुभारंभ केला. मुलांच्या बुद्धीचा, कर्तृत्वाचा विकास व्हावा, एकजिनसी समाज निर्माण व्हावा ही त्यांची दृष्टी होती. छात्रालयात पहाटे पासून रात्री १० वाजेपर्यंत आखीव व भरीव कार्यक्रम असे. विद्यार्थ्यांना सकस आहार दिला जाई. सारवणे, पाणी भरणे, स्वयंपाक, बाजारहाट वगैरे कामे आळीपाळीने करविली जात. गुरुजी सर्व वेळ मुलांच्यातच असत. १९५५ मध्ये छात्रालय आप्पासाहेब पटवर्धन यांच्या हवाली करून गुरुजी श्रमदान उपक्रमाकडे वळले. या उपक्रमात मूर - तळवडे रस्ता (१९५१) व वेंगुर्ले तालुक्यात कुडाळ - परुळ रस्त्याला जोडून साडेचार मैल लांबीचा रस्ता सेवापथकाच्या मदतीने करून त्यांनी स्वावलंबन व स्वयंस्फूर्तीने कामे करण्याचा आदर्श उभा केला. त्यांनी प्रत्येक तालुक्यात एक आठवड्याची शेतकरी शिबिरे आयोजित केली. मोडक गुरुजींनी आपल्या कार्याच्या जोरावर व उत्तम चारित्र्याच्या बळावर निवडणुकीस उभे राहून ती जिंकली व आमदार म्हणून लोक प्रतिनिधित्व केले. रत्नागिरी जिल्हा हेच मुख्य कार्यक्षेत्र निवडून विधायक कार्य करणारे शांत, निष्ठावान आणि कळकळीचे कार्यकर्ते मोडक गुरुजी प्रसिद्धीपराङ्मुख होते. कार्याची तळमळ बाळगणारे, महाराष्ट्र व मराठी भाषेवर नितांत प्रेम करणारे मोडक गुरुजी सेनापती बापटांचे अनुयायी असले तरी पु. ल. देशपांडे यांच्या म्हणण्याप्रमाणे ‘कणखर पोलादी पुरुष’ होते.

      - वि. ग. जोशी

संदर्भ
१.      मोडक आ. वा. ; ‘आत्मारामाची वाटचाल’ :;
२.      दे. भ. मोडक गुरुजी जिल्हा सत्कार समिती प्रकाशन  १९६५.
मोडक, आत्माराम वासुदेव