मोडक, वेणूताई विनायक
सातारा हे वेणूताई विनायक मोडक यांचे जन्मगाव. वेणूताईंचे शालेय शिक्षण पुण्याच्या हुजूरपागेत झाले. विद्यार्थी दशेतच त्यांनी कविता रचण्यास सुरुवात केली होती. पुण्यातील रविकिरण मंडळाच्या त्या सदस्या होत्या. विद्यार्थीदशेतच त्यांचा ‘कलिका’ हा कविता संग्रह प्रकाशित झालेला होता. १९१६ मध्ये पुण्याच्याच फर्गसन महाविद्यालयामधून इंग्रजी विषय घेऊन त्यांनी एम. ए. पदवी मिळविली. ही पदवी प्राप्त करणाऱ्या महाराष्ट्रातील ख्रिश्चन समाजातील त्या पहिल्या महिला.
याच काळात त्यांनी एस. टी. सी. म्हणजे आजची बी. एड. (बॅचरल ऑफ एज्युकेशन) पदवी मिळविली. त्यानंतर पुणे व मुंबई येथे काही वर्षे त्यांनी अध्यापनाचे काम केले. शैक्षणिक क्षेत्रात मोठे कार्य करण्याच्या हेतूने १९२० मध्ये त्यांनी अहमदनगर येथे गव्हर्नमेंट गर्ल्स स्कूलची स्थापना केली. शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून निष्ठेने केलेल्या कामामुळे ही शाळा ‘वेणूताई मोडकांची शाळा’ म्हणून अहमदनगर जिल्ह्यात ओळखली जाऊ लागली. घरी जाऊन पालकांचे प्रबोधन करून वेणूताईंनी शाळेसाठी मुली जमविल्या. इंग्रजी, मराठी, संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते.
विद्यालयात वेणूताईंनी ‘गर्ल गाईड पथक’ सुरू केले. अहमदनगर जिल्हा गाइड आयुक्त म्हणून त्या दीर्घ काळ कार्यरत होत्या. ह्या त्यांच्या सेवेची दखल घेऊन भारत स्काऊट गाइड संस्थेने विशिष्ट सेवा पदक प्रदान करून त्यांचा गौरव केला. शासनाने विविध सेवाभावी सामाजिक व शैक्षणिक समित्यांवर वेणूताईंची नियुक्ती केली. शासनाच्या वतीने ‘लोकशाळा’ ही संस्था स्थापण्यात वेणूताईंचा पुढाकार होता. विद्यार्थिनी आदर्श गृहिणी व्हाव्यात यासाठी त्यांनी उपक्रम राबविले. गुणवत्ता वाढविणाऱ्या शैक्षणिक परीक्षांना बसण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले. ‘आरोग्यसेविका’ (नर्सिंग) व बालवाडी प्रशिक्षण वर्ग सुरू करून मुलींना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास समर्थ बनविले. विद्यालयात प्रौढ साक्षरता वर्ग सुरू केले.
१९३५ मध्ये वेणूताईंच्या पुढाकाराने अहमदनगर महिला मंडळ स्थापन झाले. या मंडळाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी १९६८ पर्यंत मोठे कार्य केले. या मंडळामार्फत बालवाडी सुरू झाली, मराठी शाळा निघाली. ‘दीपिका’ हस्तलिखित काढण्यास सुरुवात झाली. विनामूल्य शिक्षणवर्ग, शिवणवर्ग चालवले जातात. हे महिला मंडळ अखिल भारतीय महिला परिषदेची शाखा म्हणून कार्य करीत होते.
१९५२ सालच्या दुष्काळात अन्नछत्र चालविण्यात वेणूताईंचा मोठा सहभाग होता. त्यातून महिलांना उद्योगही मिळाला. गुरांसाठी छावण्या उभारण्यासाठी वेणूताईंनी फंड उभा करण्यासाठी अथक प्रयत्न केले. अहमदनगर जिल्हा लोकल बोर्डाच्या सदस्य म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले.
‘लाखोंनी फंड’ जमवून आफ्रिकेतील मिशनऱ्यांना सामाजिक कार्यासाठी त्यांनी मदत केली. विविध नियतकालिकांमधून त्या सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक विषयांवर लेखन करीत. त्यातूनही त्यांनी समाजप्रबोधन साधले, स्त्रियांच्या व बालकांच्या प्रश्नांना वाचा फोडली. ‘साधू सुंदरसिंगा’च्या बोधकथा भाग १ व २ हे त्यांचे कथासंग्रह गाजले.