Skip to main content
x

मराठे, शरद श्रीकांत

        रद श्रीकांत मराठे यांचा जन्म पुणे येथे झाला. नूतन मराठी विद्यालय पुणे येथे त्यांचे शालेय शिक्षण, तर सर परशुरामभाऊ महाविद्यालयात त्यांचे पुढील शिक्षण चालू असतानाच त्यांनी ‘छोडो भारत’ आंदोलनात भाग घेतला. याच आरोपावरून त्यांना जानेवारी १९४३ ते सप्टेंबर १९४३ या काळात तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अर्धवट राहिलेले महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी पूर्ण केले.

         रुईया महाविद्यालयात नोकरी करत असतानाच १९४७ मध्ये निवड चाचणीद्वारे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांना प्रवेश मिळाला. अर्थशास्त्र या विषयातील बी.एस्सी. पदवी प्राप्त केल्यानंतर एक वर्ष केंब्रिज विद्यापीठात त्यांनी ‘रिसर्च फेलो’ म्हणून काम केले. १९५१ ते १९५६ या कालावधीत फेडरेशन ऑफ कॉमर्स इंडस्ट्री या संघटनेत काही काळ काम केल्यानंतर त्यांनी इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसमध्ये त्यांनी प्रवेश मिळवला. त्यानंतर २४ वर्षे त्यांनी वित्तविभाग, वाणिज्य विभाग या विभागांत अर्थशास्त्रीय सल्लागार म्हणून काम केले. यानंतर वॉशिंग्टन येथील भारतीय दूतावासात त्यांची आर्थिक व्यवहार मंत्री या पदावर निवड करण्यात आली, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये भारताचे प्रतिनिधी अशी दुहेरी जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यानंतर १९७२ मध्ये भारतात परतल्यानंतर ब्यूरो ऑफ इंडस्ट्रियल कॉस्ट्स अ‍ॅण्ड प्राइझेस या संस्थेचे अध्यक्ष-सचिव या समकक्ष पदावर त्यांची नेमणूक झाली. १९७० मध्ये उद्योग विभागाचे सचिव या पदावरून ते सेवानिवृत्त झाले.

         सेवानिवृत्तीनंतर ग्रिंडलेज बँक, व्होल्टास, किर्लोस्कर, फिरोदिया, कल्याणी, फिनोलेक्स, शिर्के, लार्सन अ‍ॅण्ड टूब्रो यांसारख्या नामवंत उद्योगसमूहांच्या संचालक मंडळांवर मानद संचालक या नात्यांने त्यांनी काही काळ काम पाहिले. त्याचप्रमाणे पुणे स्टॉक एक्स्चेंज प्रथम अध्यक्ष, सिकॉमचे अध्यक्ष, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वेस्टर्न रिजन संचालक मंडळाचे सदस्य, आयडीबीआय बँकेचे अध्यक्ष अशा जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी अर्थशास्त्र, सार्वजनिक वित्त आणि आंतरराष्ट्रीय अर्थसंबंध या विषयांचे त्यांना असलेले ज्ञान याचा फायदा अनेक शासकीय, आणि निमशासकीय संस्थांना झाला.

          सिकॉमचे खाजगीकरण या प्रक्रियेत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. याव्यतिरिक्त प्रिन्सिपल म्हणून नारळकर ट्रस्ट, आयुर्विद्यावर्धिनी ट्रस्ट इत्यादी शैक्षणिक तसेच सामाजिक संस्थांच्या कार्यांत त्यांचा मोलाचा वाटा होता. नॅशनल इन्श्युरन्स अकॅडमीच्या सी.डी. देशमुख व्याख्यान मालिकेतील दिलेली ‘भारतीय अर्थव्यवस्था’ या विषयावरील त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे नावाजली गेली होती.त्यांचे आत्मचरित्र ‘रेमिनिसेन्सेस अ‍ॅण्ड रिफ्लेक्शन्स’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे.

- प्रभाकर करंदीकर

मराठे, शरद श्रीकांत