Skip to main content
x

मुखर्जी, तनुजा शोमू

तनुजा

     लावण्याचे वरदान लाभलेली, अभिनयकुशल, प्रख्यात अभिनेत्री शोभना समर्थ आणि जर्मनीत दिग्दर्शनाचे धडे घेतलेले चित्रपट दिग्दर्शक, कवी कुमारसेन समर्थ यांची मुलगी तनुजा. आई शोभना आणि बहीण नूतन यांच्याप्रमाणेच चित्रपटक्षेत्रातला अभिनयाचा वारसा समर्थपणे पुढे नेत तनुजा यांनीही अनेकानेक चित्रपटांद्वारे रसिकांच्या मनावर आपल्या नावाची स्वतंत्र मोहोर उमटवली. नैसर्गिक उत्स्फूर्त अभिनय अंगी असलेल्या तनुजा यांचा जन्म मुंबईमध्ये चेंबूर येथे झाला. त्यांना चार भावंडे होती. त्यातील अभिनेत्री नूतन आणि चतुरा या त्यांच्या बहिणी. तनुजा यांनी पाचव्या-सहाव्या वर्षीच बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पहिले पाऊल टाकले. नूतन आणि तनुजा यांचे चित्रपटसृष्टीत पदार्पण व्हावे, या उद्देशाने शोभना समर्थ यांनी अनुक्रमे ‘हमारी बेटी’ (१९५०) आणि ‘छबिली’ (१९६०) या चित्रपटांची निर्मिती केली होती. ‘छबिली’ हा तनुजा यांना स्वतंत्र ब्रेक मिळवून देणारा चित्रपट असला, तरी त्यांनी त्यापूर्वी १० वर्षें आधी ‘हमारी बेटी’ या चित्रपटात नूतनच्या छोट्या बहिणीची भूमिका केली होती. तसेच ‘अंबर’ या चित्रपटातून ती लहानपणीची नर्गिस म्हणूनही प्रेक्षकांना दिसली होती.

     त्यानंतर तनुजा यांना शिक्षणासाठी स्वित्झर्लंड येथे पाठवण्यात आले. तिथून शिक्षण घेऊन मुंबईला परतल्यावर ‘छबिली’ या चित्रपटाद्वारे त्यांची या क्षेत्रातली खरी कारकिर्द सुरू झाली. १९६० ते २००३ अशा दीर्घ वाटचालीत त्यांनी हिंदीबरोबरच मराठी, बंगाली, भोजपुरी, पंजाबी, गुजराती अशा अनेक भाषांमधले बरेच चित्रपट केले. नायिका, सहनायिका इथपासून चरित्र अभिनेत्रीपर्यंत अनेक व्यक्तिरेखा त्यांनी समर्थपणे रंगवल्या.

     ‘बहारे फीर भी आयेंगी’, ‘जीने की राह’, ‘पैसा या प्यार’, ‘हाथी मेरे साथी’, ‘दूर का राही’, ‘मेरे जीवन साथी’, ‘दो चोर’, ‘एक बार मुस्कुरादो’, ‘कामचोर’, ‘मेरी दीदी’, ‘आज और कल’, ‘नई उमर की नई सफर’, ‘दादी माँ’, ‘भूत बंगला’, ‘याराना’, ‘अनुभव’, ‘इम्तिहान’, ‘खुद्दार’, ‘पाकिटमार’, ‘जुआरी’, ‘गंगा और गीता’, ‘गुस्ताखी माफ’, ‘अमीर गरीब’, ‘साथिया’, ‘खाकी’, ‘भूत’, ‘ज्वेल थीफ’ असे त्यांचे अनेक गाजलेले हिंदी चित्रपट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. अनेक उत्तम भूमिका साकारणाऱ्या तनुजा यांना अभिनयाचे अनेक धडे दिले ते खऱ्या अर्थाने त्यांचे गुरू असलेले दिग्दर्शक केदार शर्मा यांनी. एक अभिनेत्री म्हणून स्वतःच्या ताकदीविषयी तनुजा यांच्या मनात विश्वास निर्माण केला तो दिग्दर्शक शर्मा यांनीच. त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या ‘हमारी याद आएगी’ या चित्रपटानें युवा तनुजा यांना ‘छबिली’ नंतर पुन्हा रसिकांसमोर आणले.

     आईकडून मराठी मातीशी नाळ जुळलेल्या तनुजा यांनी डॉ. श्रीराम लागू यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘झाकोळ’ (१९८०) आणि ‘उनाड मैना’ या चित्रपटांत भूमिका करून मराठी प्रेक्षकांनाही आपल्या अभिनयाची अदाकारी दाखवून आनंद दिला. डॉ. श्रीराम लागू, सरला येवलेकर, बालकलाकार उर्मिला मातोंडकर हे झाकोळमध्ये सहकलाकार होते. ‘आज अचानक गाठ पडे’ हे ‘झाकोळ’मधले कवी अनिलांचे गीतही अत्यंत लोकप्रिय आहे. सुषमा शिरोमणी यांच्या ‘गुलछडी’ या चित्रपटातही त्यांनी काम केले. प्र.के. अत्रे यांचे ‘लग्नाची बेडी’ हे नाटक आणि त्यातली ‘रश्मी’ ही व्यक्तिरेखा मराठी रंगभूमीवर गाजलेल्या. कुमार सोहनी यांच्या दिग्दर्शनात या नाटकाचे पुनरागमन झाले आणि त्यात ‘रश्मी’ ही भूमिका साकारली ती तनुजा यांनी. हे नाटक पुन्हा रंगमंचावर आले ते सामाजिक जाणिवांमधून आणि समाजासाठी निधी उभारण्याच्या हेतूने. या प्रयोगांनी बराच निधी जमवून दिला.

     आईकडून मराठी, वडिलांकडून बंगाली असलेल्या तनुजा यांनी ‘अ‍ॅन्टोनी फिरंगी’, ‘देयानेया’, ‘तीन भुवनेर प्यारी’, ‘प्रोथोम कदम फूल’, ‘राजकुमारी’ हे बंगालीत केलेले चित्रपट. पैकी ‘देयानेया’, ‘अ‍ॅन्टोनी फिरंगी’ आणि ‘राजकुमारी’ हे त्यांचे चित्रपट सुपरहिट ठरले.

     निर्माता-दिग्दर्शक शोमू मुखर्जी यांच्याशी तनुजा यांनी विवाह केला. ‘एक बार मुस्कुरादो’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सेटवर झालेल्या ओळखीचे रूपांतर पुढे विवाहबंधनात झाले. काजोल आणि तनीषा या त्यांच्या मुलींनीही चित्रपटाच्या क्षेत्रात स्वतःचे नशीब अजमावले. काजोल ही अभिनयकुशल आणि तिच्या काळातली आघाडीची अभिनेत्री. काजोल आणि तनीषा या मुलींच्या जन्मानंतर तनुजा यांनी चित्रपटसृष्टीत पुन्हा पदार्पण केले ते चरित्र भूमिकांमधून. ‘आई नं.१’ (२०००), ‘साथिया’ (२००२), ‘भूत’ (२००३), ‘रूल्स: प्यार का सुपरहिट फॉर्म्युला’ (२००३) हे त्यांचे अलीकडचे चित्रपट आहेत. २०१२ सालच्या ‘सन ऑफ सरदार’ अत्यंत गाजलेल्या चित्रपटातही त्यांनी वृद्ध महिलेची भूमिका केली. २०१३ मध्ये नितीश भारद्वाज दिग्दर्शित पितृऋण या मराठी चित्रपटात एका प्रभावी भूमिकेत त्या दिसल्या, या चित्रपटात भूमिकेला न्याय देण्यासाठी त्यांनी केशवपन केले होते.

     तनुजा यांना १९६९ च्या ‘पैसा या प्यार’ या चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री’ म्हणून फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला. त्यापूर्वी १९६७ सालच्या ‘ज्वेल थीफ’मधील भूमिकेसाठी फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. २०१५ मध्ये त्यांना कलर्स मराठी या दूरदर्शन वाहिनीचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला.

स्वाती प्रभुमिराशी

मुखर्जी, तनुजा शोमू