Skip to main content
x

मुतकेकर, मनोहर लक्ष्मण

           बेळगाव येथे मनोहर लक्ष्मण मुतकेकर यांचा जन्म झाला. वडील वनाधिकारी असल्यामुळे त्यांच्या सातत्याने बदल्या होत असत, त्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण तोकवडा, दिंडोरी, बेळगाव या ठिकाणी झाले. माध्यमिक शिक्षण त्यांनी बेळगाव येथील बेनन स्मिथ हायस्कूल, न्यू इंग्लिश हायस्कूल, सरदार हायस्कूल येथून घेतले. १९४९मध्ये एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी बेळगाव येथील लिंगराज महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांनी धारवाड कृषी महाविद्यालयातून बी.एस्सी. (कृषी)ची पदवी १९५३मध्ये मिळवली. ही पदवी मिळवल्यावर त्यांनी स्वत:च्या शेतीवर पाच वर्षे काम केले आणि मग सरकारी नोकरीत रुजू झाले. १९६५मध्ये महाविद्यालयाची स्थापना झाल्यावर ते विद्यापीठामध्ये दाखल झाले. याच काळात त्यांनी पुणे विद्यापीठातून प्रथम श्रेणीमध्ये एम.एस्सी.(कृषी) ही पदवी प्राप्त केली.

           प्राध्यापक या नात्याने त्यांनी वनस्पती-विकृतिशास्त्र या विषयासंबंधी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केेले. त्याआधी म्हणजेच, १९६३-६५ या काळात कृषी-अधिकारी, मृदाशास्त्रज्ञ या पदांवरही काम केलेले आहे. अकोला येथील कृषी विद्यापीठामध्ये व्याख्याता म्हणून तसेच बा.सा.को.कृ.वि., दापोली येथे सहप्रध्यापक म्हणून त्यांनी अध्यापनाचे कार्य केलेले आहे.

           मुतकेकर यांनी केलेले संशोधन कार्यही महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी बटाटा विकास योजनेत काम केलेले आहे. त्यांनी रब्बी हंगामात पेरणी करण्यासाठी सातारा आणि कोरेगाव येथील शेतकर्‍यांना रोगमुक्त बटाटा बियाणे दिले. त्यांनी कृषी-विस्तारासाठी केलेले कामही नियोजनबद्ध होते. कृषी-विस्तार करण्यासाठी त्यांनी सोलापूर आणि अक्कलकोट येथे फार्मर फोरमची स्थापना केली आणि त्याद्वारे पुणे येथील ज्वारी पेरणीच्या पद्धतींची माहिती, कीटकनाशके आणि सुधारित वाणांचे वितरण केले. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीची पिके घेता आली(१९५८-५९).

           १९६० ते १९६५ व १९८५ ते १९९१ या काळात भारतातील निरनिराळ्या संशोधन केंद्रांवर विकसित केलेल्या शेकडो जातींचा अभ्यास करून त्यांच्यातील गेरवा (तांबेरा) प्रतिबंधक गुण असलेल्या जाती निवडण्यास मदत केली. त्यामुळे प्रत्येक राज्यास रोगप्रतिबंधक वाण मिळाल्यामुळे उत्पादनवाढीस मोठा हातभार लागला. तांबेऱ्याच्या रोगप्रतिबंधक ११७ ए व ११ या दोन प्रजातींना प्रतिबंधक वाण निवडण्यास मदत केली. ब्राउन रस्ट (पानांवरील तांबेरा) विषयी संशोधनाची सुरुवात महाराष्ट्रात प्रथमच महाबळेश्‍वर येथे त्यांनी सुरू केली.

           मुतकेकर १९९१मध्ये सेवानिवृत्त झाले आणि त्यानंतर त्यांनी आपल्या शेणोली येथील शेतीवर काम करण्यास प्रारंभ केला.

- संपादित

मुतकेकर, मनोहर लक्ष्मण