नेरळकर, कृष्णनाथ गणपती
कृष्णनाथ नेरळकरांनी एक कुशल संघटक म्हणूनही कामगिरी केली, ती अशी : त्यांनी नांदेड येथे १९६४ पासून संगीतसभांचे आयोजन सुमारे दहा वर्षे केले, मग औरंगाबाद येथे युवक महोत्सव सुरू केला. तेरखडे हे गाव सांगीतिक विकासासाठी दत्तक घेतले. त्यांनी मराठवाडा संगीत प्रसारक मंडळाची स्थापनाही केली. कृष्णनाथांचा दांडगा लोकसंग्रह असून संगीत क्षेत्रातील अनेक नामवंतांसह अनंत भालेराव, गोविंदभाई श्रॉफ, नरहर कुरुंदकर, पु.ल. देशपांडे, कुसुमाग्रज अशा अन्य क्षेत्रांतील व्यक्तींशी त्यांचे ॠणानुबंध होते.
मैफलीचे गायक, संगीतनट, संघटक, संगीत दिग्दर्शक व बंदिशकार अशी बहुआयामी ओळख असणार्या नाथराव नेरळकरांचे खरे श्रेय गायनगुरू म्हणून अधिक आहे. संगीत शिक्षक म्हणून त्यांची कारकीर्द नांदेडच्या प्रतिभा निकेतन विद्यालयात (१९५२ ते १९७३) सुरू झाली. नंतर औरंगाबाद येथील सरस्वती भुवन महाविद्यालयात १९७३ पासून त्यांनी संगीत विभागाचे प्रमुख म्हणून कार्य केले. औरंगाबाद विद्यापीठात संगीत विभाग सुरू करून तो वाढवण्याचे श्रेय नाथरावांना आहे. त्यांनी नांदेड येथे अनंत संगीत विद्यालय (१९५६ ते १९७३) व औरंगाबाद येथे (१९७३ पासून आजवर) हिंदुस्थानी संगीत विद्यालय सुरू केले. नाथरावांनी गुरुकुल पद्धतीने शिष्यांचा सांभाळ करत विद्यादान केले. शिवदास देगलूरकर, चित्रा देशपांडे, शिवराम गोसावी, संदीप देशमुख, प्रियदर्शनी कुलकर्णी व शशांक मक्तेदार असे अनेक शिष्य त्यांनी घडविले, त्यांपैकी काहींनी राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवला आहे. कोलकात्याच्या संगीत रिसर्च अकादमीनेही नाथरावांना मानद गुरू म्हणून पाचारण केले होते.
नाथरावांच्या पत्नी सुशीला यांनीही त्यांच्या सांगीतिक वाटचालीत हातभार लावला. नाथरावांचा संगीत वारसा अनंत, जयंत (गायन, हार्मोनिअम व तबलावादन) व हेमा उपासनी (गायन) ही त्यांची अपत्येही चालवत आहेत.
नाथराव नेरळकरांना ‘श्रेष्ठ गायक-अभिनेता’ पुरस्कार (राज्य नाट्य महोत्सव, मुंबई - १९५७), ‘कलादान’ पुरस्कार (महाराष्ट्र शासन - १९९८-९९), ‘उत्कृष्टता’ पुरस्कार (रोटरी क्लब - २००१), ‘औरंगाबाद भूषण’ (२००२) या सन्मानांनी गौरविण्यात आले .
— चैतन्य कुंटे