Skip to main content
x
drushykala

drushkala  दृश्यकला खंड प्रस्तावना 

            गेल्या दोनशे वर्षांचा भारतीय दृश्यकलेचा इतिहास पाहिला तर त्यात बॉम्बे स्कूलचा आणि     स्वातंत्र्योत्तर काळात कलाकेंद्र बनलेल्या मुंबई शहराचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्रातील स्वातंत्र्यपूर्व   काळातील कलाकृतींचे आणि त्या निर्माण करणार्‍या चित्र-शिल्पकारांचे दस्तावेजीकरण न   झाल्यामुळे   बॉम्बे स्कूल आणि आधुनिक भारतीय कला यांच्यातले दुवे अज्ञात राहिले आहेत.   महाराष्ट्रातील भारतीय दृश्यकलेचा आणि कला विचारांचा विस्तृत परिचय व्हावा यादृष्टीने या   दृश्यकला खंडाची रचना केली आहे.

 भारतीय कलाविचारात काही चुकीची गृहितके रूढ झालेली आहेत. अशी गृहितके आणि प्रत्यक्ष   वास्तुस्थिती अशी आहे.

  1. ‘बॉम्बे स्कूल’ या कलापरंपरेने फक्त ब्रिटिश अ‍ॅकॅडमीक शैलीचेच अनुकरण केल्याने त्याची   चाकोरी बनली.

 2. राजा रविवर्मा यांच्या चित्रांचा अभिजात कलेशी काहीही संबंध नाही किंवा राजा रविवर्मा व त्यांच्या पद्धतीची कला म्हणजेच श्रेष्ठ कला होय; अशा दोन्ही भूमिका आग्रहाने मांडल्या जातात. परंतु रविवर्मा यांच्या चित्रांचे सांस्कृतिक महत्त्व आता सर्वमान्य झाले आहे.

3. ब्रिटिश राजवटीत भारतीय कलातत्त्वे पुनर्स्थापित करणारी भारतीय पुनरुज्जीवनवादी कलाचळवळ फक्त बंगालमध्येच अस्तित्वात आली. तिला समांतर अशा बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट चळवळीचा सहसा उल्लेख केला जात नाही.

4. आधुनिक कला आणि बॉम्बे स्कूलची परंपरा यात पूर्णपणे विरोध होता. वस्तुस्थिती अशी आहे की, चार्ल्स जेरार्ड व शंकर पळशीकर अशा कलाशिक्षकांनी जे.जे. मध्ये आधुनिक कलेची बीजे रोवली.

5. ब्रिटिशांच्या प्रभावातून निर्माण झालेली यथार्थदर्शी कलाशैलीच महान आहे, असा विश्‍वास व याउलट प्रयोगशील व आधुनिक तेच कलात्मक अशी दोन टोकाची मते आजही अस्तित्वात आहेत. प्रत्यक्षात या दोन्ही शैली एकमेकींना पूरक आहेत.

6. कलाप्रकारानुसार कलेचे श्रेष्ठत्व ठरते. त्यामुळेच व्यवसाय म्हणून केलेली कलानिर्मिती किंवा उपयोजित कला ही नेहमीच दुय्यम दर्जाची असते. खरे तर रूढ चौकटी ओलांडून समकालीन अभिजाततेकडे जाण्याची क्षमता सर्वच कलाप्रकारांमध्ये असते. हिंदी चित्रपटांची भित्तिपत्रके, व्यंगचित्रे यांचे कलात्मक मूल्य आज मान्य झालेले आहे.

अशा प्रकारचे अनेक गैरसमज आधुनिक भारतीय कलेत प्रसृत झालेले असून त्यातून कलाजाणिवांची निकोप वाढ होत नाही. त्यातून कलेसाठी कला की जीवनासाठी कला असे परस्परविरोधी भूमिका घेणारे वाद आणि दुराग्रही भूमिकांमुळे केवळ दुफळी निर्माण होऊन कलाक्षेत्राचे नुकसानच झाले. परस्परविरोधी मते व कलावंतांचे त्याबाबतचे पराकोटीचे आग्रह यातून समाज व दृश्यकला यातील अंतर वाढतच गेले. वस्तुत: मानवी जीवनात सर्वच प्रकारच्या विचारांनी व आविष्कारांनी मोलाची भर घातली आहे, कारण कोणाचीही कला ही काळाचे, समाजजीवनाचे व संस्कृतीचे प्रतिनिधित्व करीत असते. म्हणूनच अशा कलेचा विचार करताना प्रामुख्याने तिचे तीन प्रकार लक्षात घ्यावे लागतात.

कलेचे प्रकार

नागर कला

नागर कला आणि अनागर कला असा भेद संस्कृत साहित्यापासून चालत आलेला आहे. एके काळी त्याला उच्च अभिरूचीचे आणि सर्वसाधारण निम्न अभिरूचीचे संदर्भ होेते. आज ही उच्चनीचता राहिलेली नाही. अभिजात नागर कलेची सूचक अलौकिकता आणि अनागर कलेचा थेट रांगडेपणा दोन्हींचा समन्वय आजच्या कलाजाणिवांमध्ये दिसतो. प्रगत अशा संस्कृतीशी निगडीत असणारी कला ही नागर कला म्हणून ओळखली जाते. ही प्रामुख्याने सत्ताकेंद्राच्या आसपास विकसित होत गेल्यामुळे तिचे स्वरूप हे प्रामुख्याने राजाश्रयी असते व त्याला आर्थिक व साधनसामग्रींचेही कायम पाठबळ मिळते.

अनागर अथवा लोककला - 

या शब्दातच या कलाप्रकाराची व्याप्ती लक्षात येते. ग्रमजीवनाशी व लोकसंस्कृतीशी निगडीत अशी ही कला स्थानिक पातळीवर विकसित झालेली आढळते, परंतु तिचे स्वरूप प्रगल्भ व संपन्न असे कधीच मानले जात नाही; कारण ही कला प्रामुख्याने धार्मिक रीतिरिवाज, लोकजीवनातील सण, उत्सव या निमित्ताने निर्माण होते. परिणामी याचे स्वरूप काहीसे तात्पुरत्या सजावटीचे किंबहुना कारागिरीच्या पातळीवरचे असते. याबाबत महाराष्ट्रातही भरपूर विविधता असली तरी त्यांची नोंद झाल्याचे आढळत नाही. विविध जाती व जमातींच्या परंपरेनुसार त्याचे स्वरूप बदलत जाते. पूर्वी बर्‍याच अंशी हा कलाप्रकार बलुतेदारी पद्धतीशी व स्त्री जीवनाशी निगडीत होता. उदाहरणार्थ, ग्रमीण जीवनात बैलपोळ्याचे महत्त्व पूर्वापार आहे, पण आजही पश्‍चिम महाराष्ट्रात या निमित्ताने तयार होणार्‍या बैलाच्या प्रतिमा व विदर्भातील बैलपोळा या सणाच्या बैलाच्या प्रतिमा वेगवेगळ्या प्रकारे केल्या जातात. कोकणातील देव्हारे व देशावरील देव्हार्‍यांच्या नक्षीकामातही फरक असे, परंतु हे सर्व कलेपेक्षा कारागिरीच्या पातळीवर असे. पिंगुळीच्या चित्रकथी परंपरेतील चित्रे, वडारी समाजाने पाट्या-वरवंट्यासोबतच घडविलेल्या दगडी मूर्ती, गावातील सुताराने बनवलेले नक्षीदार दरवाजे किंवा लाकडी पालख्या हा अशा ग्रमीण कलेचाच आविष्कार मानावा लागेल. लोककला ही ग्रमीण जीवनातच असते असे नाही. शहरी जीवनातही सामाजिक उत्सव, चित्रपट, चित्रपट गीते, जाहिरातींमधून लोककलेला जवळचा असा सामाजिक कलेचा आविष्कार होत असतो.

गणपती उत्सव हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य असून महाराष्ट्रात घरोघरी गणपती बसविण्याची परंपरा आहे, अगदी छोट्याशा खेडेगावापासून ते मोठ्या शहरांपर्यंत गणपती बनविणारे मूर्तिकार आढळून येतात. पूर्वी केवळ मातीचे गणपती बनविले जात. मूर्तिकार आपल्या वकुबाप्रमाणे व अनुभवानुसार त्यात सुधारणा करीत असे. पुढे साचे बनवून गणपती निर्माण होऊ लागले व आता तर प्लास्टरच्या प्रचंड आकाराच्या गणपतीच्या मूर्ती तयार होतात. गोविंद विष्णू गोखले या गणेशमूर्तिकाराने एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या उत्तरार्धात व विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात फार मोठा नावलौकिक मिळविला होता. त्यांनी मातीच्या गणपतीच्या मूर्ती बनविण्याचे शास्त्र विकसित केले व  त्यांनी ‘मृण्मूर्ती रंगकलाविज्ञान’ हे पुस्तक वृद्धापकाळी 1914 ते 1916 या काळात लिहिले. ते पुढे 1923 मध्ये प्रसिद्ध झाले. याशिवाय त्यांनी आपल्या या मृण्मय मूर्तींचे काही देखावे बनवून त्याची फिरती प्रदर्शनेही केली.

लोकमान्य टिळकांनी 1893 मध्ये सार्वजनिक गणपती उत्सव सुरू केला व स्वातंत्र्यलढ्याला एक प्रभावी माध्यम उपलब्ध करून दिले. तेव्हापासून गणेशोत्सवात सामाजिक परिवर्तन व सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रांतील महत्त्वाच्या घटनांवर आधारीत देखावे सादर केले जाऊ लागले. साहजिकच त्यात मूर्तिकार, चित्रकार व कारागीर यांचा सहभाग वाढू लागला. राम सारंग, दीनानाथ वेलिंग, विजय खातू यांनी मुंबईत तर हटकर यांनी वसईत व डी.एन. खटावकर यांनी पुण्यात दर्जेदार व वैशिष्ट्यपूर्ण गणेशमूर्ती बनवून नावलौकिक संपादन केला आहे. अशा प्रकारे दर्जेदार गणेशमूर्ती बनविणारे व त्यांची वैशिष्ट्यपूर्ण सजावट करणारे कलावंत गावोगावी आहेत.

आदिवासी कला

आदिवासी कला लोककलेच्याही आधीचा आविष्कार आहे. त्यात मानवाच्या आदिम प्रेरणा दिसतात. त्यात केलेला रेषेचा, अवकाशाचा आणि आकाराचा थेट वापर एकूणच कलाविष्काराच्या मुळाशी आहे. आजच्या महाराष्ट्रात पूर्वीपासून, सह्याद्रीच्या पूर्व-पश्‍चिम उतारापासून सलग सातपुड्याच्या रांगांत आदिवासींचे वास्तव्य आहे. या आदिवासींचे जीवन अत्यंत खडतर आहे, परंतु त्यांच्या जीवनाशी निगडीत श्रद्धा व प्रत्यक्ष जीवन यातून आलेल्या कलाकौशल्याचे दर्शन घडविणार्‍या वस्तू व हस्तकला म्हणजेच आदिवासींची कला. याशिवाय धनगर (मेंढपाळ), लमाण, पारधी अशा भटक्या जमातींचाही त्यात समावेश होतो.

वारली चित्रकला

मुंबईजवळ डहाणूच्या आसपास वारली लोकांची वस्ती आहे. या जमातीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कुडाच्या झोपड्या ते शेणामातीने सारवतात व त्यावर पांढर्‍या रंगाने अतिशय साधी पण वैशिष्ट्यपूर्ण चित्रे काढतात. 1970 च्या दशकात ह्या कलेला प्रसिद्धी मिळाली व वारली जमातीतील एक चित्रकार जिव्या सोम्या मशे हे राष्ट्रपती पुरस्कारचे मानकरी ठरले. हा कलाप्रकार हे महाराष्ट्रातील आदिवासींच्या व गिरीजनांच्या कलाविष्काराचे एक उदाहरण असून, ते महाराष्ट्राचे एक वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.

आज आधुनिक नागर कलेत आदिम संस्कृतीतील या विशिष्ट शैलीचा वापर होताना दिसतो. जिव्या सोम्या मशे यांच्यासारखे वारली चित्रकार स्वप्रतिभेच्या जोरावर आधुनिक काळाशी नाते जोडणारी आणि वारलीसारख्या लोककला जपत त्यांच्या मर्यादा ओलांडणारी निर्मिती करू लागले. पुस्तकांच्या इलस्ट्रेशन्ससाठी आदिवासी कलाशैलींचा वापर आज केला जात आहे. एवढेच नव्हे, तर अंतर्गत सजावट व उपभोग्य वस्तूंना अधिक आकर्षक बनविण्यासाठी तो केला जात आहे.

प्रस्तुत चित्र-

शिल्प व उपयोजित कला या विषयाला वाहिलेल्या व प्रथमच होणार्‍या या कोशात प्रामुख्याने नागर कलेशी निगडीत अशा गेल्या दोनशे वर्षातील कलावंतांचाच समावेश केला आहे.

 

1. चित्रकला शिल्पकला

युरोपियन कलावंतांना पाचारण करून त्यांच्यापासून चित्रे व शिल्पे बनवून घेतली जाऊ लागली. पूर्वीपासूनच येथील इंग्रज अधिकारी त्यांच्या कारकिर्दीतील, त्यांना अभिमानास्पद  वाटणार्‍या महत्त्वाच्या प्रसंगांची चित्रे परदेशी कलावंतांकडून काढून घेत असत. याशिवाय अनेक इंग्रज चित्रकार आपल्या देशात फिरून येथील विलक्षण वेगळे जीवन, निसर्ग, येथील वास्तूंची चित्रे काढून इंग्लंडमध्ये पाठवीत असत. सवाई माधवरावांच्या काळातील पुण्याचा रेसिडेन्ट मॅलेट यानेही जेम्स वेल्स या चित्रकाराला आमंत्रित करून एक भव्य चित्र रंगविण्यास सांगितले होते. हे चित्र इंग्रज, मराठे व टिपू सुलतान यांच्यात 6 ऑगस्ट 1790 रोजी झालेल्या ‘त्रिवर्ग’ तहाचे, अर्थात पेशवे दरबाराचे चित्र होते. या चित्राच्या तयारीची अभ्यासचित्रे 24 ऑगस्ट 1791 मध्ये गणपती उत्सवाचे वेळी दरबारात हजर राहून जेम्स वेल्स व त्याचे साहाय्यक व विद्यार्थी यांनी तयार केली होती. 1792 च्या दरम्यान वेल्सने सवाई माधवराव, नाना फडणीस, महादजी शिंदे यांचीही व्यक्तिचित्रे काढली होती, पण विशेष म्हणजे 1791 च्या दरम्यान याच इंग्रज चित्रकार जेम्स वेल्सच्या नेतृत्वाखाली पुण्याच्या शनिवारवाड्यात एका कलाशाळेची स्थापनाही करण्यात आली होती. विशेष म्हणजे या कलाशाळेत शिकून तयार झालेले गंगाराम चिंतामण नवगिरे-तांबट हे एतद्देशीय कलावंत पेशवे दरबाराचा ‘त्रिवर्ग तह’ या चित्राची अभ्यासचित्रे करण्यात सहभागी झाले होते. त्यांनी केलेल्या अभ्यासचित्रांचा दर्जा उत्तम होता व आजही ही चित्रे इंग्लंडमध्ये आणि मॅलेटच्या वंशजांच्या संग्रहात आहेत. या कोशात गंगाराम चिंतामण नवगिरे-तांबट यांच्यावर विस्तृत नोंद प्रथमच प्रकाशित होत आहे.

वास्तविक पाश्‍चिमात्त्य शैलीतील चित्रांचा चंचुप्रवेश जहांगीर बादशहाच्या काळातच मोगल दरबारात झाला होता, पण इंग्रजी अमदनीत संस्थानिक व त्यांच्या पदरी असलेले एतद्देशीय चित्रकार या युरोपियन कलावंतांच्या चित्रांकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होऊ लागले. संपूर्ण हिंदुस्थानभर इंग्रजांच्या अनुकरणाचे प्रयत्न अहमहमिकेने सुरू झाले. येथील समाजधुरीण, उद्योगपती, संस्थानिक अशी धनिक मंडळी परदेशात जाऊ लागली. तेथे भरणार्‍या तंत्र, उद्योग व कला या क्षेत्रांतील वेगळी व अद्भुत दुनियाच त्यांच्यापुढे उलगडली जाऊन इंग्रजांचे ज्ञान व विद्या एतद्देशीयांनाही शिकवाव्यात हा विचार मूळ धरू लागला. साहजिकच या बदलत्या परिस्थितीला सामोरे जाण्याचा प्रयत्न येथील कलावंत व कारागीर करू लागले. या संकरातून एक वेगळ्याच प्रकारची ‘कंपनीस्कूल’ शैलीतील चित्रनिर्मिती सुरू झाली. काही कलावंतांनी मात्र थेट पाश्‍चिमात्त्य शैलीत व माध्यमात काम करण्यास सुरुवात केली व उल्लेखनीय यश संपादन केले. राजा रविवर्मा (1848-1906) हे या प्रकारे कलानिर्मिती करणारे अत्यंत यशस्वी चित्रकार ठरले. पाश्‍चिमात्य शैली व भारतीय जनसमानसाला भुरळ घालणारे विषय यामुळे त्यांच्या चित्रांनी लोकप्रियतेचे शिखर गाठले. रविवर्मांना मिळालेला राजाश्रय, जनमान्यता व सन्मान हे सर्व या बदलत्या अभिरुचीचे द्योतक होते.

एतद्देशीयांच्या अभिरुचीमध्ये हे बदल घडत असतानाच, इंग्रज राज्यकर्त्यांनाही आपले हिंदुस्थानातील साम्राज्य वैभवशाली व समर्थ करावयाचे होते. हे करीत असताना आपला व्यापारही वाढवायचा होता. त्यासाठी स्थापत्य, कला, तंत्रज्ञान आणि विज्ञान अशा सर्वच क्षेत्रांत इंग्रजांनी या खंडप्राय बहुभाषिक देशातील विविध प्रांतातील विविध प्रकारच्या स्थानिक परंपरांपेक्षा वेगळ्याच स्वरूपाचे बदल करण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू केले.

 

2. उपयोजित कला

अभिजात कलाक्षेत्रातील चित्र-शिल्पकारांपेक्षा वेगळी अशी व्यावसायिक व समाजाभिमुख कामे करून काही कलावंतांनी उद्योग, समाज व संस्कृती या क्षेत्रांत आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत व पर्यायाने देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान दिले आहे. स्थूलमानाने उपयोजित कला (अप्लाइड आर्ट) या क्षेत्रात अशा कलावंतांचा समावेश करावा लागेल. इ.स. 1857 मध्ये सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट या कलासंस्थेची स्थापना झाली आणि पाश्‍चात्त्य कलाविचार इथे रूजला. इ.स. 1800 च्या आसपास मिशनरी लोकांमुळे मुद्रणाचा प्रसार वाढला. बॉम्बे कुरिअरसारखे वृत्तपत्र सुरू झाले. रेल्वेसारखी दळणवळणाची साधने वाढली. औद्योगिक उत्पादन सुरू झाले. 1907 मध्ये मुंबईत पहिली जाहिरात संस्था सुरू झाली.  कलाकौशल्ये शिकवणे, हा सर जे.जे. कलासंस्था सुरू करण्यामागचा प्रमुख उद्देश होता. अभिजात कलेचे शिक्षण हे नंतर आले. त्या वेळेस कलाकौशल्य (क्राफ्ट) आणि अभिजात कला (पेंटिंग व स्कल्प्चर) असे भेद होते. अभिजात कला, कनिष्ठ कला, अलंकारिक कला असे त्यांचे वर्गीकरण करता येत होते. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जाहिरातकलेचा उदय झाला आणि प्रयोेजनमूल्य असलेल्या हेतुप्रधान कलाप्रकारांना ‘उपयोजित कला’ असे सर्वसमावेशक नाव देण्यात आले. डिझाइन अथवा संकल्पन असे नाव अथवा अशी संज्ञा आज व्यापक अर्थाने या संदर्भात वापरली जाते. तिच्यात कलावस्तू, कलाप्रेरणा यांच्याबरोबरच कलाविचाराचा एक धोरण (डींीरींशसू) म्हणूनही विचार केला जातो. सौंदर्यनिर्मिती हा अभिजात कलेचा उद्देश असला, तर प्रचार, प्रसार व क्रयवस्तूची मूल्यवृद्धी (व्हॅल्यू अ‍ॅडिशन) हा उपयोजित कलेचा उद्देश असतो.

उपयोजित कलेचे वर्गीकरण करायचे झाल्यास ते असे करता येईल - जाहिरातकला, प्रकाशनकला, संकल्पन (डिझाइन), प्रदर्शन आणि दृकमाध्यमांची कला (वेब डिझाइन). अलीकडच्या काळात विविध शाखांमध्ये उपयोजित कलेचा विस्तार झालेला असला, तरी जीवनव्यवहारासाठी केलेले कलेचे उपयोजन हे त्याचे स्वरूप कायम राहिलेले आहे आणि एक वा अनेक माध्यमांचा सहयोग हे त्याचे तंत्रदृष्ट्या वैशिष्ट्य ठरलेले आहे. उपयोजित कला या माध्यमाची (कलाप्रकाराची) निर्मिती अधिक लोकाभिमुख असल्यामुळे सामाजिक संस्कृती आणि अभिरुची घडविण्यात तिचा सक्रिय सहभाग असतो. किंबहुना अभिजात स्वरूपाच्या चित्र-शिल्पकलेतून शिकलेल्या कलामूल्यांचा उपयोजित कलेत व्यावसायिक वापर केला जातो. त्यामुळे अभिजात कलेतील स्थित्यंतरे व कलाप्रवाहांचा प्रभाव उपयोजित कलेवर अपरिहार्यपणे पडलेला दिसतो. आजच्या काळात दोन्ही कलांमधील सीमारेषाही पुसट झाल्या आहेत.

औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळात जाहिरातकलेचा उगम झाला. त्यामुळे कलेला प्रसाराचे आणि प्रचाराचे नवे प्रयोजन लाभले. मुद्रणाचे स्वरूपही या काळात ग्रंथप्रसारापुरते न राहता अधिक वैविध्यपूर्ण आणि आकर्षक झाले. 1920 च्या दशकात परदेशी जाहिरात कंपन्या भारतात आल्या. जाहिरातकलाशिक्षणाची वेगळी शाखा असावी, याची जाणीव प्रथम निर्माण झाली, ती सर जे.जे. कलासंस्थेत डेप्युटी डायरेक्टर म्हणून चार्ल्स जेरार्ड आले, त्या काळात. 1934 मध्ये सॉलोमन डायरेक्टर असताना, कलासंस्थाच बंद करण्यात यावी, असा एक प्रस्ताव थॉमस कमिटीने आणला होता. त्याला विरोध होऊन कलाशिक्षण अधिक व्यवसायाभिमुख करावे, असा विचार पुढे आला. जाहिरातकला (कमर्शियल आर्ट) या विषयाचे शिक्षण हा त्याला एक पर्याय होता. शिवाय जेरार्ड यांच्यापाशी दृक्कलाशिक्षणाकडे बघण्याचा एक वेगळा व्यावसायिक व उपयुक्ततावादी दृष्टिकोन होता. बाहाऊसच्या आणि लास्लो मोहोली नागी यांनी अमेरिकेत सुरू केलेल्या कलाशिक्षणाच्या मूलतत्वांशी त्याचे बरेच साम्य होते. या सर्व पार्श्‍वभूमीवर जेरार्ड यांनी 1935 साली जाहिरातकलेचा पहिला वर्ग सुरू केला. गोविंद भडसावळे हे या शाखेचे पहिले विद्यार्थी. मेट्रो सिनेमासाठी त्यांनी अनेक पोस्टर्स तयार केली. जेरार्ड यांच्यानंतर व्ही.एन. आडारकर यांनी कमर्शियल आर्ट या कलाशाखेचा विस्तार केला आणि 1957 मध्ये स्वतंत्र कलाशिक्षणसंस्था स्थापण्यात आली. ‘सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट’ असे या कलासंस्थेचे नामकरण करण्यात आले. त्याच सुमारास 1956 मध्ये जे. जे.च्या आवारात मुद्रणतंत्र संस्था सुरू करण्यात आली. त्या आधी 1953 मध्ये जे.जे.मध्ये प्रिंटमेकिंग हा विभाग सुरू करण्यात आला होता व वुडकट, लाईनो कट, उत्कीर्णन (एन्ग्रेव्हिंग) अशा अनेक पद्धती शिकविण्यास सुरुवात झाली होती. त्यातून पुढे मुद्राचित्रे या कलाप्रकारात काम करणारे चित्रकार निर्माण झाले. 1968 मध्ये आय.आय.टी. पवई येथे इंडस्ट्रियल डिझाइन सेंटर सुरू करण्यात आले. 1970 च्या दशकात उपयोजित कलेची क्षेत्रे अधिक विस्तारली आणि जागतिकीकरणाच्या संदर्भात कलाशिक्षणाचा आधुनिक दृष्टिकोन असलेले परदेशी विद्यापीठाचे अभ्यासक्रम इथे सुरू झाले. परिणामी उपयोजित कलेचे स्वरूप मुद्रणाशी संबंधित असे न राहता अ‍ॅनिमेशन, फॅशन डिझाइन अशी नवी क्षेत्रेे निर्माण झाली. 1950 ते 2000 या पन्नास वर्षांच्या कालावधीत औद्योगिक क्षेत्रात, अर्थकारणात जे बदल झाले, त्याचा परिणाम उपयोजित कलेची जाणीव अधिक व्यापक होण्यात झाला.

जाहिरातकला (कमर्शियल आर्ट), उपयोजित कला  (अप्लाइड आर्ट) आणि संकल्पन  (डिझाइन) अशा तीन अवस्थांमधून या कलेची व्याप्ती वाढत गेलेली आहे. त्यापैकी जाहिरात आणि प्रकाशन या दोन शाखांमधून उपयोजित कलेचा सर्वाधिक विस्तार झालेला आहे. वृत्तपत्र-मासिकांच्या जाहिराती, भित्तिपत्रके, पॅकेजिंग, बोधचिन्हे, दिनदर्शिका अशा अनेक प्रकारच्या माध्यमांमधून दृश्यकलेचा आविष्कार झालेला दिसून येतो. त्यासाठी लागणारी संकल्पनक्षमता, कथाचित्रे, मुद्राक्षरकला, सुलेखन, छायाचित्रण अशा क्षेत्रात महाराष्ट्रातील अनेक चित्रकारांनी कलाविष्कार केला असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळविला आहे.

 

आजच्या कलेचे नवे सौंदर्यशास्त्र

आजचा दृश्यकलेचा झालेला विस्तार एवढा मोठा आहे आणि इतर कलाशाखांशी असलेले तिचे नाते इतक्या विविध प्रकारचे आहे की, दृश्यकलेच्या सीमा निश्‍चित करणे खूपच कठीण झाले आहे. आजच्या दृक्श्राव्य प्रसारमाध्यमांच्या युगात दृश्यप्रतिमांना सर्वाधिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. दृश्यकलेच्या बाबतीत काही कलाविषयक प्रश्‍न पुन्हा पुन्हा निर्माण होताना दिसतात. कलेचे अलौकिकत्व आणि तिचे उपयुक्तता मूल्य यांचे द्वंद्व कला इतिहासात पुनरावृत्त होताना दिसते. आर्ट आणि क्राफ्ट, कला आणि कौशल्य यांच्यातल्या सीमारेषा प्रत्येक काळात नव्याने स्पष्ट होत आलेल्या आहेत. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या स्थापनेपासून आर्ट आणि क्राफ्टचे साहचर्य होते. त्यातूनच वास्तूंचे अलंकरण, उपयोजित कलेचा स्वतंत्र विभाग, मूलभूत अभ्यासक्रमातला बाहाऊस आणि डिझाइन संकल्पनेचा प्रभाव अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर कला व कौशल्य यांच्यामधले, तसेच अलौकिकता व उपयुक्तता यांच्यातले नाते नव्याने प्रस्थापित होताना दिसते. काळाच्या ओघात कलामाध्यमांच्या व कलाप्रकारांच्या संकल्पना बदलल्या. संवेदनशीलतेत मोठे बदल झाले.

आजच्या दृश्य कलाजगताचा विचार करता त्याची व्याप्ती खूपच विस्तारली असून कलानिर्मितीचे स्वरूपही बहुकेंद्री झाले आहे. अशा प्रकारे निर्माण होणार्‍या कलेतही इतक्या विविध प्रकारे अभिव्यक्ती होत आहे की ते बघताना मन गोंधळून जाते. परिणामी या सर्वांना कवेत घेऊन त्यांचे मूल्यमापन करणे कठीण होऊ लागले आहे. आज तर अशी परिस्थिती आहे की कलाविष्कारामागे कोणतेही समान सूत्र नाही. परिणामी आस्वादाच्या बाबतीत कोणतेही संकेत नाहीत. कलावंताला निर्मितीचे पूर्ण स्वातंत्र्य आहे व प्रेक्षकाला आस्वाद घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे! परंतु या परिस्थितीमुळे सर्वसामान्य माणूस गोंधळून गेल्याचे दिसते. हा दृश्यकला खंड वाचताना हा समग्र अनुभव येईल, असा विश्‍वास वाटतो.

- सुहास बहुळकर, दीपक घारे