पाचेगावकर, महादेव रुद्रप्पा
महादेव रुद्रप्पा पाचेगावकर यांचा जन्म लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील पोहरेगावात गरीब शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव भागीरथीबाई होते. त्यांचे शालेय शिक्षण सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे झाले व १२वीपर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण सोलापूर येथे झाले. त्यांनी त्यानंतर नागपूर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातून १९६३मध्ये पशुवैद्यकीय पदवी प्राप्त केली. तसेच त्यांनी १९६६मध्ये मेंढी व लोकर या विषयावरील एम.एस्सी.ची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. पाचेगावकर यांनी महाराष्ट्र शासनाच्या पशु-संवर्धन विभागात विविध पदांवर ३३ वर्षे सेवा केली. त्यांनी प्रामुख्याने ५ शेळी-मेंढी-पैदास प्रक्षेत्रांवर प्रक्षेत्र व्यवस्थापकाचे पद सांभाळले. त्यांनी प्रथमच शेळ्या-मेंढ्यांची खरेदी व विक्री जिवंत वजनावर करण्याची प्रथा सुरू केली आणि नंतर या प्रथेचे धोरणात रूपांतर झाले. त्यामुळे शेळ्या-मेंढ्यांच्या पालकांना लोकरीला किफायतशीर भाव मिळावा आणि दलालांची अडवणूक टाळावी या उद्देशाने सेना, पोलीस व इतरांना लागणारे बरॅक ब्लँकेट तयार करण्याबाबत विस्तृत प्रकल्प तयार करून दिला. नवी दिल्ली येथे १९९२ साली भरलेल्या आंतरराष्ट्रीय शेळी परिषदेला ते महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. पुणे येथील पशु-संवर्धन खात्याच्या मुख्यालयात डॉ. पाचेगावकर यांनी नियोजन विभागाची सुरुवात करून तेथे ८ वर्षे पायाभूत कार्य केले. त्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी कार्यक्रम अंदाजपत्रक बनवण्याच्या कार्याला प्रारंभ केला. तसेच, पशुआहार पुरवठ्यासाठी प्रचलित मॉरिसच पद्धतीऐवजी सुधारित मेटॅबॉलिक वजनावर आधारित पशुआहार पुरवठा पद्धत तयार करून शासकीय मान्यतेने त्या पद्धतीचा प्रसार केला. शेळ्या-मेंढ्यांमध्ये ‘स्केबीज’ किंवा ‘मावा’ हा खरुजेसारखा होणाऱ्या अतिसंक्रमक रोगावर करंजीचे तेल अतिशय गुणकारक असल्याचे पाचेगावकर यांनी सिद्ध केले. हे औषध आता व्यापकपणे वापरण्यात येते. या प्रयोगावरील शोधनिबंध ‘इंडियन व्हेटरनरी जर्नल’ या प्रसिद्ध मासिकामध्ये १९६८मध्ये छापून आला.
डॉ. पाचेगावकर यांनी अनेक वर्षे होमिओपॅथी औषधशास्त्राचा सखोल अभ्यास केला. त्यातून त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील अनेक परिषदांमध्ये शेळ्या-मेंढ्यांमध्ये होमिओपथी औषधांचा वापर या विषयावर तसेच ‘गाईंमधील स्तनदाह आणि होमिओपॅथी’ या विषयावर अभ्यासपूर्ण शोधनिबंधाचे सादरीकरण केले. लातूर जिल्ह्यामध्ये १९९३मध्ये झालेल्या भूकंपामुळे हजारो शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. त्यांच्या पुनर्वसनाचे काम शासनाने युद्धपातळीवर जागतिक बँकेच्या मदतीने हाती घेतले. त्यामध्ये भूकंपग्रस्त शेतकर्यांना विहित मुदतीत गाई, म्हशी, शेळ्या व मेंढ्या यांचे वाटप करावयाचे होते. डॉ. पाचेगावकर यांनी जनावरांची खरेदी व वाटप याबाबतचा नावीन्यपूर्ण व पथदर्शक कार्यक्रमाची आखणी करून तो विहित मुदतीत पूर्ण करण्याची भरीव कामगिरी केली. शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर डॉ. पाचेगावकर यांनी स्थानिक जातींच्या गोवंशाचे जतन व संवर्धन कार्याला स्वतःला वाहून घेतले. त्याची सुरुवात म्हणून त्यांनी समविचारी मित्रांच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्यात प्रथमच देवणी गोवंश-पैदासकारांच्या संघटनेची स्थापना केली. तिचे ते संस्थापक अध्यक्ष होते. या संघटनेच्या कार्याची शासनानेही दखल घेतली आहे. डॉ. पाचेगावकर यांनी सेंद्रिय शेती पद्धतीचाही सखोल व सविस्तर अभ्यास केलेला आहे. ते सेंद्रिय पद्धतीने उसाची शेती करत असून गेली २० वर्षे गुळाचे उत्पादन घेत आहेत. महाराष्ट्र राज्य सेंद्रिय शेती महासंघाचे ते तांत्रिक सल्लागार आहेत. त्यांनी २००८मध्ये बंगळुरू येथे भरलेल्या दक्षिण आशियातील सेंद्रिय पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये भाग घेऊन ‘सेंद्रिय शेतीमध्ये वाळवीची उपयुक्तता’ या विषयावरील शोधनिबंधाचे सादरीकरण केले.