Skip to main content
x

पाटील, जयसिंग रामचंद्र

       यसिंग रामचंद्र पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी आपले शालेय शिक्षण याच जिल्ह्यातील गारगोटी येथे पूर्ण केले. त्यांनी १९५९मध्ये पुणे येथील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला व ते १९६३मध्ये बी.एस्सी. (कृषी) पदवी उत्तीर्ण झाले. त्यांनी कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयात प्रयोग निर्देशक म्हणून नोकरीची सुरुवात केली. त्यांनी संशोधन करून १९७१मध्ये एम.एस्सी. (कृषी) ही पदवी प्राप्त केली. सुरुवातीच्या काळात त्यांनी प्रक्षेत्र व्यवस्थापन केले. त्यांनी राहुरी येथे कृषिविद्या विभागात साहाय्यक प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक पदावर कार्य केले. त्यांनी १९८४मध्ये पीएच.डी. पदवी प्राप्त केली.

      पाटील यांनी तणांच्या बंदोबस्ताविषयी संशोधन केल्याने  त्यांचे सर्वत्र नाव झाले. शेती व बिगरशेती विभागाला १९७०च्या दशकात पार्थेनियम (गाजर गवत) या तणाचा फार मोठा फटका बसला. परदेशी धान्यातून आलेले हे तण वणव्याप्रमाणे सर्वत्र पसरले. डॉ.पाटील यांनी अनेक प्रयोग करून या तणाचा कसा बंदोबस्त करावा याचे योग्य मार्गदर्शन केले. काही विशिष्ट तणनाशकांचा वापर केला असता शंभर दिवसांहून अधिक काळ पार्थेनियमचा उपद्रव होत नसल्याचे त्यांनी दाखवून दिले. डॉ. जयसिंग पाटील हे ज्वारी कृषिविद्यावेत्ता म्हणून कार्यरत होते. त्या काळात त्यांनी स्वाती या रबी ज्वारीच्या कृषिविद्याविषयी शिफारसी संशोधनाद्वारे प्रसृत केल्या. त्यांनी ऊस पिकाविषयी दीर्घकाळ संशोधन केले. त्यांनी पश्‍चिम महाराष्ट्रासाठी को ७५२७ व को ८०१४ या नवीन जातींच्या कृषिविद्याविषयी शिफारसी तयार केल्या. त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रात ऊस उत्पादनात वाढ होण्यास मदत झाली. त्यांनी ६०हून अधिक शास्त्रीय लेख लिहिले आहेत. ‘तणे आणि त्यांचा बंदोबस्त’ या मराठी पुस्तकाचे ते एक लेखक आहेत. हे पुस्तक कृषी महाविद्यालयात क्रमिक पुस्तक म्हणून वापरले जाते.     

- डॉ. नारायण कृष्णाजी उमराणी

पाटील, जयसिंग रामचंद्र