Skip to main content
x

पाटील, प्रभाकर त्र्यंबक

चित्रकार

प्रभाकर त्र्यंबक पाटील यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे झाला. त्यांच्या आईचे नाव द्वारका होते. त्यांचे वडील कला भवन, बडोदा येथून कला पदविका घेतल्यानंतर प्रबोधन कला विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. प्रभाकर पाटील यांनी याच संस्थेत वडिलांच्या मार्गदर्शनाखाली कलाशिक्षणाचे धडे घेतले. नागपूरच्या चित्रकला महाविद्यालयातून १९७९ मध्ये त्यांनी प्रथम क्रमांकाने पदवी मिळविली, तसेच नागपूर विद्यापीठातून १९८३ मध्ये एम.एफ.ए. ही पदवी प्रथम श्रेणीत मिळवून त्यात ते सर्वप्रथम आले. त्यांचा विवाह मनीषा जोशी यांच्याबरोबर १९८५ मध्ये झाला.

सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये १९८५ पासून त्यांनी अध्यापनाच्या कार्यास सुरुवात केली. येथूनच कलेचा खरा प्रवास सुरू झाला. त्यांनी १९९० साली  प्रथम एकल प्रदर्शन, ‘युटोपियन नेचर’ जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरविले. ज्ञानेश्‍वर नाडकर्णी व इतर कलासमीक्षकांनी या मालिकेची दखल घेतली. आकारांची आणि सुसंबद्ध रचनेची जाण तसेच ऋतुमानानुसार वातावरणातील बदलते क्षण टिपण्याचा प्रयत्न त्यांच्या चित्रांमध्ये दिसतो. घरातील संगीतमय वातावरणामुळे त्यांच्या चित्रांमध्ये रागांतील विविध भावही चित्रबद्ध झाले. संगीतातील राग ‘पिलू’ या  टोपणनावाने ते परिचित आहेत.

कलानिर्मितीत प्रयोगशीलता, तंत्रावर विशेष भर, देत भारतीय परंपरा, लघुचित्रे यांच्यामधून प्रेरणा घेऊन ते अलंकरणातील बारकाव्यांचा कौशल्यपूर्ण वापर करतात. आकारातील मर्म साधण्यासाठी ते विशिष्ट रंगसंगती, अवकाश विभाजन, पारदर्शी रंगलेपन व पोताचा सुसंबद्ध वापर करतात.

आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचा १९८५ पासून सतत तीन वर्षे पुरस्कार, १९८८ मध्ये महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार, दक्षिणेमध्ये सांस्कृतिक केन्द्र राष्ट्रीय प्रदर्शनाचा दोन वेळा पुरस्कार (१९८७ व १९९०) अशा पुरस्कारांबरोबरच कालीदास अकादमी, उज्जैन यांच्यातर्फे मेघदूत काव्यचित्रासाठी त्यांना ‘श्रेष्ठ पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. तसेच महाकोशल कला परिषद, रायपूर येथील ‘सर्वश्रेष्ठ पुरस्कार’ त्यांना श्री. बेन्द्रे यांच्यातर्फे देण्यात आला. शिक्षकी पेशात राहून त्यांनी स्वतःची कलाक्षेत्रातील कारकीर्द सातत्याने जोपासली

नंतरच्या काळात ऊन, वारा, पाऊस यांनी रापलेले वाडे, भिंती, दरवाजे यांवर त्यांनी लक्ष केन्द्रित केले. या शैलीमधील ‘अॅन्टिक्विटी’ (१९९९), ‘सॅण्ड्स ऑफ टाइम’ (२००४), तसेच ‘ऑन टाइम्स ट्रेल’ (२००८) ही प्रदर्शने झाली. त्या दरम्यान ‘आर्ट टुडे’ या नवी दिल्लीच्या व्यावसायिक गॅलरीने त्यांना १९९६ मध्ये प्रथम संधी दिली आणि १९९९ ते २००१ या काळात मान्यवर कलाकारांसोबत ‘आर्ट टुडे’मध्ये त्यांची चित्रे सातत्याने प्रदर्शित झाली.

‘टू फॉर टू थाउजण्ड’ या ‘आर्ट टुडे’, दिल्लीतर्फे भरविलेल्या प्रदर्शनात भारतातील चौदा अग्रगण्य  कलाकारांच्या जोडप्यांमध्ये प्रभाकर पाटील व मनीषा पाटील यांचा सहभाग होता. ‘इंडिया टुडे’ व ‘आज तक’ यांनी या प्रदर्शनाची दखल घेतली. कलानिर्मितीतील या प्रवासात कलासंस्थांनी त्यांना आमंत्रित केले. यांतील प्रामुख्याने नेहरू सेंटर, मुंबईतर्फे ‘आर्ट फ्यूजन’, ललित कला अकादमी, नवी दिल्ली, सरला तसेच विन्यासा आर्ट गॅलरी, चेन्नई, वॅम आर्ट, त्रिवेंद्रम जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई, अशा देशभरातल्या अनेक प्रदर्शनांमध्ये त्यांनी भाग घेतला आहे. अनेक संस्थांमध्ये परीक्षण मंडळांचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, ललित कला अकादमी, नवी दिल्ली, चंदिगड म्यूझियम, चंदिगड, महाराष्ट्र शासन अशा राष्ट्रीय संग्रहालयांमध्ये आणि देशपरदेशांत त्यांची चित्रे व्यक्तिगत संग्रहक आणि उद्योगसमूहांच्या संग्रही आहेत.

- प्रा. सुभाष बाभूळकर

 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].