Skip to main content
x

पाटील, प्रकाश रंगराव

       दुग्ध व्यवसायामध्ये आर्थिक लाभाच्या हव्यासापोटी वासरे जगवली जात नाहीत व जी वासरे जगतात ती सुदृढ नसतात. त्यामुळे व्यवसायात स्वत:कडील उत्तम वंश नाइलाजाने तयार होत नाही. या पिढ्यान्पिढ्या  चालत आलेल्या भयावह दुष्टचक्राचा भेद प्रकाश रंगराव पाटील यांनी केला. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील कौलगे गावी झाला. शेतीचा वारसा असल्यामुळे गुरे सांभाळणे व घरचे पशुधन समृद्धतेने वाढवणे याचे बाळकडू त्यांना आजी-आजोबा व आई-वडिलांकडून मिळाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या कौलगे येथील जीवन शिक्षण मंदिरामध्ये झाले; तर इ. ११वीपर्यंतचे शिक्षण कोल्हापूर येथील खासगी विद्यालयामध्ये झाले. एस.एस.सी. उत्तीर्ण झाल्यावर वडीलबंधू यांच्या प्रेरणेने त्यांनी मुंबई येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला व १९७३मध्ये त्यांनी बी.व्ही.एस्सी. पदवी द्वितीय श्रेणीत संपादन केली. त्यानंतर त्यांनी थोरल्या बंधूंच्या नेतृत्वाखाली आधुनिक शेतीला सुरुवात केली. शेतीसाठी सेंद्रिय खताला पर्याय नाही, तसेच दैनंदिन खर्चाची तोंडमिळवणी व्हावी या दुहेरी हेतूने त्यांनी शेतीला दुग्ध व्यवसायाची सार्थ अशी जोड दिली. त्यांनी बंगळुरू येथून ५० संकरित गायी आणून समर्थ दुग्ध व्यवसायाचा आदर्श दशक्रोशीमध्ये निर्माण केला. त्यांनी गायी सांभाळून दुग्ध व्यवसाय हा नफ्याचा व्यवसाय असतो, हे सिद्ध केले व परिसरातील लोकांना शास्त्रीय पद्धतीने पशुपालन व स्वच्छ दूधनिर्मिती याबाबत सातत्याने मार्गदर्शन केले. त्यांनी गावामध्ये सहकारी तत्त्वावर दूधसंस्था स्थापन केली व ती सचोटीने चालवण्याचा पायंडा पडला. त्यांच्या कार्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दुधाचा महापूर योजनेंतर्गत गोकुळ उद्योगसमूहचे शिल्पकार आनंदराव पाटील यांनी त्यांना मार्गदर्शनासाठी पाचारण केले. डॉ.पाटील यांनी गोकुळ संस्थेमध्ये स्वतंत्र पशु-संवर्धन विभाग स्थापन केला व समृद्ध केला. आज या विभागामध्ये ५८ कुशल पशुवैद्यकीय अधिकारी व ४० फिरते दवाखाने कार्यरत आहेत व प्रत्येक सभासद शेतकऱ्याला त्याच्या गोठ्यापर्यंत सर्व प्रकारची पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध होत आहे. या विभागांतर्गत दरवर्षी साधारणतः तीन लाखांपर्यंत जनावरांची तपासणी केली जाते. तसेच कृत्रिम रेतनासाठी ४०१ फिरती केंद्रे उभारली, २ लाखांपर्यंत जनावरांना कृत्रिम रेतन या फिरत्या केंद्रामार्फत केले जाते. या पशु-संवर्धन विभागामधून एक हजारांच्यावर कृत्रिम रेतन तंत्रज्ञ प्रशिक्षित झाले असून ते कार्यरत आहेत.

       प्रकाश पाटील यांना गोकुळ समूहात कार्यरत असताना प्रथमतः एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे दुग्ध व्यावसायिक किंवा शेतकरी हा नवीन जनावरांच्या खरेदीमुळे आर्थिक संकटात अडकतो. या समस्येचा सर्वांगीण अभ्यास केल्यावर मादी वासरे जगत नाहीत किंवा दुधाच्या लोभापोटी जगवली जात नाहीत हे भीषण वास्तव जाणवले. वासराला जगवण्यासाठी लागणाऱ्या दुधाची किंमत शेतकऱ्याला परवडत नाही, त्यामुळे घरचा चांगला वंश मोठा होऊन व्यवसायात येत नाहीत, यावर त्यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक अभ्यास करून व प्रयोगांमधून वासरांसाठी मातेच्या दुधाला अत्यंत कमी किमतीत पर्याय उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले. या पर्यायी दुधामुळे अनेक मादी वासरे जगली, वाढली. हा शोध दुग्धोत्पादक व शेतकऱ्यांना फायदेशीर ठरला. या पर्यायी दुधाला भारत सरकारचे एकस्वसुद्धा मिळाले. आपल्या देशातील अनेक पशू उत्पादक व दूधसंघांनी या पर्यायी दुधाचे महत्त्व जाणून त्याचा उपयोग घेण्यास सुरुवात केली. या पर्यायी दुधाच्या सेवनामुळे जगलेल्या मादी वासरांची नोंद एक लाख साठ हजारांच्या पुढे आहे.

       वाड्या-वस्त्यांवर जाऊन प्रत्येक घरांमधील पती-पत्नींसाठी दुग्ध व्यवसायाचे परिपूर्ण मार्गदर्शन शिबीर घेण्याची नवीन संकल्पना मांडून डॉ. प्रकाश पाटील यांनी  यशस्वी करून दाखवली. संपूर्ण कोल्हापूर जिल्हा व  परिसरामधील हजारो जोडप्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. डॉ. प्रकाश पाटील यांना मादी-वासरांच्या  संगोपनात मिळालेल्या अभूतपूर्व यशाची केंद्र सरकारच्या पशु-संवर्धन विभागाने दखल घेतली व त्यांना भारत सरकारच्या पशु-संवर्धन विभागाच्या सल्लागार समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्त केले गेले, तसेच म्हैस विकास आयोगाचे मुख्य सचिव हे मानाचे पदही लाभले. त्यांनी  पंढरपुरी जातीच्या म्हशीचा सर्वांगीण व सखोल अभ्यास केला व पंढरपुरी म्हैस कोणत्याही नैसर्गिक परिस्थितीमध्ये तग धरून उच्च दर्जाचे दुग्धोत्पादन देण्याचे सामर्थ्य असलेली म्हैस आहे, हे सर्व निरीक्षणांद्वारे सिद्ध केले. जानेवारी १९९४मध्ये खानकेन (थायलंड) येथे आयोजित केलेल्या प्रथम आशियाई म्हैस परिषदेसाठी डॉ. पाटील यांना आमंत्रित केले होते. त्यांनी या परिषदेमध्ये पंढरपुरी म्हशीचे गुणधर्म, वैशिष्ट्ये व ग्रामीण भागातील उपयुक्तता या दोन विषयांवर विशेष लेख सादर केले.

       पशुधनाचा विकास हे एकच ध्येय असल्यामुळे व त्याबाबत सातत्याने करत असलेल्या अभ्यासामुळे डॉ. पाटील यांना १९८६मध्ये अपासाला-स्वीडन येथे कृत्रिम रेतनाचे महत्त्व व त्याबाबतचे तांत्रिक ज्ञान आणि व्यवस्थापन या दोन महिन्यांच्या अभ्यासवर्गासाठी निमंत्रित केले होते. त्यांना १९९५मध्ये अमेरिकेमधील इलीनॉय-शिकागो येथे अत्याधुनिक पशुवैद्यकीय औषधे व तंत्रज्ञान तसेच प्रजनन क्षमता व संवर्धन यासाठीच्या अभ्यासवर्गाचे सदस्य म्हणूनही पाचारण केले होते.

       डॉ. पाटील यांच्या मादी-वासरांचे संगोपन व संवर्धन या ध्यासातून निर्माण झालेल्या दुभत्या जनावरांच्या दुग्धोत्पादनामधून प्रतिदिन गोकुळ संघाचे दीड लाख लीटर दुधाचे संकलन वाढले व शेतकऱ्यांच्या दारात  समृद्ध वंश जोपासण्याचे महत्त्वपूर्ण कार्य झाले. डॉ. पाटील यांना पुणे येथील ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान महाराष्ट्र या संस्थेचा डॉ.बी.व्ही. राव जीवनगौरव पुरस्कार २०१२मध्ये प्रदान केला.

       - मिलिंद कृष्णाजी देवल

पाटील, प्रकाश रंगराव