Skip to main content
x

पेंडसे, श्रीपाद नारायण

     श्रीपाद नारायण पेंडसे यांचा जन्म मुर्डी (जि.रत्नागिरी) येथे झाला. बी.एस्.सीपर्यंतचे शिक्षण मुंबईला पार पडले. मुंबईच्या बेस्टमध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. १९६८पासून निवृत्तीपर्यंत ते तेथेच कार्यरत होते. स्वातंत्र्योत्तर मराठी कादंबरीप्रांतातील एक महत्त्वाचे कादंबरीकार. फडके-खांडेकर-माडखोलकर या कादंबरीकारांनी मराठी कादंबरी लोकप्रिय आणि रसिकप्रिय करण्याचे महत्त्वाचे कार्य केले. साधारणतः १९२० ते १९४५ या पाव शतकात या कादंबरीकारांनी आपल्या प्रतिभेने मराठी वाचकांवर अधिराज्य गाजविले. पण हे अधिराज्य गाजवताना आणि कादंबरी या वाङ्मय प्रकाराला अपूर्व लोकप्रियता मिळवून देताना ह्या कादंबरीकारांनी कादंबरीला साचेबंदपणाच्या आणि कृत्रिमतेच्या चौकटीत नेऊन बसविले. प्रस्तुत दोन दोषांमध्ये ही कादंबरी अडकल्यामुळे आणि कलावादाच्या व जीवनवादाच्या चर्चेत तिची घुसमट झाल्यामुळे या काळातील कादंबरी निर्जीव आणि नि:सत्त्व होत गेली. या पार्श्वभूमीवर श्री.ना.पेंडसेंचे कादंबरीलेखन मराठी कादंबरीविश्वाला नव्या दिशा देणारे ठरले.

    मराठी कादंबरीविश्वात ‘प्रादेशिकता’ ही संकल्पना ठाशीवपणे समोर आली ती श्री.ना.पेंडसे यांच्या ‘एल्गार’ या पहिल्याच कादंबरीमुळे. १९२० ते १९४५ या काळातील मराठी कादंबरीचा एकूण परिघ आणि तिची आंतर्बाह्य प्रकृती लक्षात घेऊन आपली कादंबरी कशी असावी, यापेक्षा ती कशी नसावी; याची खूणगाठ त्यांनी आपल्या मनाशी बांधून ‘एल्गार’ची निर्मिती केली होती. त्यामुळे ही कादंबरी जाणकारांच्या-समीक्षकांच्या पसंतीस उतरली आणि या कादंबरीसोबतच मराठी प्रादेशिक कादंबरीची संकल्पनाही रूढ झाली.

     ‘एल्गार’पूर्वी ‘खडकावरील हिरवळ’ हे पेंडसेंचे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक १९४१मध्ये प्रसिद्ध झाले होते. पेंडसेंच्या कादंबरीलेखन प्रवासाच्या दृष्टीने विचार केला, तर ‘खडकावरील हिरवळ’ या पुस्तकाला विशेष महत्त्व द्यावे लागेल. कारण पेंडसेंनी पुढे ज्या कादंबर्‍या लिहिल्या, त्यांतील मध्यवर्ती व्यक्तिरेखा या पुस्तकातीलच आहेत. आपल्या अवती-भवतीच्या माणसांचा, त्यांच्या भावविश्वाचा सतत शोध घेत राहणे, ही मुळात पेंडसेंची प्रकृती असल्यामुळे त्यांच्या समग्र कादंबरीविश्वाचा आधार म्हणून ‘खडकावरील हिरवळ’ या पुस्तकाचे महत्त्व नाकारता येत नाही.

     १९४९मध्ये ‘एल्गार’ प्रकाशित झाली आणि त्यानंतर लागोपाठ सकस आणि सरस कादंबर्‍या लिहून पेंडसेंनी मराठी साहित्यविश्वात कादंबरीकार म्हणून आपली नाममुद्रा अधिक ठळक केली. ‘एल्गार’ (१९४९), ‘हद्दपार’ (१९५०), ‘गारंबीचा बापू’ (१९५२), ‘हत्या’ (१९५४), ‘यशोदा’ (१९५७), ‘कलंदर’ (१९५९), ‘रथचक्र’ (१९६२), ‘लव्हाळी’ (१९६६), ‘ऑक्टोपस’ (१९७२), ‘तुंबाडचे खोत’ (१९८७), ‘गारंबीची राधा’ (१९९३), ‘एक होती आजी’ (१९९५), ‘कामेरू’ (१९९७), ‘घागर रिकामी रे, रंगमाळी’ (२००२), ‘हाक आभाळाची’ (२००७) या कादंबर्‍या लिहून मराठीतील अग्रेसर कादंबरीकाराचा मान पटकावला.

     पेंडसेंच्या या कादंबरी विश्वाचा मूळ आधार आहे तो कोकणप्रांत. कोकणचा निसर्गरम्य परिसर, तिथल्या माणसांचे जगणे, तिथले दारिद्र्य, तिथल्या निसर्गाचा मानवी जीवनावर झालेला दूरगामी परिणाम, तिथल्या देव-दैवतांच्या संकल्पना आणि माणसांची मानसिकता यांचे अतूट नाते इत्यादी घटक या कादंबरी विश्वाचे मूलस्रोत आहेत. या मूलस्रोतांचा अधिक परिणामकारक उपयोग श्री.ना.पेंडसेंनी आपल्या कादंबरीलेखनात करून एक नवे, अनोखे विश्व उभे करण्याचे कार्य केले आहे. पेंडसेंच्या कादंबर्‍यांमधील हा निसर्ग वाचकांना झपाटून टाकणारा, त्यांच्यावर जणू चेटूक करणारा आहे, हे सिद्ध झालेले आहे. विशेषःत हे चेटूक ‘गारंबीचा बापू’ने अधिक अमीट स्वरूपाचे केलेले आहे.

    प्रादेशिकता हे कलाकृतीचे स्वायत्त मूल्य आहे का? वाङ्मयीन निकषांवर प्रादेशिकता ही संज्ञा कितपत टिकू शकते? इत्यादी प्रश्न पेंडसे यांच्या कादंबर्‍यांनी निर्माण केले. 

     कादंबरी लेखनासोबतच पेंडसेंनी नाट्यलेखनही केलेले आहे. पेंडसेंची बहुतेक नाटके त्यांच्याच कादंबर्‍यांवर आधारित आहेत. त्यांपैकी ‘राजेमास्तर’ (हद्दपार), ‘यशोदा’ (यशोदा), ‘गारंबीचा बापू’ (गारंबीचा बापू), ‘असं झालं आणि उजाडलं’ (लव्हाळी), ‘रथचक्र’ (रथचक्र) या नाटकांचा उल्लेख करता येईल. त्याशिवाय स्वतंत्र नाटके म्हणून ‘महापूर’, ‘चक्रव्यूह’, ‘संभूसांच्या चाळीत’, ‘शोनार बांगला’, ‘पंडित! आता तरी शहाणे व्हा!’, ‘डॉ.हुद्दार’ इत्यादी नाटकांचा उल्लेख करावा लागेल. पेंडसेंनी आपल्या कादंबर्‍यांची यशस्वी नाट्यरूपांतरे करून कलांतराचा सुंदर वस्तुपाठच वाचकांपुढे ठेवला, असे म्हणता येईल.

     कादंबरी लेखन आणि नाट्यलेखन ह्यांच्या सोबतच काही स्फुटलेखनही पेंडसेंनी केले. त्यात मुख्यतः कादंबरी आणि अवती-भवतीच्या माणसांचा, समाजाचा चिंतनाच्या पातळीवर शोध होता. ‘एक मुक्त संवाद- उद्याच्या कादंबरीकारांशी’, ‘अज्ञाताचा शोध’, ‘एक दुर्लभ स्नेह’, ‘बेस्ट उपक्रमाची कथा’ यांचा या संदर्भात विचार करता येईल. याशिवाय पेंडसेंनी ‘श्री.ना.पेंडसे: लेखक आणि माणूस’ हे आत्मचरित्रही लिहिले. प्रस्तुत आत्मचरित्र हा मराठी आत्मचरित्र वाङ्मयातील एक वेगळा प्रयोग होता. एक मित्र श्री.ना.पेंडसे यांचे चरित्र लिहितो आहे, या शैलीतील हे आत्मचरित्र अधिक तटस्थ आणि प्रांजळ अशा स्वरूपाचे झालेले आहे.

     व्यक्तिचित्रे, कादंबरी, नाटक, आत्मचरित्र, स्फुट अशा विविध स्वरूपाचे लेखन करताना पेंडसेंनी कथा (जुम्मन) आणि अनुवाद (प्रायश्चित्त: स्कार्लेट लेटर) याही प्रांतांत आपले पाऊल ठेवलेले आहे; पण हे सगळे करताना पेंडसेंच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख आणि त्यांचे वाङ्मयीन मोठेपण व्यक्त होते ते कादंबरी वाङ्मयातूनच!

     पेंडसे यांच्या कादंबर्‍यांचे अनुवादही भारतीय आणि जागतिक भाषांमध्ये झालेले आहेत. त्यांपैकी गुजरातीमध्ये ‘हद्दपार’, ‘गारंबीचा बापू’, ‘हत्या’, ‘कलंदर’, ‘रथचक्र’; हिंदीमध्ये ‘गारंबीचा बापू’, ‘रथचक्र’, ‘तेलगूत ‘जुम्मन’, ‘रामशरणची गोष्ट’; इंग्रजीत गारंबीचा बापू (Wild Bapoo of Garambi- भाषांतर : इएन रेसाईड, युनेस्को प्रकाशन) हद्दपार (Sky is the limit-भाषांतर: ज्ञानेश्वर नाडकर्णी; अप्रकाशित) या पुस्तकांचा उल्लेख करता येईल. त्यांच्या पुस्तकांना जे पुरस्कार प्राप्त झाले, त्यांचा उल्लेख पुढीलप्रमाणे करता येईल. नॅशनल लायब्ररी (नागपूर) पारितोषिक (एल्गार), महाराष्ट्र राज्य पुरस्कार (हद्दपार, हत्या, कलंदर, संभूसाच्या चाळीत, चक्रव्यूह) महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धा पुरस्कार (संभूसाच्या चाळीत), साहित्य  अकादमीचा पुरस्कार (रथचक्र), प्रियदर्शनी पुरस्कार (तुंबाडचे खोत) 

     श्री.ना.पेंडसे यांच्या एकूणच वाङ्मयीन कर्तृत्वाचा सन्मान करणारे बहुमानही त्यांना बहाल करण्यात आले आहेत. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार (१९९३), महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार (१९९६), अमेरिकेतील डॉ.लाभसेटवार प्रतिष्ठानचा लाभसेटवार साहित्य सन्मान पुरस्कार (१९९९) या मोठ्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी त्यांच्या वाङ्मयीन कर्तृत्वाचा सन्मान करण्यात आला. १९५५ मध्ये रॉकेफेलर फाउंडेशनची जगाच्या प्रवासासाठी ट्रॅव्हलिंग फेलोशिप त्यांना प्राप्त झाली होती.

     मित्रपरिवारात आणि कौटुंबिक वर्तुळात श्री.ना.पेंडसे शिरूभाऊ या नावाने ओळखले जायचे. त्यांच्या वाङ्मयीन कार्यकर्तृत्वाच्या संदर्भातही ‘श्री.ना.पेंडसे’ऐवजी ‘शिरूभाऊ’ हेच नाव अधिकतर रूढ झाले होते. 

     - डॉ. रवींद्र शोभणे

पेंडसे, श्रीपाद नारायण