Skip to main content
x

पिसुर्लेकर, पांडुरंग सखाराम

     पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांचा जन्म गोव्यातील पिसुर्ले येथे झाला. गोमंतकाची राजधानी पणजी येथील लिसेव या संस्थेत १९१३ साली त्यांचे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. १९१६मध्ये त्यांनी तीन वर्षाचे अध्यापकीय प्रशिक्षण घेतले. मोडी लिपीचे ज्ञान, तसेच संस्कृत, मराठी, कोंकणी या भाषांत अभ्यास असूनही त्यांचे संपूर्ण अध्ययन पोर्तुगीज भाषेतून झाले. त्याशिवाय इंग्लिश, फ्रेंच, लॅटिन याही पाश्चात्त्य भाषांत त्यांना उत्तम गती होती. त्यांनी १९१९पासूनच पोर्तुगीज शासनाच्या अभिलेखागारातील ऐतिहासिक कागदपत्रांचे पोर्तुगीज-मराठे संबंध या विषयाचा अभ्यास करण्याच्या जिज्ञासू बुद्धीने त्याचे वाचन करण्याची पोर्तुगीज शासनाकडून महत्प्रयासाने संमती मिळवून त्या संशोधनपर साधनांचा सूक्ष्म अभ्यास करण्याचे व्रत अंगीकारले. १९२०मध्ये कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांना १९५६मध्ये लिस्बन विद्यापीठाने डी.लिट.ची मानद पदवी देऊन सन्मानित केले. ते स्वतः कायदेतज्ज्ञ असल्याने त्या क्षेत्रात धनसंचय करण्याची उत्तम संधी असूनही, आरंभी डिचोली येथील प्राथमिक विद्यालयात पोर्तुगीज भाषा व गणित या विषयांचे ते अध्यापन करू लागले. त्यांनी सांखळी, वाळपई, जुने गोवे व नेरूल येथील विद्यालयात १९३१पर्यंत अध्यापन केले; तथापि दरम्यान त्यांच्या अविरत संशोधनपर कार्याची विद्वत्वर्गात प्रशंसा झाल्याने १९३१मध्ये शासनाने गोमंतकातील पोर्तुगीज-भारतीय ऐतिहासिक व इतर विषयांशी संबंधित असलेल्या अभिलेखागाराच्या प्रमुखपदी त्यांची नियुक्ती केली. तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर १९६१मध्ये ते त्या कार्यालयातील संचालकपदावरून निवृत्त झाले. त्यांना गोवामुक्तीनंतर १९६५मध्ये मुंबई विद्यापीठाने पणजी येथे स्थापन केलेल्या पदव्युत्तर अध्ययन व संशोधन केंद्राशी संलग्न असलेल्या इतिहास संशोधन केंद्राचे संचालकपद, तसेच इतिहास विषयाचे प्राध्यापकपद दिले. शिवाय त्यांना पीएच्.डी.साठीचे मार्गदर्शक शिक्षकपदही दिले गेले. पिसुर्लेकरांनी त्या सेवेच्या काळात पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकत्यातील सुप्रसिद्ध इतिहासकार तसेच मराठ्यांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉ. सुरेंद्रनाथ सेन यांच्या मार्गदर्शनानुसार अभिलेखागारातील अत्यंत दुरवस्थेत असलेल्या सहस्रावधी अभ्याससाधनांच्या नोंद विभागात सुधारणा केलीच, शिवाय त्यातील मराठी, कानडी व फार्सी कागदपत्रेही खंडवार लावल्यानंतर त्याविषयीची एक सूची व दोन मार्गदर्शनपर पुस्तिकाही प्रकाशित करून संबंधित अभ्यासकांसाठी सोय केली.

      १९५१मध्ये लोवे अभिलेखागाराचे जे ठीकठाक स्वरूप होते, त्याचे श्रेय पोर्तुगीज शासकांनी पिसुर्लेकरांनाच दिले. पोर्तुगेज - मराठे संबंध’ (१९६७) या त्यांच्या अजोड ग्रंथातील पहिले व्याख्यान वाचले, तरी त्यांच्या अध्ययनातील अभ्याससाधनांची व्याप्ती किती विशाल होती, याविषयीचा कयास करता येतो. त्यांनी मराठ्यांच्या इतिहासासंबंधी चार तपे केलेला अभ्यास सादर करणारा हा त्यांचा मराठीतील पहिला व शेवटचा ग्रंथ लिहिण्यापूर्वी, रक्तदाबाने अस्वस्थ असूनही पुणे विद्यापीठाचे कुलगुरू महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांच्या आग्रहावरून १९६३मध्ये त्या विषयावर नरसिंह चिंतामण केळकर स्मारक व्याख्यानमालांतर्गत सात व्याख्याने दिली होती. आपले एकही विधान निराधार असू नये, हा खऱ्या संशोधकाला शोभणारा बाणा पिसुर्लेकर यांनी तंतोतंत पाळला आहे. या ग्रंथातील पानोपानी भरलेल्या तळटिपा याची साक्ष देतील अशी ग्वाही, तसेच पोर्तुगेज - मराठे संबंधया विषयावर असा भरघोस आणि साधार ग्रंथ आजवर कोणत्याही भाषेत झालेला नाही, असा या ग्रंथाविषयीचा अभिप्राय भारत इतिहास संशोधन मंडळाचे कार्याध्यक्ष असलेल्या कुलगुरू पोतदारांनी दिला होता. यावरून पिसुर्लेकरांच्या परिश्रमपूर्वक संशोधनाचे फलित स्पष्ट होते. सर जदुनाथ सरकार तर पिसुर्लेकरांचे Friend, Philosopher & guideच होते. पिसुर्लेकरांना इतिहासाचार्य राजवाडे यांचे जीवन स्फूर्तिप्रद वाटत असे. त्यांनी तत्पूर्वी इतिहासशास्त्राच्या आधारे पोर्तुगीज भाषेत पोर्तुगेज अ मराताज’, ‘आन्तिगल्यशवगैरे पुस्तके लिहिली होती. सर जदुनाथ सरकार, डॉ. सुरेंद्रनाथ सेन, डॉ. बाळकृष्ण, रियातसतकार गो.स. सरदेसाई, दत्तोपंत आपटे, प्रा. एस.आर. शर्मा, लंडन विद्यापीठाचे डॉ. सी.आर. बॉक्सर, डॉ. मोरायस, य.न. केळकर अशा अनेक इतिहासकरांनी त्या संदर्भसाधनांचा उपयोग केला होता, यावरून पिसुर्लेकरांच्या लेखनाचे मूल्य ध्यानात येते. पिसुर्लेकरांनी काही ठिकाणी तर सरकारांचेही निष्कर्ष कसे चुकीचे होते, यावरही प्रकाशझोत टाकला आहे.

     पिसुर्लेकरांच्या या संशोधनपर लेखनामुळे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील व विसाव्या शतकातील पहिल्या तीन दशकांत विद्वत्वर्तुळात सुपरिचित झालेल्या रावबहादुर  का.ना. साने, वासुदेवशास्त्री खरे, इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे, रावबहादुर द.ब. पारसनीस या ज्येष्ठ संशोधकांच्या प्रभावळीत डॉ. पिसुर्लेकर यांचेही नाव घेतले जाऊ लागले.

     पुढे प्रा. दामोदर धर्मानंद कोसंबी आणि प्रा. अ.का. प्रियोळकर या ऋषितुल्य संशोधकांशी ते अधिक परिचित झाले. पिसुर्लेकरांनी पोर्तुगीज भाषेत ८२, मराठीत २८, इंग्रजीत १० व फ्रेंचमध्ये दोन लेख व शोधनिबंध लिहिले. अभ्यासकांना त्यांच्या पुढील ग्रंथांचे विशेष मूल्य वाटते : अ आन्तिग् ईन्दीय ई ऊ मून्दू इश्तेर्नु’ (१९२२), ‘आश्पेंक्तुश दा सिव्हिलिझासांव् दा ईन्दीय आन्तिग’ (१९२४), ‘पुर्तुगेझिश् ई मारातश्’ (१९२६-३९), ‘रेजिमेन्तुश दुश् फोर्तालेझश् दा ईन्दीय्’ (१९५१), ‘आजेंन्तिश् दा दिप्लोमासीय पुर्तुगेझ ना ईन्दीय्’ (१९५२), ‘आस्सेन्तुश् दु कोंसेल्यु दू इश्तादु दा ईन्दीय’ (१९५३-५७). त्यांनी कृष्णसंप्रदाय इसवी सनाआधीपासून प्रचलित होता, असे अ आनितगिदादि दु क्रिश्‍नाईज्मुया त्यांच्या रचनेत सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. पिसुर्लेकरांनी कागदपत्रांची काळजीपूर्वक केलेली निवड आणि त्यांच्या आधारे केलेले संशोधन व संपादन जे. एच. कुञ्ज-रिव्हार तसेच ब्रागांज परेरा यांच्या ग्रंथापेक्षा मौलिक स्वरूपाचे आणि निर्दोष बनले आहे, असा अभिप्राय आंग्ल इतिहासकार सी.आर. बॉक्सर यांनी व्यक्त केला आहे.

     पिसुर्लेकरांनी गोव्यातील शिलालेख, ताम्रपट व नाणी यांचाही संग्रह केला. दुर्मीळ कागदपत्रांच्या सूक्ष्मपट्टिकाही (मायक्रोफिल्म) संग्रहित केल्या. सतराव्या व अठराव्या शतकांतील काही मराठी कागदपत्रांचे दोन-तीन सटीप भाग प्रकाशित करण्याची त्यांची तीव्र मनीषा होती. अशा या कार्यमग्न इतिहासकारांना मानसन्मानही तितक्याच तोलामोलाचे मिळाले. पिसुर्लेकरांना पोर्तुगाल शासनाने १९३५मध्ये ‘Knight of Military order of Santiago’ हा पुरस्कार अर्पण केला. त्यांना १९५२मध्ये पुन्हा ‘Kinght Offficer’ हा पहिल्याहून अधिक वरच्या स्तरावरचा बहुमान देण्यात आला. १९४८मध्ये कोलकत्यातील रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेने मध्ययुगीन इतिहास लेखनासाठी ठेवलेले सर जदुनाथ सरकार सुवर्णपदक दिले, तर एशियाटिक सोसायटी ऑफ बाँबेने १९५३मध्ये कॉम्पबेल स्मृतिप्रीत्यर्थ सुवर्णपदक दिले. त्यांनी भारतीय इतिहासाच्या संशोधनाचे जे अव्याहत व्रत अंगीकारले होते, त्यासाठीची कृतज्ञता म्हणून बृहन्महाराष्ट्र मंडळाकरवी १९६९मध्ये सुवर्णपदक देऊन त्यांना गौरवण्यात आले. वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी कर्करोगाने त्यांचे निधन झाले.

    - संपादित

पिसुर्लेकर, पांडुरंग सखाराम