Skip to main content
x

पंडित, जसराज

जसराज

पंडित जसराज यांचा जन्म हरियाणा राज्यातील हिस्सार जिल्ह्यामध्ये, पिली मंडोरी येथे झाला. त्यांचे वडील पं. मोतीरामजी आणि काका पं. ज्योतिरामजी हे दोघेही गायक होते. पंडितजींना आणि त्यांच्या आठही भावंडांना वारशाने संगीतकला प्राप्त झाली. त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षीच पितृछत्र हरपले. पंडित जसराज यांनी जगविख्यात गायक म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली तरी सुरुवातीची चौदा वर्षे त्यांनी प्रतापनारायणजी म्हणजे आपल्या बंधूंकडे तबलावादनाचे धडे गिरवले.

तबलावादनातील त्यांच्या कौशल्यामुळे मोठे बंधू पं. मणिरामजी यांच्या सोबत ते साथीला जात असत. अशातच एका कार्यक्रमादरम्यान त्यांना दुय्यम वागणूक मिळाली आणि या घटनेने इतिहास घडवला. पंडितजींनी तबलावादन सोडून गायक होण्याचा निर्धार केला.  आणि पं. मणिरामजींकडून हिंदुस्थानी रागसंगीताची तालीम घेण्यास प्रारंभ केला. त्यांच्याकडून उ. घग्गे नझीर खाँ साहेब यांनी स्थापन केलेल्या मेवाती घराण्याचे संस्कार तर जसराजजींना मिळालेच; पण अनेक रागरागिण्या आणि बंदिशींचा खजिनाही मिळाला.

पंडितजींनी आग्र घराण्याच्या स्वामी वल्लभदास यांच्याकडून थोड्या कालावधीसाठी संगीताचे शिक्षण घेतले. साणंद येथील महाराजा जयवंतसिंहजी वाघेला यांच्याकडून पंडितजींवर संगीताचे संस्कार झाले, तसेच आध्यात्मिक संस्कारही खोलवर रुजले. त्यांना संगीताकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळाली. सुरुवातीच्या शालेय शिक्षणानंतर त्यांना सोम तिवारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कालांतराने त्यांनी श्याम मनोहर  गोस्वामी यांच्याकडून हवेली संगीताचे शिक्षण घेतले.

पंडितजींनी वयाच्या एकविसाव्या वर्षी म्हणजे १९५१ साली कलकत्ता आकाशवाणी केंद्रामध्ये सर्वप्रथम पंधरा मिनिटे मुलतानी राग सादर केला. त्यांनी पहिला जाहीर कार्यक्रम २० जून १९५२ रोजी काठमांडू येथे केला. या कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद आणि नेपाळच्या राजाने पाच हजार मोहरा देऊन केलेले कौतुक यांमुळे कलोपासना आणि चरितार्थाकरिता केवळ संगीत हेच माध्यम निश्चित झाले. आणि पुढे हिंदुस्थानी रागसंगीतातील क्षेत्रात त्यांनी अढळपद प्राप्त केले.

लयकारीयुक्त आलाप, सरगम, मींड, गमक यांच्या आधारे रागाची लालित्यपूर्ण बढत, बंदिशींचे सुस्पष्ट शब्दोच्चार, तीनही सप्तकांत लीलया विहार करणारा भावपूर्ण स्वर या मेवाती घराण्याच्या वैशिष्ट्यांना पंडितजींनी स्वत:च्या खास शैलीने आणि प्रतिभेने उच्च दर्जा प्राप्त करून दिला.

पंडितजींचे वास्तव्य अनेक ठिकाणी असल्यामुळे त्यांना हिंदी, मराठी, गुजराती, मारवाडी, तेलुगू, बंगाली, इंग्रजी अशा अनेक भाषा अवगत झाल्या. मुंबई येथील कंठसंगीताला असलेले महत्त्व लक्षात घेऊन ते मुंबईला स्थायिक झाले. अनेक भाषांचे ज्ञान आणि उपजत असलेल्या काव्यरसग्रहणाच्या गुणामुळे आजपर्यंत शंभराहून अधिक बंदिशींची रचना त्यांनी केली. त्यांनी रचना केलेल्या बंदिशींपैकी ‘तुम पर वारी जाऊँ मैं’ (रामकली), ‘मेरी अंखियन की’(गुजरी तोडी), ‘तुम बिन कैसे कटे रतियाँ’ (जोग), ‘अब ना मोहे समझाओ तुम’ (बैरागी), ‘बरखा ॠतु आई’ (धुलिया-मल्हार), ‘जब से छब देखी’ (नटनारायण) अशा काही बंदिशी अतिशय रसिकप्रिय आहेत. मधुरा भक्तिरसपूर्ण अशा रचनांमुळे त्यांना ‘आचार्य जियालाल वसंत वाग्ग्येयकार’ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांनी हवेली संगीतातही अनेक रचना केल्या. पंडितजी मैफलींमधून पारंपरिक बंदिशींप्रमाणेच काही वेळा आदिशंकराचार्य, वल्लभाचार्य, चैतन्य महाप्रभू यांच्या संस्कृत रचनांचा समावेश करत असत.

पंडित जसराज यांनी १९६० साली झालेल्या पहिल्या आकाशवाणी संगीत संमेलनात आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. पंडितजींचा १९६२ साली चित्रपटसृष्टीतील दिग्गज निर्माता-दिग्दर्शक चित्रपती व्ही. शांताराम यांची कन्या मधुरा यांच्याशी विवाह झाला.

देशविदेशांत कार्यक्रम करत असताना हिंदुस्थानी संगीताच्या व्यासंगातून आणि साधनेतून ‘जसरंगी जुगलबंदी’ या अनोख्या जुगलबंदीचा परिचय जसराजजींनी संगीतप्रेमींना करून दिला. शास्त्रीय संगीतातील ‘मूर्च्छना’ या तत्त्वावर आधारित या जुगलबंदीमध्ये स्त्री आणि पुरुष गायकांनी आपले सूर जुळवून घेण्याऐवजी आपापल्या नैसर्गिक सुरांमध्ये षड्ज-मध्यम वा षड्ज-पंचम संवादाच्या आधारे रागगायन करून जुगलबंदी सादर करावयाची असते.

सवाई गंधर्व, तानसेन फेस्टिव्हल, श्री हरिदास संगीत महोत्सव, तसेच वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हैदराबाद इथे होणारा पं. मोतीराम संगीत महोत्सव या आणि अशा अनेक संगीत महोत्सवांमध्ये पं. जसराज यांचे गायन आवर्जून होत असे. अशा काही मैफलींचे ध्वनिमुद्रण ध्वनिमुद्रिकांच्या रूपात आजही आपल्याला ऐकायला मिळते. मारवा, शंकरा, देस, भटीयार, मधमाद सारंग, बागेश्वरी, धुलिया मल्हार, दरबारी कानडा, बैरागी भैरव(म्यूझिक टुडे), बिहागडा गौड गौरी-मल्हार(सोनी) याशिवाय ‘महेश्वर मंत्र’, ‘इन्स्पिरेशन’, ‘दरबार’, ‘तपस्या’, ‘उपासना’ अशा ध्वनिमुद्रिकाही उपलब्ध आहेत.

पंडित जसराज यांना मिळालेला कलेचा वारसा त्यांचा मुलगा शारंगदेव (संगीतकार) आणि दुर्गा जसराज (दूरदर्शन कलाकार) यांनाही मिळाला आहे. त्याचप्रमाणे मेवाती घराण्याचा वारसा त्यांचे अनेक यशस्वी वादक-गायक शिष्यगण पुढे नेत आहेत. संजीव अभ्यंकर, रतन मोहन शर्मा, श्वेता झव्हेरी, कृष्णकांत पारिख, साधना सरगम (घाणेकर), पद्मजा फेणाणी-जोगळेकर, सौगत बॅनर्जी, गिरीश वझलवार, चंद्रशेखर स्वामी तसेच डॉ. अरविंद थत्ते (हार्मोनिअम) व कला रामनाथ (व्हायोलिन) या शिष्यांचा विशेष नामोल्लेख करावा लागतो.

केवळ भारतातच नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही जसराज यांनी हिंदुस्थानी संगीताचा प्रसार केला. १९९० साली त्यांनी कॅनडामधील व्हँकुव्हर येथे पं. जसराज स्कूल ऑफ म्यूझिक फाउण्डेशनची संकल्पना प्रथम प्रत्यक्षात आणली. अमेरिकेत अ‍ॅटलांटा व न्यू जर्सीमध्ये टँपा येथील त्यांच्या संगीतशाळांमध्ये संगीतशिक्षणाचे कामही ते अखेरपर्यंत करत होते. या कामामध्ये जसराज यांच्या शिष्यांचाही मोठा वाटा आहे.

जसराज यांनी १९६६ साली वसंत देसाई यांनी संगीत दिलेल्या ‘लड़की सह्याद्री की’ या चित्रपटासाठी पार्श्वगायन केले. याशिवाय ‘बिरबल माय ब्रदर’ (संगीत : शाम प्रभाकर), ‘१९२०’ (संगीत : अदनान सामी) या चित्रपटांत, तसेच स्वत: जसराज यांच्या पत्नीने दिग्दर्शित केलेल्या ‘आई तुझा आशीर्वाद’ (संगीत : मयुरेश पै) या मराठी चित्रपटामध्ये पार्श्वगायन केले.

पं. जसराज यांनी मेवाती घराण्याची वैशिष्ट्ये गायकीमध्ये साकारताना तीव्र ग्रहणशक्तीने आणि सखोल स्वरविचारांनी प्रत्येक रागाच्या विस्ताराला, रागाच्या अभिव्यक्तीला वलयांकित केले. सहजसुंदर मृदू आवाजाने अधिक समृद्ध केले. पंडितजी मैफलीची सुरुवात ‘ओम अनंता हरी नारायण’ या श्लोकाने करत. ज्या रागाचे सादरीकरण होणार आहे त्या रागामध्ये बांधलेला हा श्लोक त्या रागाचे संपूर्ण चित्र ऐकणार्‍यांच्या मनांत उभे करत असे. प्रत्येक रागातील स्वरांचे परस्परबंध, त्या रागातील सुरांविषयी विचारधारा अत्यंत घुमारदार, सहजस्वरांत श्रोत्यांच्या मनांपर्यंत पोहोचवण्याचे कसब जसराज यांच्या गायकीमध्ये होते.

अन्य सांगीतिक घराण्यांतील समकालीन मातब्बर गायक-गायिकांमध्ये पंडित जसराज यांनी स्वत:चे स्थान निर्माण केले . हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील व्यापक अशा योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. हरियाणा सरकारने त्यांना ‘संगीत मार्तंड’, बंगाल सरकारने ‘सुरेर गुरू’, मध्यप्रदेश सरकारने ‘संगीत कला रत्न’, तर उत्तर प्रदेश सरकारने ‘स्वामी हरिदास संगीत रत्न’ अशा उपाधींनी त्यांना गौरवले .

याशिवाय अतिशय महत्त्वाचे असे ‘पद्मश्री’ (१९७५), ‘पद्मभूषण’ (१९९०), ‘पद्मविभूषण’ (२०००), ‘संगीत नाटक अकॅडमी’पुरस्कार (१९८७), ‘राजीव गांधी’ पुरस्कार, ‘कालिदास सन्मान’ (१९९७-९८), ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार, ‘पं. दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार, ‘उ. हाफीज अली खाँ’ पुरस्कार, ‘स्वाती संगीत पुरस्कारम्’ (२००८), ‘जायंट्स इंटरनॅशनल’ अवॉर्ड, ‘अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्टिस्ट’ अवॉर्ड, ‘डिस्टिंग्विश्ड व्हिजिटर’ अवॉर्ड हे पुरस्कार त्यांना मिळाले.

पंडित जसराज यांच्या पत्नी मधुरा जसराज यांनी २००९ साली पंडितजींचा जीवनप्रवास उलगडून दाखवणार्‍या ‘संगीत मार्तंड पंडित जसराज’ या लघुपटाची निर्मिती केली. वयाच्या नव्वदाव्या वर्षी न्यू जर्सी येथे पं. जसराज यांचे निधन झाले.

नेहा वैशंपायन

संदर्भ
१. ‘संगीत कला विहार’, पद्मविभूषण विशेषांक.
२. संकेतस्थळ : ुुु.रिविळींक्षरीीरक्ष.लिा
पंडित, जसराज