पंडित, वामन शंकर
व्यक्तिचित्रणकलेत विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात सुप्रसिद्ध पाश्चिमात्य चित्रकार फिलीप डी.लाझेलो व जॉन सिंगर सार्जंट यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन व सहवास लाभलेले वामन शंकर पंडित हे तत्कालीन संस्थानिकांसाठी व्यक्तिचित्रण करणारे मराठी चित्रकार आजच्या कलाजगताला अज्ञात आहेत.
वामन शंकर पंडित यांचा जन्म अहमदनगर येथे झाला. वडील रावबहादूर शंकर पांडुरंग पंडित (१८४०-१८९४) हे वेदांचे व संस्कृतसह अठरा भाषांचे जाणकार होते. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे निबंधक, पौर्वात्य भाषांचे अनुवादक (ओरिएन्टल ट्रान्सलेटर) आणि पोरबंदर संस्थानाचे दिवाण म्हणूनही काम पाहिले. त्यांचा स्वामी विवेकानंदांशी परिचय होता व विवेकानंद दोन वेळा पोरबंदरला शंकर पंडितांकडे वास्तव्यास होते. एकदा तर विवेकानंदांचा मुक्काम अकरा महिने होता व या काळात त्यांच्या वेदांवर चर्चा होत असत. याच काळात स्वामी विवेकानंद पंडितांकडून फ्रेंच भाषा शिकले. त्या वेळी त्यांचा चित्रकलेची आवड असलेल्या किशोरवयीन वामन पंडितांना सहवास लाभला. रावबहादूर शंकर पंडितांचे निधन १८९४ मध्ये झाले व १८९५ मध्ये त्यांचे कुटुंब राजकोटला स्थलांतरित झाले.
वामन यांनी चारकोलमध्ये वास्तववादी शैलीत व्यक्तिचित्रण करण्यात चांगलेच प्रावीण्य मिळवले होते. परदेशी जाऊन चित्रकलेचे व विशेषत: व्यक्तिचित्रण- कलेचे शिक्षण घेण्याची त्यांची इच्छा होती; परंतु चित्रकला शिक्षणाला सुखवस्तू व सुशिक्षित कुटुंबात प्रतिष्ठा नव्हती. शिवाय वडिलांनी मृत्युपत्रात ‘त्यांच्या मुलांनी परदेशी जाऊन शिक्षण घेऊ नये’, असेही लिहिले होते. त्यामुळे वामन पंडित यांची बरीच कुचंबणा झाली. शेवटी यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी आपल्या वडिलांचे मित्र व बडोद्याचे संस्थानिक सयाजीराव गायकवाड यांची भेट घेतली, त्यांना आपली चित्रे दाखवली व वडिलांच्या मृत्युपत्रामुळे आपली होत असलेली कुचंबणा सांगून चित्रकलेच्या शिक्षणासाठी अर्थसाहाय्य करण्याची विनंती केली. त्याला प्रतिसाद देत सयाजीराव गायकवाडांनी त्यांना लंडन येथे जाऊन चित्रकलेचे शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली; पण त्यातून सर्व खर्च भागणे शक्य नव्हते. अखेरीस मृत्युपत्राची कार्यवाही करणाऱ्या काकांनी, सीताराम पंडितांनी यातून मार्ग काढला. कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी वामन पंडितांना वडिलांच्या मालमत्तेतून पैसे दिले व त्या सोबतच परदेशी जाण्यास परवानगीही दिली. त्यामुळे १९०० मध्ये पंडित लंडनला रवाना झाले व कायद्याचे शिक्षण घेऊ लागले.
लंडनमध्ये आपल्या नूतन पत्नीसह मधुचंद्रासाठी आलेले प्रसिद्ध युरोपियन चित्रकार फिलीप डी.लाझेलो (१८६९-१९३७) यांच्याशी १९०१ मध्ये पंडित यांची भेट झाली. त्यांना या तरुणाचा लाघवी स्वभाव व व्यक्तिमत्त्व आवडले आणि कायद्याचा अभ्यास करत असूनही पंडितांची व्यक्तिचित्रणकलेबद्दलची ओढ व ध्यास बघून पंडितांना व्हिएन्ना येथे त्यांच्यासोबत काम करण्यासाठी त्यांनी आमंत्रित केले. पंडितांनी १९०० ते १९०२ या काळात कायद्याचा अभ्यास संपवला. त्यांना १९०३ मध्ये सनद मिळाली पण वकिली करण्याऐवजी त्यांनी आपल्या कलेच्या आवडीला न्याय देण्याचे ठरवले व ते व्हिएन्ना येथे लाझेलो यांच्या आमंत्रणानुसार पोहोचले. त्यानंतर त्यांनी वर्षभर युरोपमधील राजघराण्यातील व्यक्तींची चित्रे रंगविणाऱ्या लाझेलो यांच्या सोबत पेंटिंगचा अभ्यास केला. त्यांनी १९०४ पासून ड्रेस्डेन, व्हेनिस, फ्रान्स व हंगेरी या देशांतील कलासंग्रह बघितले. या कलासंग्रहातील चित्रांच्या प्रतिकृती केल्या.
या सर्व काळात त्यांना लाझेलो यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. लाझेलोंनी पंडितांचे भारतीय राजपुत्राच्या वेशातील व्यक्तिचित्रही रंगविले. पंडितांनी १९०७ मध्ये लंडनला परतून रॉयल अकॅडमीत प्रवेश घेतला व ते जॉन सिंगर सार्जंट या त्या काळातील अत्यंत लोकप्रिय चित्रकाराच्या सहवासात शिकू लागले. तत्कालीन ब्रिटनमध्ये व ब्रिटिश साम्राज्यात अकॅडमिक पद्धतीच्या व्यक्तिचित्रणकलेबद्दल समाजाच्या सर्वच थरांत आकर्षण होते. पंडितांनी या विषयाचा कसून अभ्यास केला व ते आयुष्यभर त्याच पद्धतीच्या कामात रमले. त्यांच्या चित्रनिर्मितीवर रॉयल अकॅडमीच्या चित्रशैलीचा, तसेच लाझेलो व सार्जंट यांचाही प्रभाव आढळतो.
वामन पंडित १९१० मध्ये भारतात परतले व व्यावसायिक व्यक्तिचित्रणकलेचा व्यवसाय करू लागले. त्या काळातील अनेक भारतीय संस्थानिकांसाठी त्यांनी राजघराण्यातील व्यक्तींची व्यक्तिचित्रे रंगविली. याशिवाय सर कावसजी जहांगीर, सर दोराब टाटा अशा श्रीमान व्यक्तींनीही त्यांना व्यक्तिचित्रण करण्यासाठी आमंत्रित केले. त्यांनी रंगविलेल्या राजघराण्यातील व्यक्तिचित्रांत बडोद्याचे सयाजीराव गायकवाड, ग्वाल्हेरचे राजे, जुनागडचे नबाब, इंदूरचे तुकोजीराव होळकर, काश्मीरचे राजा हरिसिंग, म्हैसूरचे वाडियार, तसेच कुचबिहारच्या संस्थानिकांचा समावेश होता.
इतक्या संस्थानांतून खास व्यक्तिचित्रणासाठी आमंत्रित केले गेलेले चित्रकार म्हणून राजा रविवर्मा यांच्यानंतर वामन शंकर पंडित यांचेच नाव घ्यावे लागेल. याशिवाय त्यांचे महाराष्ट्रातील काही उच्चपदस्थांशी, संस्थानिकांशी नातेसंबंधही होते. त्यांनी रंगविलेल्या व्यक्तिचित्रांची संख्या ५० पेक्षा जास्त असून त्यांनी १९२० पर्यंत व्यक्तिचित्रणाचा व्यवसाय केला. चंद्रकला मुळगावकर यांच्याशी १९२० मध्ये त्यांचा विवाह झाला. पंडितांच्या घरची सांपत्तिक स्थिती उत्तम होती. त्यांचे वास्तव्य राजकोट येथील भव्य राजेशाही घरात होते व राहणी संस्थानिकांसारखीच होती. या पार्श्वभूमीवर १९२० नंतर त्यांनी चित्रकलेचा व्यवसाय बंद करून संपूर्ण वेळ कुटुंबासाठी दिला. ते कधीतरी स्वत:च्या आनंदासाठी चित्रनिर्मिती करीत. पण त्या सोबतच ते शिकार, घोडेस्वारी, बॅडमिंटन किंवा पोलोसारख्या खेळात रमत. त्यांचे १९४१ मध्ये वयाच्या एकोणसाठाव्या वर्षी मुंबईत निधन झाले.
तत्कालीन कलाजगतात व आजच्या कलाजगतातही वामन शंकर पंडित हे नाव फारसे ज्ञात नाही. त्यांची कलावंत म्हणून कारकीर्द १९०० ते १९२० अशी अवघ्या वीस वर्षांचीच होती. त्यांतील दहा वर्षे ते युरोपमध्येच होते. ते १९१० मध्ये भारतात परतल्यावरही सामाजिकदृष्ट्या उच्च व श्रीमंत वर्तुळात, तसेच संस्थानिकांत वावरले. त्यांचे वास्तव्यही महाराष्ट्रापासून दूर, राजकोटमध्ये राहिले.
त्यांची चारकोल व तैलरंगातील अनेक व्यक्तिचित्रे १९४१ मधील त्यांच्या मृत्यूनंतर राजकोटमध्ये पडून होती. आपल्या या आजोबांना न बघितलेल्या जय भांडारकर यांना ती ७० वर्षांनंतर मिळाली. त्यानंतर कलासमीक्षक जस्मीन शहा वर्मा यांनी ‘पोट्रेट ऑफ अॅन अनसंग आर्टिस्ट’ हा लेख ‘टाइम्स ऑफ इंडिया’त लिहिला. पंडित यांच्या कलाकारकिर्दीवर प्रकाश टाकणारे ‘अ रॉयल पॅलेट’ (१८८२-१९४१) हे पुस्तक २०१० मध्ये प्रकाशित झाले.
पंडित यांची बरीचशी चित्रे राजघराण्यांतील खाजगी संग्रहांत आहेत. पण उपलब्ध चित्रांवरून असे लक्षात येते, की कार्यरत असताना त्या काळातील समाजाच्या उच्च वर्गाच्या अभिरुचीचाच त्यांच्यावर प्रभाव होता. त्यापलीकडे त्यांनी विचार केल्याचे दिसत नाही. ते एक निष्ठावान व्यावसायिक होते व त्यांना दैनंदिनी लिहिण्याची सवय होती. त्यात ते रंगवीत असलेल्या व्यक्तींची नावे व त्या कामापोटी मिळालेल्या पैशांचा तपशील ठेवीत असत. त्यावरून असे दिसून येते, की १९१० ते १९२० या काळात ते पूर्णाकृती तैलचित्र रंगविण्यासाठी पंचवीस हजार रुपये घेत असत. त्या काळाचा विचार करता ही रक्कम प्रचंड होती. राजा रविवर्माप्रमाणे त्यांनी फक्त श्रीमान कुटुंबे व राजघराण्यांसाठी काम केले. पण रविवर्मांप्रमाणे किंवा रॉयल अकॅडमीतील चित्रकारांप्रमाणे पंडितांनी कधीही धार्मिक, ऐतिहासिक विषयांवर किंवा आबालाल रहिमान व धुरंधर यांच्याप्रमाणे स्वान्त:सुखाय कलानिर्मिती केली नाही. पंडित विसाव्या शतकाच्या सुरुवातीस बंगालमध्ये व त्यानंतर काही काळातच १९१९ च्या सुमारास मुंबईत सुरू झालेल्या ‘कलेतील भारतीयत्वाच्या’ कलाचळवळीपासून फटकून राहिले. परिणामी कलाजगताने त्यांची दखल घेतली नाही व ते सर्वसामान्य कलारसिकांनाही अज्ञातच राहिले.
- सुहास बहुळकर