Skip to main content
x

परांजपे, रवी कृष्णाजी

              जाहिरातक्षेत्रात आणि अभिजात चित्रकलेच्या क्षेत्रात स्वतंत्र स्थान निर्माण करणारे रवी कृष्णाजी परांजपे यांचा जन्म बेळगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कृष्णाजी रामचंद्र परांजपे व त्यांच्या आईचे नाव राधाबाई होते. त्यांचे शालेय शिक्षण बेळगाव येथे बेनन स्मिथ हायस्कूलमध्ये झाले. परांजपे यांच्या घरातच सुसंस्कृत व कलासक्त वातावरण होते. वडिलांना चित्रकलेची आवड होती, तर आई संगीत व कशिदाकाम यांत रमलेली असे. साहजिकच चित्रकला व संगीत यांचे संस्कार त्यांच्यावर लहानपणासूनच झाले. घरातील या संस्कारांबरोबरच बेळगावच्या निसर्गसंपन्नतेचा दृश्यसंस्कारही त्यांच्या कलासक्त मनावर झाला.

             लहानपणी जडलेल्या श्‍वसनविकारामुळे त्यांचे संगीतकलेचे दालन बंद झाले. याच दरम्यान वडिलांनी साठवलेल्या दिग्गज चित्रकारांच्या मुद्रित चित्रांचा संग्रह पाहताना त्यांची चित्रकलेची प्रेरणा अधिक तीव्र झाली व ते रंग-रेषांच्या अद्भुत दुनियेकडे आकृष्ट झाले. त्यांच्या मनात रुजलेल्या सांगीतिक जाणिवा रंग-रेषांच्या माध्यमातून प्रवाही होत गेल्या, म्हणूनच ते ‘स्वत:चे चित्र म्हणजे दृश्यसंगीत आहे’ अशा भूमिकेतून कार्यरत राहिले आहेत.

             चित्रकलेची आवड लक्षात घेऊन त्यांच्या वडिलांनी आपले विद्यार्थी पवार, के.बी. कुलकर्णी, आजगावकर यांनी बेळगावात सुरू केलेल्या ‘कलानिकेतन’ या संस्थेत रवी परांजपे यांचे कलाशिक्षण १९५० मध्ये सुरू केले. ‘पेन्सिलीला टोक कसे करावे, यावरून तुमचे पेन्सिलीवरील व रेखांकनावरील प्रेम लक्षात येते’, असा पवार सरांनी मौलिक धडा दिला, तर के.बी. कुलकर्णी यांच्या जलरंग निसर्गचित्रणातील तरलता त्यांच्या मनावर परिणाम करून गेली.

             ते १९५२ मध्ये शालान्त परीक्षा उत्तीर्ण होऊन के.बी. कुलकर्णी यांच्या चित्रमंदिर संस्थेत दाखल झाले. स्वत: के.बी. सरांची प्रात्यक्षिके, त्यांची चित्रनिर्मिती व प्रयोग याच बरोबरीने त्यांच्याशी चित्रकलेतील विविध विषयांवर होणार्‍या चर्चा यांतून ते खूप काही शिकले. चित्रमंदिरातील त्या वेळचे वातावरण एका कुटुंबाप्रमाणेच होते.

             रवी परांजपे यांनी १९५७ मध्ये डी.टी.सी. ड्रॉइंग टीचर्स सर्टिफिकेट व १९५८ साली रेखा व रंगकला विषयातील पदविका प्राप्त केली. या कालखंडात त्यांनी मेमरी ड्रॉइंगचा खूप सराव केला,ज्याचा त्यांना इलस्ट्रेशन्स करतानाच्या कालखंडात खूप फायदा झाला.

             बेळगावात चित्रकला शिक्षकाची नोकरी काही काळ केल्यावर त्यांनी उपयोजित कलेच्या क्षेत्रातील संधीसाठी मुंबई गाठली. स्टुडीओ रतन बात्रा, रॅशनल आर्ट अँड प्रेस अशा संस्थांमध्ये इलस्ट्रेटर म्हणून काम करताना त्यांनी उपयोजित कलेच्या अनेक अंगांचा अभ्यास केला. त्यांनी जलरंग, अपारदर्शक जलरंग, रंगीत शाई, वॉटरप्रुफ इंक, पेस्टल, स्के्रपर बोर्ड, चारकोल पेन्सिल अशा विविध माध्यमांतील अनेक चित्रतंत्रे आत्मसात केली. या सगळ्यांबरोबरच उपयोजित क्षेत्रातील अनिश्‍चिततेचा अनुभवही त्यांनी घेतला. मानसिक अस्वस्थतेच्या या काळातच त्यांना स्वत:ची शैली गवसली. पेन्सिलीऐवजी ब्रशने रेखांकन करताना रेषेला एक वेगळीच ऊर्जा व गुणवत्ता लाभल्याचे त्यांच्या लक्षात आले. यातूनच पुढे त्यांच्या रेखांकनप्रधान चित्रशैलीचा जन्म झाला.

             या अनुभवांच्या शिदोरीवर त्यांनी १९६० मध्ये ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या आर्ट डिपार्टमेंटमध्ये प्रवेश केला. अनेक वर्षांपासून मनाशी बाळगलेले त्यांचे एक स्वप्न पूर्ण झाले. अल्पावधीतच त्यांच्या चित्रांमुळे रवी परांजपे यांची स्वत:ची अशी खास ओळख निर्माण झाली. त्यांनी १९६१ मध्ये ‘बोमास’ या ब्रिटिश जाहिरात कंपनीत ‘इलस्ट्रे्रेटर’ म्हणून काम सुरू केले. १९६३ मध्ये श्यामला दत्तात्रय पेंडसे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. येथील दर्जेदार कामाच्या पाठबळावर त्यांना संस्थेच्या नैरोबी शाखेत १९६६ ते १९६९ पर्यंत काम करण्याची संधी मिळाली. या वास्तव्यात व्हिक्टर हॅसलर व मॉरिस मॅक्री अशा गुणी कलावंतांच्या सहवासात त्यांची कला बहरत गेली. परांजपे १९६३ ते १९६६ या कालावधीत सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये निमंत्रित प्राध्यापक म्हणून जात होते. त्यांच्या अनुभवांचा फायदा अनेक तरुण विद्यार्थ्यांना झाला.

             रवी परांजपे यांनी १९७३ मध्ये स्वत:चा स्टुडीओ सुरू केला. जाहिरात, प्रकाशन, कॅलेंडर अशा सर्वच क्षेत्रांत त्यांनी स्वत:च्या शैलीचा ठसा उमटवला होता. नावीन्य, दर्जेदार निर्मितीतील सातत्य, प्रयोगशीलता यांमुळे ते मुंबईतील आघाडीचे इलस्ट्रेटर म्हणून काम करीत होते. याच सुमारास वास्तुरचनेचे संकल्पचित्र करायचे काम त्यांच्याकडे आले. परांजपे यांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत ते साकारले. त्यात अभिजात व उपयोजित कलामूल्यांचा संगम होता. उपयोजित कलेच्या क्षेत्रात एका नव्या प्रकाराची त्यांनी सुरुवात केली. विशेषत: त्यातील बिंदुवादाचा रंगलेपनातील उपयोग व मोहक रंगसंगती या वैशिष्ट्यांमुळे त्यांनी या कलाप्रकाराला उच्च कलात्मक दर्जा दिला व अल्पावधीतच त्याचा खूप प्रसार झाला. त्यांनी मफतलाल समूहासाठी केलेल्या इलस्ट्रेशनला १९७८ सालचा उत्कृष्ट छापील जाहिरातीसाठीचा ‘कॅग पुरस्कार’ मिळाला. त्यांनी १९७९ साली सहार आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ३०० फूट लांबीच्या ट्रान्सलाइट म्यूरलचे संकल्पन केले.

             व्यावसायिक चित्रकलेच्या क्षेत्रात असे दर्जेदार काम करत असतानाच त्यांनी पेंटिंग क्षेत्राकडे आपले लक्ष वळविले. यासाठी १९७७ साली त्यांनी काश्मीरला केलेली काही निसर्गचित्रे त्यांना प्रेरक ठरली. चित्रनिर्मिती-बाबतचे अंदाज व दृश्याला दिलेला भावनिक प्रतिसाद यांतून काही वेगळ्या वाटा त्यांना खुणावत जाणाऱ्या भारतीय लघुचित्रशैली, तसेच भारतीय लोककलांच्या अभ्यासातून प्रेरणा घेऊन रेषा व बिंदू वापरून केलेले अलंकरण, आकारांची पुनरावृत्ती आणि उजळ रंगांचा वापर यांच्या वापरातून आपली चित्रभाषा त्यांनी अधिकाधिक समृद्ध केली. ठोस संकल्पना, विचार व अभिव्यक्तीमधील स्पष्टता, उत्तम रेखांकन, चित्ररचनेतील वेगळेपण, वास्तवाशी संवाद साधत असतानाच वेगळ्याच कल्पनाविश्‍वात घेऊन जाणारी रंगसंगती ही त्यांच्या चित्रांची वैशिष्ट्ये होत. ‘सुंदर ते वेचावे व सुंदर करोनी मांडावे इतरांसाठी’ या त्यांच्या सौंदर्यनिष्ठ भूमिकेशी ते कायमच एकनिष्ठ राहिले आहेत.

             परांजपे यांनी व्यक्तिचित्रे, समूहचित्रे, निसर्गचित्रे, स्थिरचित्रे अशा विविध चित्रप्रकारांत काम केले आहे. तसेच सर्वच रंगमाध्यमांवर प्रभुत्व असल्यामुळे प्रचलित पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने माध्यमांची हाताळणी करून त्यांनी सातत्याने अभिव्यक्तीकरीत स्वत:ची अशी एक प्रतिमा निर्माण केली आहे. भारतात व इंग्लंड, अमेरिका इत्यादी अनेक देशांत त्यांची प्रदर्शने झाली असून वेगवेगळ्या सर्जनशक्यतांचा शोध घेत त्यांची चित्रनिर्मिती चालूच आहे.

             चित्रनिर्मितीतील भरीव योगदानाबरोबरच चित्रकला क्षेत्रातील घडामोडींबद्दल स्वत:ची परखड मते मांडणारे लेखनही ते करत असतात. चित्रकला क्षेत्रात शिरू पाहणार्‍या अपप्रवृत्तींचा रवी परांजपे नेहमीच निषेध करत आले आहेत. दिग्गज कलाकारांच्या कलाकर्तृत्वाचा परिचय करून देणारे लेखनही त्यांनी केले आहे. आधुनिक कलेची सकारात्मक बाजू व वैश्‍विक चित्रपरंपरेचे खरे स्वरूप स्पष्ट करण्याच्या हेतूने त्यांनी जागतिक दर्जाच्या चित्रकारांवर ‘शिखरे रंग-रेषांची’ ही लेखमाला लिहिली. यातून कलाइतिहासाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन दिसतो.

             त्यांच्यातील चित्रकाराची जडणघडण कशी झाली व त्या अनुषंगाने त्या काळातील सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उमटलेले पडसाद त्यांच्या ‘ब्रश मायलेज’ या आत्मवृत्तात दिसतात, तर सांस्कृतिक राष्ट्रवादावरील विचार ‘नीलधवल ध्वजाखाली’ या पुस्तकात नोंदले गेले आहेत. याशिवाय ‘वर्ल्ड ऑफ माय इलस्ट्रेशन’ भाग १ व २ व रंगीत इलस्ट्रेशन्सवर आधारित पुस्तकांतून परांजपे यांनी आपल्या निर्मितीमागील वैचारिक प्रक्रिया व विविध तंत्रांचा परिचय पुढील पिढ्यांसाठी खुला केला आहे, तर ‘व्हेन आय सिंग थ्रू कलर’ या पुस्तकातून त्यांच्या चित्रांमागची वैचारिक भूमिका विविध शैलींतील चित्रांसोबत विशद केली आहे. लाइफ ड्रॉइंग व मास्टर आर्टिस्ट मालिकेत त्यांचे ड्राय मीडिया लॅण्डस्केपवरील पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे. या सर्व पुस्तकांमधून त्यांच्या कलाविषयक विचारांचे संचित नोंदले गेले आहे.

             त्यांच्या या कलाकर्तृत्वाला अनेक पुरस्कार लाभले आहेत. त्यांना १९९५ मध्ये उपयोजित कलेतील सर्वोच्च मानाचा ‘कॅग हॉल ऑफ फेम’ पुरस्कार मिळाला. त्यांना ‘दयावती मोदी फाउण्डेशन फॉर आर्ट, कल्चर अँड एज्युकेशन’चा पुरस्कार (१९९६), ‘अमेरिकन आर्टिस्ट अकॅडमी’चा सन्मान (१९९८), महाराष्ट्र राज्य शासनातर्फे मानपत्र व ज्येष्ठ कलाकार म्हणून सत्कार (२००२), ‘पुणे प्राइड’ अवॉर्ड (२००३), तर ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’चा ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार (२००६) असे महत्त्वाचे पुरस्कार मिळाले.

             आपल्याकडे चित्रकला क्षेत्राकडे होणारे दुर्लक्ष आणि आयुष्यभर दर्जेदार निर्मिती करूनही अनेक चित्रकारांची झालेली उपेक्षा लक्षात घेऊन परांजपे यांनी ‘रवी परांजपे फाउण्डेशन’ सुरू केले. त्यांनी दयावती मोदी फाउण्डेशनच्या पुरस्काराच्या रकमेतून आपल्या वडिलांच्या नावे १९९८ पासून ‘कै. कृ.रा. परांजपे गुणिजन कला पुरस्कार’ सुरू केला. चित्रकला क्षेत्रातील अनेक ज्येष्ठ चित्रकारांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. पुण्यासारख्या शहरात होतकरू तरुण चित्रकारांसाठी सुसज्ज असे कलादालन नाममात्र शुल्क आकारून उपलब्ध व्हावे म्हणून त्यांनी ‘संग्रह आर्ट गॅलरी’ची सुरुवात केली. त्यांच्या संपर्कात येणार्‍या अनेक चित्रकारांना ते आत्मीयतेने मार्गदर्शन करतात.

             सौंदर्यवादी चित्रकला आणि प्रगत उत्पादक राष्ट्र यांचा अन्योन्य संबंध कसा असतो, यावर त्यांनी चिंतन केले असून त्यावर आधारित अशी ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ ही संकल्पना त्यांनी मांडली आहे. सौंदर्यवादी कला ही सकारात्मक विचार, सुनियोजन, प्रसन्नता, ऊर्जा देणारी असते. याचा परिणाम समाजमनावर झिरपत राहिल्याने सुंदर कल्याणकारी, निर्मितिक्षम ऊर्जा, शिस्त आपोआप अंगीकारल्या जातात. वैयक्तिक व सामाजिक जीवनाचा स्तर उंचावतो व परिणामत: प्रगत उत्पादक राष्ट्रनिर्मितीचा पायाच घातला जातो. निर्मितिक्षम ऊर्जेचा प्रकाश देण्याची क्षमता सौंदर्यवादी चित्रकलेमध्ये आहे आणि त्याचा संबंध शास्त्र, तंत्रज्ञानाच्या प्रगतीशीही आहे हे सांगताना ते प्रबोधन काळातील थोर तंत्रज्ञ, शास्त्रज्ञांची उदाहरणे देतात.

             लिओनार्दो, मायकलेंजेलो हे मुळात चित्रकार, शिल्पकार होते असा दाखला देतानाच ‘ब्रिटिश रेनेसान्स’मध्ये दृश्यकला सापेक्ष राष्ट्रवादाने तात्कालिक श्रमिक कामगार जनता, उद्योजक व एकूण समाजजीवनात कसे आमूलाग्र परिवर्तन घडले याबद्दल ते सांगतात. भारतातील सर्वच क्षेत्रांत निर्माण झालेल्या प्रश्‍नांच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रीय स्तरावर सौंदर्यवादी कलेची पेरणी पुन्हा व्हावी असे परांजपे यांना वाटते. त्यांची स्वत:ची अशी कलाविषयक आग्रही भूमिका आहे. ती कलेतील कौशल्य, सौंदर्य व संस्कृती यांचा आत्यंतिक पुरस्कार करणारी असते. यातूनच ते दुसऱ्या प्रकारच्या कलानिर्मितीवर कठोर टीका करतात व प्रसंगी तिचे अस्तित्वही नाकारतात.

             चित्रकलेबाबत स्वत:चे सुस्पष्ट विचार आणि भूमिका असलेले रवी परांजपे आपल्या जीवनात सौंदर्यनिष्ठ भूमिकेशी प्रामाणिक राहिले. मे २०२२ च्या अखेरीस त्यांना मेंदूत झालेल्या रक्तस्त्रावामुळे रुग्णालयात दाखल केले गेले. त्यानंतर अकरा दिवसांनी त्यांची प्राणज्योत मालवली.

- राहुल देशपांडे

परांजपे, रवी कृष्णाजी