Skip to main content
x

प्रियोळकर, अनंत काकबा

     मराठी भाषेतील ‘पाठचिकित्साशास्त्रा’चे आद्य प्रणेते म्हणून ओळखले जाणारे अनंत प्रियोळकर मूळचे गोव्यातील फोंडा तालुक्यातील प्रियोळ या गावी जन्मले. त्या काळात गोव्यात मराठी शाळा नव्हत्या. त्यांचे प्रारंभीचे प्राथमिक शिक्षण घरीच झाले. प्रियोळ व असमोडे येथे त्यांचे चौथीपर्यंतचे मराठी शिक्षण झाले. पुढे माध्यमिक शिक्षण फोंडा येथील सरकारी शाळेत झाले. अल्मैद महाविद्यालयातून १९१८ साली ते मॅट्रिक झाले. त्यानंतर ज्युनिअर बी.ए.पर्यंतचे शिक्षण धारवाड कर्नाटक महाविद्यालय व पुढे सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयातून १९२३मध्ये साली ते बी.ए. झाले.

     महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांच्यात लेखनाची आवड आणि ऊर्मी होती. त्या वेळच्या ‘विविधज्ञानविस्तार’ या प्रतिष्ठित मासिकात त्यांचे लेखन प्रसिद्ध होत असे. प्रारंभीच्या काळात ‘अरुणोदय, बी.ए.’ या टोपणनावाने त्यांनी काही कविताही केल्या होत्या. या कविता ‘नवयुग’, ‘स्वयंसेवक’ या मासिकांमधून प्रसिद्ध झाल्या होत्या. पदवी प्राप्त झाल्यावर काही काळ त्यांनी कोकणातील वेंगुर्ला येथे ‘जॉर्ज इंग्लिश स्कूल’मध्ये शिक्षक म्हणून काम केले. या काळातही त्यांचा लेखन-अध्ययन-संशोधनाचा व्यासंग सुरूच होता. याच काळात ते मुंबई येथे गेले असताना ‘विविधज्ञानविस्तार’ च्या कचेरीत गेले होते. त्यांची लेखनातील गती आणि संशोधन वृत्ती पाहून सदर मासिकाच्या संपादकांनी त्यांच्याकडे त्या मासिकाचे सहसंपादक होण्याची विचारणा केली आणि ही मोठी संधी उपलब्ध होत असल्याचे पाहून त्यांनी वेंगुर्ल्याची शिक्षकाची नोकरी सोडून मुंबईतच वास्तव्य करण्याचा निर्णय घेतला. त्याच सुमारास त्यांना मुंबई कॉर्पोरेशनच्या स्कूल कमिटीतही नोकरी मिळाली. त्यामुळे आवडीच्या दोन्ही क्षेत्रांत आणि ती ही मुंबईत संधी मिळाल्याने प्रियोळकरांच्या हातून मोठे काम होऊ शकले. १९२६ ते १९४७ अशी एकवीस वर्षे त्यांनी नोकरी करून १९४७ मध्ये सेवानिवृत्ती स्वीकारली.

     दरम्यानच्या काळात त्यांच्या लेखन, संपादन, संशोधन ह्यांना खूपच गती मिळाली आणि मराठी भाषेला एक खंदा संशोधक मिळाला. ‘नलदमयंती स्वयंवर’ या १९३५ साली प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या पहिल्या ग्रंथाने मराठी साहित्यक्षेत्रात संशोधक म्हणून त्यांचे नाव प्रसिद्ध झाले. हा ग्रंथ अशा प्रकारचा पहिला पाठचिकित्सात्मक ग्रंथ होता. या ग्रंथाला मुंबई विद्यापीठाचे पारितोषिक मिळाल्याने ‘प्रियोळकर’ या नावाला एक वलय मिळाले. पुढे त्यांनी भाषाशास्त्रीय दृष्टीकोनातून मराठी व कोकणी भाषांचा अभ्यास सुरू केला व त्यातूनच ख्रिश्चन धर्मोपदेशकांच्या मराठी साहित्याकडे त्यांचे लक्ष गेले. ‘ख्रिस्तपुराण’ व अन्य मराठी ग्रंथांच्या चिकित्सक, संशोधनात्मक अभ्यासातून प्रियोळकरांनी ‘सांतु अंतोनीची जीवित्वकथा’, ‘गोमंतकाची सरस्वती’, ‘हिंदुस्थानचे दोन दरवाजे’, ‘मुक्तेश्वर महाभारत’, ‘दोलामुद्रिते’, ‘मुंबईचा वारसा’ इत्यादी संशोधनमूल्य असलेल्या अनेक ग्रंथांची निर्मिती केली. संशोधन क्षेत्रात त्यांनी ‘प्रियोळकर युग’ निर्माण केले.

     प्रियोळकरांनी अत्यंत परिश्रमाने जुनी हस्तलिखिते, दुर्मिळ ग्रंथ जमा करून त्यांचे संशोधन करून ती प्रसिद्ध केली. दादोबा पांडुरंग डॉ.भाऊ दाजी यांची आत्मचरित्रे त्यांनी प्रसिद्ध केली. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख व गोविंद नारायण माडगावकर यांचे लेख, परशुराम तात्या गोडबोले संपादित ‘नवनीत’ची शताब्दी आवृत्ती इत्यादींचे त्यांनी संपादन व प्रकाशन केले. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या ‘मराठी संशोधन मंडळा’चे प्रमुख म्हणून त्यांनी १९४८ ते १९६६ एवढा प्रदीर्घ काळ काम केले. या संस्थेच्याच ‘मराठी संशोधन पत्रिके’तही त्यांनी स्वतःचे व इतर अनेकांचे संशोधित लेखन प्रसिद्ध केले. कारवार येथे १९५१साली भरलेल्या ३४ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्यांनी मराठी साहित्याच्या संशोधनाला दिशा देणारे भाषण करून दुर्मिळ हस्तलिखिते, भाषा यांच्या संशोधनावर भर दिला.

     प्रियोळकरांनी संशोधनाला शिस्त लावली, पुराव्याशिवाय कोणतेही विधान करायचे नाही,  यावर त्यांचा कटाक्ष असे. त्यांच्या संशोधनाबद्दल भीमराव कुलकर्णी म्हणतात, ‘थोडक्यात सांगायचे म्हणजे, त्यांनी ‘Age of Chronicals’ मधून ‘Age of Documents’ मध्ये मराठीचे संशोधन आणून ठेवले’, प्रियोळकर संशोधक असले तरी ते चित्रकार, कवी होते. त्यांचे ललित लेखनही शैलीदार होते. त्यांची ‘गोंडवनातील गावगुंड’ ही कादंबरी डॉ.श्री.व्यं. केतकरांनाही उत्तर देणारी होती.

- मधू नेने

प्रियोळकर, अनंत काकबा