Skip to main content
x

पतकी, श्रीधर नारायण

मार्गशीर्ष पौर्णिमेला लाडचिंचोळी या गावी श्रीधरस्वामी यांचा जन्म झाला. नारायणराव व कमळाबाई यांचे हे सुपुत्र, ते मूळचे महाराष्ट्रातील देगलूर या गावचे होते. त्यांचे कुटुंब देशस्थ ऋग्वेदी, वैदिक कुलपरंपरेतील  होते. त्यांचे पूर्ण नाव श्रीधर नारायण पतकी होते. असे सांगतात, की पतकी घराण्याला त्यांची सातवी पिढी निर्वंश होईल हा शाप होता. परंतु एक विश्वउद्धारक पुत्र त्यांच्या कुळात जन्माला येणार होता. कमळाबाईंना रेणुका ही एक सावत्र कन्या आणि त्र्यंबक, गोविंद व गोदावरी ही अपत्ये होती. शापाचा वृत्तान्त कुलपुरोहित ज्योतिषी यांच्याकडून समजल्यावर नारायणरावांनी गाणगापूर येथे अनुष्ठान केले. भगवान दत्तप्रभूंच्या कृपाशीर्वादाने ते स्वत: या दांपत्याच्या उदरी जन्माला आले. दुर्दैवाने श्रीधरांच्या तिसऱ्या वर्षीच वडील निधन पावले. वडील गेल्यावर मातु:श्रींनी हैद्राबाद येथे बिऱ्हाड ठेवले. तेथे कमळाबाईंना नारायण महाराज रामदासी यांच्या मठात सेवेचा संस्कार झाला. रामजप आणि श्रीदासबोध पारायण यांचा परिपाठ घडला. बाल श्रीधरांच्या मनावरही हा संस्कार घडला. लहानपणी श्रीधर हे खोडकर होते; परंतु मुंज संस्कारानंतर संध्यादीवंदन, स्तोत्र पाठांतर, रुद्र, वैश्वदेव, त्रिसुपर्ण इ.चे संस्कार घडले.

लौकिक दृष्टीने त्यांचे शिक्षण हे विवेकवर्धिनी हायस्कूल, हैद्राबाद येथे झाले. श्रीधरांच्या बाराव्या वर्षीच मातु:श्री गेल्या. सावत्र भगिनीचे लग्न झाले आणि एकामागे एक करीत सर्व भावंडे देवाघरी गेली. नातेहितसंबंधी पाश संपल्यावर श्रीधर गुलबर्ग्याला मावशीकडे आले. त्यांचे लहानपण अत्यंत कष्टप्रद गेले. मात्र, उपासना व अभ्यास सुरू होता.

हा काळ स्वातंत्र्यचळवळीचा होता. गुलबर्ग्यात अनेक स्वातंत्र्यसैनिक येत असत. समाजात, तसेच तेथील शाळेत राजकीय, सामाजिक, धार्मिक इ. क्षेत्रांतील मंडळी येत असत. त्या समारंभात श्रीधर स्वयंसेवकाचे काम करीत असत. येणाऱ्या लोकांच्या मनांत श्रीधरबद्दल प्रेम व जिव्हाळा निर्माण झाला. श्री.वि.गं.केतकर यांच्या सहकार्याने १९२४ साली पुण्यातील पुणे विद्यार्थी गृह (त्या वेळचे अनाथ विद्यार्थी गृह) येथे त्यांचे हायस्कूल शिक्षण पूर्ण झाले. या शाळेतील पळणीटकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाने १९२७ साली दसऱ्याच्या दिवशी ते पुणे सोडून सज्जनगड परळी-सातारा येथे गेले. तेथे त्यांनी काया-वाचा-मनाने कठोर साधना केली. १९३० साली त्यांना समर्थ रामदासांचे दर्शन झाले. त्यांनी श्रीधरांस दक्षिणेकडे जाण्याची आज्ञा केली. श्रीधर गड सोडून चालत गोकर्णाकडे गेले. कर्नाटकात शिवानंदस्वामींच्या आश्रमात, कोडसाद्री वनवासी सोरबा भागात त्यांनी साधना केली.

त्यांनी १९४२ मध्ये विजयादशमीला संन्यास घेतला. श्रीधरस्वामींच्या आचार-विचारांत प्राचीन ऋषिमंडळींचा आदर्श दिसत होता. ध्येयनिष्ठा, प्रखर प्रज्ञा, प्रतिभा-संपन्नता, मृदुभाषी अशा सर्वांनी त्यांचे समाजात आदरस्थान निर्माण झाले. श्रीधर स्वामींनी संपूर्ण भारतभर भ्रमण करून लोकजागृती व धर्मजागृती केली. वेदांची पारायणे, यज्ञयागादी अनुष्ठाने, देवत्वाचा जीर्णोद्धार केला. कायमस्वरूपी समर्थसेवेसाठी १९५० साली त्यांनी श्री समर्थ सेवा मंडळाची स्थापना करून, समर्थ प्रचार दौर्‍याची सुरुवात करून समाजात जागृती केली आणि समर्थकार्याची प्रसारसेवा केली. १९५३ साली श्रीक्षेत्र वरदपूर येथे अगस्ती ऋषींच्या तपोभूमीत त्यांनी श्रीधराश्रमस्थापन केला. कर्नाटकातील सागर जिल्ह्यात हे गाव आहे. या भागात श्रीधरस्वामींनी विपुल धर्मकार्य व सामाजिक कार्य केले. आपल्या जीवनात तेरा वेळा एकांतात तपसाधना करून, त्या तपोबलावर त्यांनी लोकांचे जीवन सुखी केले. राष्ट्र- कार्यातही तपसाधनांचा उपयोग केला. श्रीधरस्वामींनी अनेक स्तोत्रे, संस्कृत, कानडी, मराठी, इंग्रजी भाषेत करून तीसएक ग्रंथांची निर्मिती केली.

श्रीधरस्वामी १९६७ साली वरदपूर येथे दीर्घकाळ एकांतासाठी राहिले; परंतु चैत्र वद्य द्वितीया, १९ एप्रिल १९७३ रोजी त्यांनी आपली जीवनज्योत अनंतात विलीन केली. तेथेच त्यांची समाधी आहे. एकूण साधना, उपासना व सिद्धावस्था यांच्या आचारविचारांचे प्रबोधनात्मक वस्तुपाठ श्रीधरस्वामींनी समाजात मांडले हेच त्यांच्या अवतारकार्याचे वैशिष्ट्य होय.

डॉ. अजित कुलकर्णी

 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].