Skip to main content
x

पटवर्धन, शालिनी सदाशिव

       शालिनी सदाशिव पटवर्धन म्हणजेच पूर्वाश्रमीच्या शालिनी गणेश कुलकर्णी यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील दहिवडी गावात झाला. त्यांचे वडील निबंधक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या आईचे नाव सरस्वती होते. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सांगली येथे झाले. त्यांनी १९५८मध्ये पुणे विद्यापीठातून बी.एस्सी. आणि १९६५मध्ये एम.एस्सी. पदवी भौतिकशास्त्रात प्राप्त केली आणि १९७२मध्ये भौतिकशास्त्रातच मराठवाडा विद्यापीठातून पीएच.डी. प्राप्त केली. त्यांनी विलिंग्डन महाविद्यालय सांगली, रुईया व रुपारेल महाविद्यालय, मुंबई आणि मराठवाडा विद्यापीठ येथे १५ वर्षे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांनी गुरुनानक देव विद्यापीठ येथे अतिथी प्राध्यापक म्हणूनही कार्य केले. तसेच मुंबई विद्यापीठ, एस.एन.डी.टी. विद्यापीठ व पुण्यातील सिंबॉयसिस अभिमत विद्यापीठ येथील एम.एस्सी. व पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांसाठी त्या अधिकृत मार्गदर्शक आहेत. या संस्थांमध्ये शिक्षणाचे कार्य करतानाच त्यांनी त्या त्या संस्थांमध्ये पदार्थविज्ञानशास्त्राच्या अद्ययावत प्रयोगशाळा स्थापन करण्याचे मूलभूत कार्य पूर्णत्वास नेले. डॉ.शालिनी पटवर्धन १९७५मध्ये मुंबई येथील लोकर संशोधन संस्थेत वैज्ञानिक या पदावर रुजू झाल्या. त्यांनी कापड उद्योग, लोकर उद्योग आणि संलग्न रंग उद्योग यात आधुनिकता व विविधता आणणे, संगणकाच्या साहाय्याने कापड व लोकर वस्तूंचे रंग जुळवणे यांबाबत मूलभूत संशोधन केले आणि उद्योगवाढीसाठी मदत केली. परंपरागत पद्धतीच्या यंत्रमाग व हातमाग उद्योगात आधुनिक पद्धतीने नक्षी व रंगनिवडीसाठी संगणकाचा विस्तृत वापर करण्यासाठी त्यांनी संशोधन केले.

       डॉ.शालिनी पटवर्धन यांनी प्रमुख संशोधक व सल्लागार या नात्याने कापड, लोकर, रेशीम, ताग, रंग, प्लॅस्टिक इत्यादी उद्योगांमध्ये उद्भवणारे प्रश्‍न जाणून घेऊन त्यांचे  निरसन केले. महाराष्ट्रातील तंत्र शिक्षणामध्ये संगणकाच्या साहाय्याने आराखडे तयार करणे, रंग जुळवणे यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी संशोधनातून गरवारे सन कंट्रोल पॉलियस्टर फिल्म तयार केली. केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत लोकरीचे धागे काढणे व विणकाम करण्याच्या संयंत्रांची उभारणी केली. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांत लोकरी गालिचे व निर्मिती करण्यामध्ये आधुनिकता आणल्याने गालिच्यांची निर्यात अनेक पटीने वाढते हे सिद्ध केले. संयुक्त राष्ट्र संघटना व केंद्र सरकारच्या विद्यमाने लोकर, ताग, नायलॉन व इतर धाग्यांचे मिश्रण करून अनेक प्रकारचे गालिचे, दरी अणि इतर ग्राहकोपयोगी आवरणे बनवण्याचा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केला.

       डॉ.शालिनी पटवर्धन यांचे सुमारे ८० अभ्यासपूर्ण लेख देशी आणि विदेशी नियतकालिकांत प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना रंगविज्ञान क्षेत्रात जगन्मान्यता मिळाली. त्या भारताच्या रूथ जॉन्सन म्हणून ओळखल्या जातात. त्यांना पटवर्धन कुलभूषण पुणे (२००९), भगिनी निवेदिता प्रतिष्ठान पुरस्कार (२०११) इ. पुरस्कार मिळाले आहेत. निवृत्तीनंतरही महिला व बालकल्याणासंबंधित अनेक सामाजिक कार्यात त्या भाग घेतात.

- डॉ. वसंत नारायण जहागीरदार

पटवर्धन, शालिनी सदाशिव