Skip to main content
x

फाळके, राजाराम बापू

राजाराम बापू फाळके यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील पाडळी-सातारा रोड येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. घरच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांचे शिक्षण इयत्ता 7 वी पर्यंत झाले. उपजत असलेल्या सामाजिक कामांच्या आवडीमुळे फाळके समाजाचे नेतृत्व करू लागले. ग‘ाम पातळीवरच्या सेवा सहकारी संस्थेच्या सचिव पदापासून त्यांनी सहकारी क्षेत्रात कार्य करण्यास सुरुवात केली.

गावच्या सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष असताना त्यांनी शिधावाटप दुकाने चालवण्याचा उपक‘म यशस्वीरीत्या राबविला. केशवराव विचारे यांच्या विचाराने प्रभावित होऊन फाळके यांनी सामुदायिक शेतीचा प्रयोग करून त्याचे फायदे शेतकर्‍यांना दाखवून दिले. शेतीला आवश्यक असणार्‍या पाणीपुरवठ्याच्या योजना राबविण्यासाठी त्यांनी सामुदायिक पाणीपुरवठा सहकारी संस्था स्थापन केली. त्यांनी सदर संस्थेचे अध्यक्षस्थानही भूषविले. ते कोरेगाव तालुका सुपरवायझिंग युनियनचेही अध्यक्ष होते. तेव्हा उचित मार्गदर्शनामुळे सहकारी संस्थांचे काम सुरळीत चालू शकते, हे त्यांनी प्रयोगाअंती दाखवून दिले.

शेतकर्‍यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळावा म्हणून फाळके यांनी कोरेगाव तालुका सहकारी ऑईल मिलची स्थापना केली. तसेच त्यांनी कोरेगाव तालुका सहकारी खरेदी-विक‘ी संघाचीही स्थापना केली.

फाळके यांनी शेती व्यवसायाला पूरक असणारे कुक्कुटपालन व दुग्धव्यवसाय ग‘ाम पातळीवर सुरू व्हावेत यासाठी सहकारी संस्था स्थापन केल्या. त्यांनी व्यवसायांचे महत्त्व शेतकर्‍यांना पटवून दिले. तसेच, मागासवर्गीय बांधवांसाठी गृहनिर्माण संस्था स्थापण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. त्यांनी सातारा येथे अजिंक्यतारा हाऊसिंग सोसायटी व सह्याद्री हाऊसिंग सोसायटी या संस्था स्थापन केल्या.

सातारा जिल्हा सहकारी बोर्डाच्या सभासदांना व्यवस्थितपणे व सुरळीतपणे काम चालविण्याचे  शिक्षण-प्रशिक्षण देण्याचे कार्य त्यांनी केले. पुढे त्यांनी पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक सहकारी मंडळाच्या संचालक मंडळाचे मानद सचिवपद व अध्यक्षस्थान भूषविले. त्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे संचालक म्हणूनही काम पाहिले. राज्य सहकारी संघाच्या प्रबोधनाचे कार्य अधिक गतिमान व्हावे यासाठीही त्यांनी प्रयत्न केले.

शेतकर्‍यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळावा म्हणून फाळके यांनी सातारा जिल्हा सहकारी खरेदी-विक‘ी संघाची स्थापना केली. ते या संस्थेचे अध्यक्ष होते. तसेच, ते सातारा जिल्हा सहकारी दूध पुरवठा संघाचे संस्थापक होते. या संघाचे संचालकपदही त्यांनी प्रामाणिकपणे सांभाळले.

मुद्रण व्यवसायाच्या क्षेत्रात सहकाराचा प्रवेश व्हावा  या उद्देशाने फाळके यांनी सातारा जिल्हा सहकारी मुद्रणालयाच्या कार्याला चालना दिली. या संस्थेचे ते अध्यक्ष होते. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते सलगपणे 15-16 वर्षे संचालक होते. शेतकर्‍यांना शेतीसाठी वेळेवर व योग्य कर्जपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी ते सतत प्रयत्नशील होते. फाळके यांच्या कार्याची दखल घेऊन लोकशाहीर फरांदे प्रतिष्ठानने त्यांचा पहिला फरांदे पुरस्कार देऊन गौरव केला. पुणे मित्र मंडळाच्या वतीनेही आदर्श कार्यकर्ता पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान केला गेला.

- जयराम देसाई

फाळके, राजाराम बापू