Skip to main content
x

फत्तेलाल, बाबासाहेब साहेबमामा

     ‘प्रभात फिल्म कंपनी’चे भागीदार व प्रसिद्ध कला दिग्दर्शक एस. फत्तेलाल ऊर्फ साहेबमामा यांचे बाबासाहेब हे  ज्येष्ठ पुत्र. पुण्याच्या एम.ई.एस. महाविद्यालयातून बी.ए.ची पदवी घेतल्यावर त्यांनी काही दिवस ‘स्क्रीन प्रिंटींग’ची उमेदवारी केली.

     बालपण ‘प्रभात’च्या आवारात गेल्यामुळे बालवयातच त्यांच्यावर चित्रपटाचे संस्कार झाले.

     कराड येथील बाबासाहेबांच्या मालकीचे ‘प्रभात टॉकीज’, त्याचप्रमाणे बाबासाहेबांचे मेहुणे महंमद काझी यांचे ‘राजमहाल टॉकीज’ या दोन्हींची व्यवस्था अनेक वर्षे बाबासाहेब पाहत होते.

      बाबासाहेबांचे वडील साहेबमामा यांनी अखेरच्या काळात दिग्दर्शित केलेल्या ‘शंकराचार्य’ व ‘अयोध्यापती’ या चित्रपटांच्या वेळी बाबासाहेब त्यांच्या हाताखाली साहायक दिग्दर्शक होते, तर ‘युगे युगे मी वाट पाहिली’ या चित्रपटाचे प्रमुख निर्माता होते. निर्मितीची कामे त्यांनी यशस्वीरीत्या केली, पण दिग्दर्शक व्हायचे हे त्यांचे ध्येय होते. त्यासाठी त्यांनी ‘प्रभात’च्याच जागेत सुरू झालेल्या ‘फिल्म इन्स्टिट्यूट’मध्ये दाखवले जाणारे विदेशी चित्रपट वारंवार पाहून चित्रपट कलेचे अध्ययन सातत्याने चालू ठेवले. त्यातूनच पुढे त्यांच्यातला स्वतंत्र दिग्दर्शक तयार झाला. संगीतकार राम कदम आणि बाबासाहेब व त्यांचा धाकटा भाऊ यासीन यांची फार जुनी मैत्री होती. त्यांनी एकत्रपणे चित्रपट निर्मिती करायचे ठरवले आणि ‘चित्रमाउली’ या नावाच्या बॅनरखाली ‘सुगंधी कट्टा’ हा अप्रतिम चित्रपट तयार केला. महाराष्ट्र राज्य चित्रपट  महोत्सवात या चित्रपटाला चक्क दहा पुरस्कार मिळाले होते. त्यामुळे राम कदम व बाबासाहेब या निर्मात्यांचा हुरूप वाढला. त्यांनी ‘चोरीचा मामला’ हा पुढचा चित्रपट काढायचे ठरवले आणि त्यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेल्या या पहिल्याच चित्रपटाला त्यांना दिग्दर्शनाचे कै. दादासाहेब फाळके पारितोषिक मिळाले. १९७८ नंतर निर्माते म्हणून राम कदम व फत्तेलाल बंधू वेगवेगळे झाले. ‘चित्रमाउली’ बॅनर राम कदमांनी घेतले, तर फत्तेलाल बंधूंनी ‘फत्तेलाल प्रॉडक्शन्स’ या बॅनरखाली चित्रपट निर्माण केले.

      बाबासाहेबांचे दिग्दर्शनकौशल्य लक्षात घेऊन अण्णासाहेब देऊळगावकर यांनी त्यांच्या ‘सासुरवाशीण’ (१९७८) या चित्रपटाचे दिग्दर्शन बाबासाहेबांकडेच दिले होते. त्याचप्रमाणे निर्माते बाळासाहेब सरपोतदार यांनीही ‘हीच खरी दौलत’ (१९८०) या त्यांच्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची सूत्रे बाबासाहेबांकडेच सोपवली होती. ‘फत्तेलाल प्रॉडक्शन्स’चे ‘पैज’ (१९८०) व ‘स्त्रीधन’ (१९८५) हे दोन्ही चित्रपट बाबासाहेबांनी दिग्दर्शित केले होते. या दोन्ही चित्रपटांसाठी बाबासाहेबांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार सोहळ्यात कै. मास्टर विनायक पारितोषिक मिळाले होते. फत्तेलाल बंधूंच्याच ‘मिनार मुव्हिटोन’ या वेगळ्या बॅनरखाली काढलेला १९९३ सालचा ‘साईबाबा’ हा बाबासाहेबांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट. शिवा निर्मित ‘मायाममता’ नावाचा चित्रपट बाबासाहेबांनी दिग्दर्शित केला होता, पण तो प्रदर्शित झाला नाही. फुप्फुसाच्या असाध्य विकाराने शेवटची दीड वर्षे ते अंथरुणाला खिळून होते.

- मधू पोतदार

फत्तेलाल, बाबासाहेब साहेबमामा