Skip to main content
x

रुई, डिक्रुझ

         रुई डिक्रुझ यांचा जन्म गोवा राज्यातील मडगाव येथे झाला त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणही येथेच झाले. उच्च शिक्षणासाठी ते कृषी महाविद्यालय, पुणे येथे दाखल झाले. मुंबई विद्यापीठाची बी.एस्सी. (कृषी), १९३९मध्ये मिळवली. डॉ. बी.एस. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भाताच्या गुणधर्मांच्या अनुवंशिकतेचे संशोधन करून एम.एस्सी. (कृषी) ही पदवी संपादन केली. कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कली (अमेरिका) येथून वनस्पति-अनुवंशशास्त्र विषयात १९५५मध्ये पीएच.डी. पदवी मिळवली.

         रुई डिक्रुझ यांनी मुंबई राज्याच्या कृषी खात्यात शिक्षण व संशोधन विभागात विविध पदांवर काम केले. कृषी महाविद्यालय, पुणे येथे कृषी वनस्पतिशास्त्र विभागात १९५५ ते १९६१ या कालावधीत साहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत राहून कोशानुवंशिकी व रोप-पैदासशास्त्र हे विषय त्यांनी शिकवले. त्यांनी १९६२-६८ या कालावधीत त्याच महाविद्यालयात कृषी वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे अर्थ-वनस्पतिशास्त्रज्ञ या पदावर काम केले. १९६९-७२ या कालावधीत ते कृषी महाविद्यालयाच्या वनस्पतिशास्त्र विभागाचे प्राध्यापक आणि म.फु.कृ.वि.च्या वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रमुख होते. नंतर त्यांनी महाराष्ट्राच्या कृषी खात्यात कृषि-उपसंचालक या पदावर अल्पकाळ काम  केले आणि १९७२मध्ये सेवानिवृत्त झाले.

         १९५५-६८ या कालावधीत पुणे विद्यापीठाच्या २५ एम.एस्सी. (कृषी) व पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना आणि त्यानंतर म.फु.कृ.वि.च्या १९ एम.एस्सी. (कृषी) व पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना अशा एकूण ४४ विद्यार्थ्यांना गवताच्या विविध प्रजाती, भात, मिरची, भुईमूग, कापूस, बाजरी, तूर, हरभरा, घेवडा इत्यादी पिकांवरील कोषानुवंशिकीय संशोधनात मार्गदर्शक केले.

         रुई डिक्रूझ यांनी साल्विया, भुईमूग व निवडुंग या वनस्पतीतील जनुकांच्या बदलामुळे बदल झालेल्या गुणधर्मांचा संशोधनात्मक अभ्यास केला. तसेच पपईमधील लिंगरंगसूत्राचा आणि तोंडलीतील लिंगभेदाचा कोषानुवंशिकीयदृष्ट्या अभ्यास केला. कोल्चिसीन या रसायनाचा वापर करून भुईमुगाच्या आंतरप्रजातीय संकरापासून मिळालेल्या प्रथम पिढीपासून हेक्झॅप्लॉइड तयार करून त्यापासून ठिपक्या रोगास प्रतिकारक्षम असलेल्या रोपांचा व त्यांच्या रंगसूत्रांचा अभ्यास केला आणि त्यानंतरच्या पिढीतील रोपांच्या निवडीसाठी ते तेलबिया-विशेषज्ञ जळगाव यांच्याकडे दिले. डायकँथियमच्या प्रजातीमध्ये अपोमिक्सीस (गर्भधारणेविना बीजधारणा)ची क्रिया व अनुवंशिकतेचा अभ्यास केला. अमेरिकेचे (यूएसए) साहाय्य असलेल्या ‘पी.एल.४८०’ या योजनेत अँड्रापोगोनी कुलातील गवताच्या विविध प्रजातींचे संकलन करून त्यांच्यातील रंगसूत्रे, कोषानुवंशिकी आणि गर्भविकास या बाबींचा अभ्यास केला. किमान रंगसूत्रे असलेली प्रजाती प्रथमच अभ्यासली व निदर्शनास आणली गेली. रेमी, अंबाडी, रोझेल, सनहेम्प इत्यादी पिकांच्या वाणांचा अभ्यास केला. अंबाडीच्या एम.टी.१०२ (१९६५) आणि सनहेम्पचा ‘देवगड’ (१९६९) हे वाण प्रसारित केले.

         राज्याच्या गवत संशोधन योजना, पुणे येथील प्रमुख संशोधक जे.जी. ओक व अन्य संशोधक आणि पालघर (जि. ठाणे) येथील संशोधक यांच्या सहकार्याने संशोधन करून माखेल - ४० (१९६४), मोशी - १३ (१९६४), मारवेल - ९३ (१९६५), बी.पी. - २० (१९६८) हे वाण प्रसारित केले. आफ्रिकन बाजरी व हत्ती गवत यांच्या संकरातून तयार केलेल्या ‘गजराज’ या संकरित वाणाच्या चाचण्या व प्रसारण यात त्यांचा सहभाग होता. १९६३-६५ या काळात चिकोरी व गवती चहा या औषधी व सुगंधी वनस्पतींच्या चाचण्या घेऊन त्यांची लागवड पुणे परिसरात यशस्वी होत असल्याने त्यांच्या लागवडीची शिफारस केली. १९६२-७२ या कालावधीत राज्याचे कृषी खात्यातील तज्ज्ञ म्हणून कार्य करत असताना रुई डिक्रुझ हे कृषी संशोधन समितीच्या वनस्पतिशास्त्र व रोप-पैदास या उपसमितीचे संयोजक होते. तसेच त्यांनी राज्याच्या कुरणे आणि चारा या समितीचे सचिव म्हणून कार्य केले. संशोधनपर १३०च्यावर लेख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शास्त्रीय नियतकालिकांमधून प्रसिद्ध केले. तसेच शेतकर्‍यांसाठी काही लेख मराठीतून प्रसिद्ध केले.

- संपादित

 

रुई, डिक्रुझ