Skip to main content
x

साळवी, दिनकर शिवराम

दादा साळवी

       दिनकर शिवराम साळवी उर्फ दादा साळवी यांचा जन्म फणसोब, जिल्हा रत्नागिरी येथे झाला. शालेय शिक्षण पार पडताच साळवी पोलीस खात्यात शिरले. ते गावात सणासुदीला आणि जत्रेमध्ये नाटकातून कामही करत. नाटककार टिपणीस यांनी त्यांचे काम पाहिले आणि ते साळवींना घेऊन मुंबईत आले. के.बी. आठवले हे त्या वेळेस शेठ वझीर अझीज यांच्या एक्सलसिअर फिल्म कंपनीत व्यवस्थापक, नट आणि दिग्दर्शक म्हणून काम पाहत. त्यांना चित्रपटात काम करण्यासाठी सुशिक्षित माणसांची गरज भासत असे. त्यांनी साळवी यांना २५ रु. पगारावर कंपनीत नोकरीस तत्काळ घेतले. ‘खून-ए-नाहक’ (१९२८) या पहिल्या मूकपटात साळवी यांना भूमिका दिली. चित्रपटातले साळवींचे काम पाहून इंपीरियल फिल्म कंपनीने त्यांना आपल्याकडे बोलावून घेतले व त्यांना पगारही वाढवून मिळाला. इंपीरियलमध्ये साळवींनी ‘मदनमंजरी’, ‘इंदिरा बी.ए.’, ‘भोलाशिकार’, ‘सिनेमा गर्ल’, ‘हमारा हिंदुस्थान’, ‘रात की बात’, ‘खुदा की शान’ असे पंधरा-वीस मूकपट केले. तसेच पॅरामाऊंट फिल्म कंपनीसाठी जयंत देसाई दिग्दर्शित ‘पोलादी पेहलवान’ हा चित्रपट केला.

     ‘आलम आरा’ या पहिल्या बोलपटातही साळवींची भूमिका होती. दादासाहेब तोरणे यांच्या सरस्वती सिनेटोनसाठी साळवींनी ‘औट घटकेचा राजा’, ‘भक्त प्रल्हाद’, ‘छत्रपती संभाजी’, ‘ठकसेन राजपुत्र’ हे चित्रपट केले. ‘छत्रपती संभाजी’ या चित्रपटात ते कलुषा कबजीच्या भूमिकेत होते. त्यांची भूमिका पाहून कोल्हापूरच्या हंस चित्रने त्यांना निमंत्रण पाठवले आणि चांगला तीन आकडी पगारही देऊ केला.

     १९३७ सालचा ‘प्रेमवीर’ हा त्यांचा ‘हंस’मधला पहिला चित्रपट आणि तेथूनच मा. विनायक आणि दादा साळवी ही जोडी जमली. ‘ब्रह्मचारी’ या चित्रपटामध्ये साळवी नायिकेच्या वडिलांच्या (वन अधिकार्‍याच्या) भूमिकेत होते. त्यांची ही भूमिका पाहून दुर्गा खोटे यांनी साळवींना ‘सवंगडी’ या आपल्या चित्रपटात भूमिका दिली. हंसच्या ‘ब्रँडीची बाटली’मध्ये त्यांनी दारूबाज हेडक्लार्कची भूमिका केली. ‘देवता’मध्ये प्रेमळ पिता, ‘अर्धांगी’त अरुंधती एम.ए. या पदवीधर विदुषीचा नवरा प्रोफेसर वसिष्ठ यांची भूमिका केली.

     ‘हंस पिक्चर्स’चे पुढे ‘नवयुग चित्रपट लिमिटेड’मध्ये रूपांतर झाले. ‘अमृत’ हा त्या कंपनीचा चित्रपट होता. त्या चित्रपटात कोकणातील सावकार म्हणजे खोत यावर बाप्पा हे पात्र बेतले होते. त्यातील इरसाल बाप्पा आणि साधाभोळा कृष्णा चांभार (बाबूराव पेंढारकर) यांची पडद्यावरील अभिनयाची जुगलबंदी पाहण्यासारखी होती.

     ‘नवयुग’मध्ये साळवी यांनी ‘संगम’, ‘पहिली मंगळागौर’, ‘तुझाच’ हे चित्रपट केले. सर्व चित्रपटांतील त्यांचा अभिनय अप्रतिम झाला होता. मा. विनायकांनी नवयुग कंपनी सोडली व ‘प्रफुल्ल’ ही स्वत:ची चित्रसंस्था स्थापन केली आणि ‘माझं बाळ’ हा गंभीर विषयावरचा चित्रपट निर्माण केला. त्या चित्रपटात दादा साळवी हे बॅरिस्टर मनोहरच्या मुख्य भूमिकेत होते. त्यांच्या या भूमिकेबद्दल वर्तमानपत्रातून रकानेचे रकाने भरून कौतुक करण्यात आले. ‘चिमुकला संसार’, ‘गजाभाऊ’, ‘बडी माँ’, ‘सुभद्रा’ या मा. विनायकांच्या चित्रपटांतून साळवी यांनी एकाहून एक सरस भूमिका रंगवल्या. १९४७ मध्ये मा. विनायकांचा मृत्यू झाला आणि प्रफुल्ल बंद पडली. तेव्हा व्ही. शांताराम यांनी दादा साळवी यांना ‘डॉ. कोटणीस की अमर कहानी’मध्ये डॉ. चोळकरांची भूमिका दिली, तर जयंत देसाई यांच्या ‘तदवीर’मध्ये खलनायक, तर ‘महाराणा प्रताप’मध्ये राणा प्रतापच्या मध्यवर्ती भूमिकेत होते.

     प्रभात फिल्म कंपनीने त्यांना ‘रामशास्त्री’ बोलपटासाठी बोलावले. साळवींनी हा चित्रपट नाकारला. १९४७ सालातच मंगल पिक्चर्सनी त्यांना ‘जिवाचा सखा’ या चित्रपटात खलनायकाची भूमिका दिली. त्यानंतर मराठी चित्रपटातून त्यांची घोडदौड सुरू झाली. त्यांनी ‘पाटलाचा पोर’, ‘वादळ’, ‘कांचनगंगा’, ‘कुलदैवत’, ‘सांगत्ये ऐका’, ‘शिकलेली बायको’, ‘अंतरीचा दिवा’, ‘उमज पडेल तर’, ‘भैरवी’, ‘कन्यादान’ या चित्रपटांत भूमिका केल्या. आपल्या सुनेचा पुनर्विवाह लावून देणारा सासरा ही ‘कन्यादान’ या चित्रपटातील भूमिका खूपच गाजली. त्यानंतर त्यांनी ‘सवाल माझा ऐका’ ‘मल्हारी मार्तंड’, ‘जानकी’ यांसारखे अनेक चित्रपट केले.

     साळवी यांनी इंपीरियल फिल्म कंपनीत असताना नटी सखूबाईशी प्रेमविवाह केला होता. हिंदी चित्रपटसृष्टीतील मराठी कलाकारांचा हा पहिला प्रेमविवाह. त्या वेळेस हा विवाह चर्चेचा विषय ठरला होता.

दादा साळवी यांचे पुण्यात निधन झाले.

- द.भा. सामंत

साळवी, दिनकर शिवराम