Skip to main content
x

सोहनी, नरेंद्रकुमार नरहर

कुमार सोहनी

     कुमार सोहनी उर्फ नरेंद्रकुमार नरहर सोहनी यांचा जन्म ठाणे येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षणही ठाणे येथेच झाले. त्यांनी ठाण्याच्या बेडेकर महाविद्यालयामधून १९७६ मध्ये बी.कॉम. केल्यानंतर केंद्र सरकारची शिष्यवृत्ती मिळवून ते दिल्लीला ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये नाट्यदिग्दर्शन व स्टेज क्राफ्ट यांच्या प्रशिक्षणासाठी दाखल झाले. १९७८ मध्ये तेथील शिक्षण पूर्ण करून त्यांनी पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये फिल्म आणि टेलीव्हिजनचा सहा आठवड्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. ‘अग्निपंख’ हे त्यांनी दिग्दर्शित केलेले नाटक गाजले. त्यानंतर कुमार सोहनी यांनी ‘रातराणी’, ‘लग्नाची बेडी’, ‘वासूची सासू’, ‘देखणी बायको दुसऱ्याची’, ‘देहभान’, ‘शेवटचे घरटे माझे’, ‘अश्रूंची झाली फुले’, ‘तुजविण’ यासारख्या नाटकांचेही त्यांनी यशस्वी दिग्दर्शन केले. पण सोहनी यांना कालांतराने चित्रपट माध्यमात काम करण्याची इच्छा निर्माण झाली व ते चित्रपट क्षेत्रात आले. त्यासाठी त्यांनी ‘तेजाब’ या चित्रपटामध्ये एन. चंद्रा यांचे साहाय्यक म्हणून काम करायला सुरुवात केली. नंतर त्यांनी स्वतंत्रपणे ‘एक रात्र मंतरलेली’ हा गूढ कथानक असलेला मराठी चित्रपट निर्माण व दिग्दर्शित केला. ते साल होते १९९०. पुढच्याच वर्षी त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘आहुती’ हा चित्रपट चांगलाच गाजला.

     कुमार सोहनींनी २०१२ पर्यंत ‘बजरंगाची कमाल’, ‘पैसा पैसा पैसा’, ‘लपून छपून’, ‘जिगर’, ‘रेशीमगाठी’, ‘छडी लागे छमछम’, ‘निरुत्तर’, इ. सतरा चित्रपट दिग्दर्शित केले. त्यांनी दूरदर्शनसाठी ‘कालचक्र’, ‘हिसाब’, ‘पती, पत्नी और वो’ यासारख्या मालिकांचे दिग्दर्शन केले. तसेच त्यांनी मराठी मालिकांचेही दिग्दर्शन केलेले आहे. त्यामध्ये ‘संस्कार’, ‘किमयागार’, ‘मना घडवी संस्कार’ यांसारख्या मालिकांचा समावेश होता. कुमार सोहनी यांना दिग्दर्शनासाठी अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.

- सुधीर नांदगावकर

सोहनी, नरेंद्रकुमार नरहर