Skip to main content
x

सांगळे, बाबूराव सावळो

           बाबूराव सावळो सांगळेे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बिरगुंडी या गावी झाला. त्यांना लहानपणापासूनच  शेतीची आवड होती. भाऊबंदकीत जमिनीची वाटणी झाल्यामुळे पंचावन्न गुंठे जमीन उदरनिर्वाहाचे साधन होती.

          बाबूरावांनी दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले व शेतीतच लक्ष द्यायचे ठरवले. ते दुसऱ्याच्या शेतावर ऊसबांधणीसाठी रोजंदारीवर जात असत. व स्वत:च्या शेतावर बाजरी, ज्वारीसारखी कोरडवाहू पिके घेत. त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह सुरळीतपणे चालला होता. जोडधंदा म्हणून त्यांनी दोन खंड्या (४०) मेंढ्या पाळल्या होत्या. रोजंदारीवर त्यांना द्राक्ष बागेमध्ये काम मिळाले. तेथे काम करत असताना आपली स्वत:ची द्राक्ष बाग असावी, असा विचार त्यांच्या मनामध्ये आला, पण स्वत:ची जमीन क्षारपड व चोपण होती, मात्र जवळच गोसावीवाडी येथे चोपण जमिनीतसुद्धा काही शेतकरी द्राक्षांच्या बागा चांगल्या प्रकारे वाढवत आहेत हे लक्षात आल्यावर द्राक्ष बाग करण्याच्या त्यांच्या इच्छेने उचल घेतली. गावात महाबँक ग्रामीण विकास केंद्राचे विश्‍वस्त डॉ. द.र.बापट व गायकवाड व्यवस्थापक आले असता हा विचार त्यांनी मांडला व या दोघांनीही प्रोत्साहन दिले.

           सांगळे यांनी प्रथम जमिनीचे माती परीक्षण केले. तज्ज्ञ मंडळींच्या सल्ल्याने २५ गुंठे क्षेत्रावर द्राक्ष लागवड करण्याचे निश्‍चित केले. जे.सी.बी. यंत्राने आठ-आठ फुटांवर अडीच फूट खोल चाऱ्या घेतल्या. चाऱ्यांमध्ये पालापाचोळा, शेणखत आदी मिसळून खड्डे बुजवून घेतले व २००३च्या जूनमध्ये द्राक्ष लागवड केली. दोन रांगांमधील अंतर आठ फूट व दोन रोपांमधील अंतर पाच फूट ठेवले. अशा प्रकारे २५ गुंठे क्षेत्रावर सोनाका जातीची ७०० झाडांची लागवड केली. बिरगुंडी गाव अवर्षणप्रवण क्षेत्रात येत असल्यामुळे पाण्याच्या कमतरतेवर उपाय म्हणून त्यांनी द्राक्ष बागेसाठी ठिबक सिंचनाची व्यवस्था केली. द्राक्ष बागेला छाटणीअगोदर १५ दिवस १० गाड्या शेणखत दिले. भरखते व रासायनिक खते वेलीच्या बुंध्यालगत न देता त्यांनी ती अंतरावर दिली. बागेच्या एप्रिल व ऑक्टोबरच्या छाटण्या वेळेत केल्या. त्यांनी औषधांची फवारणी मणी धरेपर्यंत डाऊनी मिल्ड्यूसाठी कॅपटॉप, समर्थ, एंट्रपॉल आलटून पालटून वापरले व टॉनिक म्हणून मल्टिप्लेक्स एक दोनदा स्वच्छ हवामानात दिले. द्राक्ष्याचा मण्याचा आकार वाढवण्यासाठी जिब्रॅलिक अ‍ॅसिडचा योग्य वापर केला. याचबरोबर त्यांनी सर्वसाधारणपणे प्रत्येक घडावर १५० ते २०० मणी ठेवले. वेड्यावाकड्या फांद्या कापून टाकल्या, शिवाय घडाचा आकार त्रिकोणी राहील हे पाहिले. अशा प्रकारे द्राक्षाची बाग तयार झाली. सांगळे यांना पहिल्या वर्षी दोन टन, दुसऱ्या वर्षी १०-टन व तिसऱ्या वर्षी १२ टन असे चढत्या क्रमाने उत्पादन मिळाले. सांगळे यांनी तीन एकर इतकी बाग वाढवली असून दर साल ७-८ लाखांचे उत्पन्न काढतात. पाणीटंचाईच्या काळात ते पाचटाचे आच्छादन करून कमीत कमी पाण्यावर बागेचे संगोपन करून उत्तम पीक घेतात. शेजारील परिसरातील शेतकरी सतत त्यांचा सल्ला घेऊन आपले द्राक्ष उत्पन्न वाढवताना दिसतात . त्यांच्या संशोधन केंद्राशीही चांगला संबंध आहे.

- संपादित

सांगळे, बाबूराव सावळो